संघटनांच्या वादात खेळाडूंचे नुकसान : क्रीडाप्रेमींतून नाराजीचा सूर
देशात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आल्याने आम-खास नागरिकांतून लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अशातच क्रीडा संघटनांतही स्वतःच्या स्वार्थापोटी फूट पाडली जात असल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे, अशी भावना व्यक्त होतेय.
नुकत्याच एका महिन्यात महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. पहिली कुस्ती स्पर्धा पुणे येथे पुणे कुस्तीगीर संघ , भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. येथे सिकंदर शेख ने शिवराज राक्षे या मल्लास नमवीत महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली.
उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीर या पठ्ठयावर मात करीत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. मात्र यापुढे महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र केसरी विजेत्याला दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, बक्षीस व नोकरी कोणत्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला देणार हा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही संघटना न्यायालयात गेल्याचे समजते.
एकीकडे असे वाटते की चला दोन संघटना का असेनात खेळाडूंना दोन्हीकडे आपले कसब आजमावता आले. मात्र महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीला संघटनांच्या वादामुळे कुठेतरी गालबोट लागल्याचे कुस्तीपटूतून आणि क्रीडाप्रेमींतून बोलले जाते. शिवाय, मल्लांना इकडेच कुस्ती खेळायची, तिकडे जायचे नाही, अशा आशयाची दमबाजी केल्याची कुजबूजही समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रातून भविष्यात ऑलम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नशीब आजमावणाऱ्या कुस्तीपटूंना संघटनांच्या राजकारणामुळे मोठा फटका बसेल असे बोलले जाते. क्रीडामंत्र्यांनी व शासनाने ठोस भूमिका घ्यावी व संघटनांनी सामंजस्यांने आपले वाद मिटवून कुस्तीपटूंचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणीही होत आहे. कुस्तीशिवाय अन्य खेळातही संघटनांच्या वादामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याने राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी याकडे जातीने लक्ष घालून वाद मिटवून महाराष्ट्रातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मोईज शेख यांनी केली आहे.
- बशीर शेख
Post a Comment