'वनस्पती संसाधनांचा वापर' या विषयाचा अभ्यास केल्यावर प्रत्येक वनस्पतीचे एक एक रहस्य उलगडते. अशाच एका बहुगुणी वनस्पतीचा उल्लेख कुरआनमध्ये ठिकठिकाणी आलेला आहे ती म्हणजे जैतून किंवा ऑलिव्ह. अत्यंत उपयुक्त असलेल्या ऑलिव्हची संपूर्ण जगात मागणी आहे. इ.स.पू. ३००० वर्षांपासून पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात हा लागवडीत असल्याचे संदर्भ सापडतात. इतर फळझाडांच्या तुलनेत ऑलिव्ह वृक्ष दीर्घकाळ जगतात. मराठी विश्वकोशात जैतूनच्या आयुष्यासंबंधी नमूद आहे की पॅलेस्टाइनमध्ये २००० वर्षांहून अधिक वर्षे जगलेले वृक्ष आढळले आहेत.
हजारो, लाखो वनस्पतींपैकी मोजक्याच झाडांचा उल्लेख कुरआनमध्ये आढळतो, त्यापैकी जैतून ही एक अशी वनस्पती आहे जिचा उल्लेख करताना त्याचा उपयोगही उल्लेखित आहे. जसे की अध्याय 'अल्-मुअमिनून'च्या आयत २० मध्ये आले आहे,
"तसेच आम्ही त्या वृक्षाला उगवले, जो सिनाई पर्वताच्या परिसरात तेलासह उगवतो आणि खाणाऱ्यांसाठी कालवण सुध्दा आहे."
या आयतीमध्ये जैतूनचा वृक्ष अभिप्रेत आहे. येथे 'जैतून'चा स्पष्ट उल्लेख नसला तरी कुरआनच्या सर्व भाष्यकारांनी आपल्या लेखनात तो वृक्ष जैतूनच असल्याची खात्री दिली आहे. मौलाना मौदुदी आपल्या तफहीमूल-कुरआन या ग्रंथामध्ये लिहितात,
"या वृक्षाशी अभिप्रेत 'जैतून' म्हणजे 'आलिव्ह' आहे. हे रोम समुद्राच्या सभोवताली प्रदेशातील उत्पन्नांपैकी सर्वांत जास्त महत्त्वाची वस्तू आहे. सिनाई पर्वताशी याला संबंधित करण्याचे कारण बहुधा असे आहे की ज्या प्रदेशातील प्रसिद्ध ठिकाण सिनाई पर्वत आहे, तोच या वृक्षाचे मूळ उगमस्थान आहे."
तसेच मौलाना अब्दुर्रहमान क़ीलानी आपल्या तैसीरूल कुरआन या ग्रंथात म्हणतात,
"या आयातीमध्ये उल्लेखित वृक्ष ऑलिव्ह असल्याचे अभिप्रेत आहे. सीरिया आणि पॅलेस्टाईन ही या झाडाची मूळ जन्मभूमी आहे आणि 'सिनाई'चा उल्लेख यासाठी केला गेला कारण ते या भागातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या झाडाचे आयुष्य, उंची आणि प्रसार खूप जास्त असतो, जसे आपल्याकडे वटवृक्ष आहे. जास्त पसरल्यामुळे त्याच्या अनेक फांद्या जमिनीवर येऊन आधार देतात. ऑलिव्हच्या झाडापासून तेल मुबलक प्रमाणात मिळते. वैद्यकीयदृष्ट्या हे तेल अतिशय उपयुक्त आहे. तसेच बरेच लोक त्याच्या फळांचे लोणचे करतात. त्याचे तेल खाण्यासाठीही वापरले जाते आणि कालवणामध्ये तुपाऐवजीही वापरले जाते. यांबरोबरच हृदयविकार, मधुमेह आणि जुनाट आजारांवर उपचार म्हणून जैतूनच्या तेलाचा उपयोग होतो. अल्लाहने या आयतीव्यतिरिक्त अध्याय 'अत्-तीन'मध्येही ऑलिव्हचा उल्लेख केला आहे."
यूरोपीय ऑलिव्ह हा मूळचा पश्चिम आशियातील असला तरीही मोठ्या प्रमाणात स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल इ. भूमध्यसामुद्रिक प्रदेशांत तसेच उत्तर अमेरिकेतील काही भागांत याची लागवड केली जाते.
यावरून हे लक्षात येते की या वनस्पतीची ऐतिहासिक, वैद्यकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक भूमिका वनस्पतीशास्त्रात संशोधनाचा विषय ठरू शकते.
(क्रमशः)
डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment