Halloween Costume ideas 2015

कयामत केव्हा येईल?


कयामतच्या दिवसावर कुणाचा विश्वास असो वा नसो, तो न्यायाचा दिवस नक्कीच येणार आहे आणि हे एक अटळ सत्य आहे. आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी जेव्हा लोकांना कयामतच्या दिवसावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले तेव्हा लोक त्या दिवसाबद्दल प्रश्न विचारू लागले. काही लोकांना खरच त्याबद्दल काही गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, पण काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी हा विषय चेष्टेचा बनवला. त्यांना वाटायचे की आम्ही केव्हापासून त्या दिवसाबद्दल ऐकतोय, पण ती वेळ अजून काही आली नाही, हा तर फक्त धाक दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय. दुसरे हे की कयामतच्या दिवशी मानवजातीच्या दूबार जिवंत होण्याला ते अशक्य समजायचे, म्हणून या विषयावर कधी ते आश्चर्य दाखवायचे आणि कधी खिल्ली उडवताना विचारायचे,  काय हो! ज्या कयामतच्या दिवसाचा तुम्ही वारंवार उल्लेख करता, तो दिवस कधी येणार आहे? पवित्र कुरआनने अशा लोकांना उत्तर दिले की,

यस्-अलुकन्-नासु अनिस्-साअति, कुल् इन्नमा इल्मुहा इन्दल्लाहि, वमा युद्-री-क लअल्-लस्-साअ-त तकूनु करीबन.

अनुवाद :-

हे मुहम्मद (स)! लोक तुम्हाला कयामतच्या वेळेसंबंधी विचारतात, त्यांना सांगा, त्याचे ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे, आणि कोण जाणे, कदाचित ती वेळ जवळ येऊन ठेपलेली असेल?

( 33 अह्जाब - 63 )

कयामत केव्हा येईल? या प्रश्नावर आदरणीय पैगंबर (स) हेच उत्तर देत असत की ती वेळ फक्त विश्व निर्माताच जाणतो. तो दिवस नक्कीच येईल हे मला सांगितले गेले आहे, पण कधी येईल हे मात्र सांगितले गेले नाही. तसेच इतर कोणत्याही निर्मितीला त्याबद्दल माहिती नाही, परंतु अल्लाहने अवतरित केलेल्या ज्ञानानुसार आदरणीय पैगंबर (स) यांनी कयामतच्या अनेक चिन्हांचे वर्णनही केले आहे. जसे की वारंवार भूकंप होणे, भूस्खलनाच्या घटना सामान्य होत जाणे. याशिवाय अनेक लहान मोठी चिन्हे हदीसमध्ये सांगितली गेली आहेत. ज्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. 

आदरणीय पैगंबरांनी कयामतची तारीख, दिवस, वेळ सांगितली नसली तरी काय फरक पडतो? जगात कित्येक अशा घटना घडतात ज्यांची स्पष्ट चिन्हे आधीच दिसू लागतात, पण ती घटना कधी घडेल हे कुणीही खात्रीने सांगू शकत नाही. गर्भवती बाळाला जन्म देणार हे निश्चित असले तरीही बाळाच्या जन्माची ’नेमकी वेळ’ कोणती हे सांगता येत नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूची खात्री असते पण त्याचा मृत्यू कोणत्या वेळी येईल हे खुद्द त्यालाही माहीत नसते. त्यामुळे जन्म होण्याला किंवा मृत्यू येण्याला मुळातच कुणी नकार देत असेल तर त्याची बौद्धिक व मानसिक अवस्था काय आहे हे आपण समजू शकतो; म्हणून कयामतचा दिवस केव्हा येईल हे निश्चितपणे सांगितले गेले नसल्यामुळे त्याची थट्टा करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि एखाद्या भ्रमात राहून स्वतःची फसवणूक करणे आहे.

विचाराधीन आयतीमध्ये प्रश्नकर्त्यांना उत्तर दिले गेले आहे की हे प्रश्नकर्त्यांनो! तुम्हाला काय माहित? तुमच्यासाठी कयामतची वेळ जवळच आलेली आहे. याचा अर्थ असा की ज्या दिवशी या जगाचा अंत होईल, तो कयामतचा दिवस निश्चितच आपल्या वेळेवर येईल, पण तुमचा मृत्यू हाच तर तुमच्यासाठी न्यायाचा दिवस आहे. आत्तापर्यंत जे जे मरण पावले त्यांना आता परत या जगात येण्याची कोणतीही संधी नाही. त्यांचा अंतिम निर्णय आता कयामतच्या दिवशीच होईल, म्हणून त्यांच्यासाठी तर कयामतचा दिवस प्रस्थापितच झाला. आपण रोज पाहतो की जगात येणारी प्रत्येक व्यक्ती आपापल्या वेळेवर हे जग सोडून जाते आणि जो एकदा या जगातून निघून जातो तो पुन्हा इथे येत नाही. आत्तापर्यंत कुणीही परत आला नाही आणि पुढेही येणार नाही. मरणाऱ्या व्यक्तीला मृत्यू येताच क्षणी कयामतच्या दिवशी घडणाऱ्या परिस्थितींचा प्रत्यक्ष अनुभव होण्यास सुरुवात होते आणि याच क्षणापासून व्यक्तीला बरे-वाईट परिणाम दिसू लागतात.

याविषयी एकदा आदरणीय पैगंबर (स) यांनी आपल्या सहाबीला (र) शिकवण देण्याच्या उद्देशाने जरा वेगळेही उत्तर दिले. त्याचा तपशील, हदीस नंबर 5009, मिश्कातुल्-मसाबीह या हदीस संग्रहात पाहावयास मिळतो. 

एकदा एका माणसाने विचारले की कयामत केव्हा येईल? आदरणीय पैगंबर (स) उत्तरले, तुम्ही त्यासाठी काय तयारी करून ठेवली आहे? तो म्हणाला, माझी तयारी एवढीच आहे की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांविषयी माझ्या मनात प्रेमभावना आहे. पैगंबर (स) म्हणाले तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याबरोबर राहाल

माणूस ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचा मनापासून आदर करतो. ज्यांच्यावर तो प्रेम करण्याचा दावा करतो त्यांचे अनुसरण करतो आणि आपल्या कृतीने त्यांना नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

........................ क्रमशः


अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget