गत आठवड्यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपाने मुसंडी मारली. हा अनपेक्षित निकाल पाहून काँग्रेसच नव्हे तर काँग्रेस समर्थक जे पक्षाबाहेरचे आहेत त्यांनाही याचा मोठा धक्का बसला. यावेळी तरी काँग्रेस जिंकण्यासाठी निवडणूक लढणार अशी खात्री सामान्य माणसांनाच नव्हे तर बुद्धीजीवी, पत्रकार आणि प्रामाणिक काँग्रेस शुभचिंतकांना होती. पण तसे झाले नाही. काँग्रेसला जे करायचे होते म्हणजेच काँग्रेसमधील ज्यांनी 70 वर्षे सत्तेत राहून भलतीच श्रीमंती आणि मान सन्मान कमवला त्या लोकांनी म्हणजे 75-80 वर्षे वयाच्या काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक लढविली.
पण ती स्वतःसाठी, पक्षासाठी, देशासाठी की ज्या नागरिकांना काँग्रेसने निवडणुका जिंकाव्या असे वाटतात त्यांच्यासाठी. काँग्रेसमध्ये एक प्रकारची जहागीरदारी व्यवस्था आहे. सगळ्या वरच्या थरातील ही मंडळी जे स्वतःला नेते म्हणून मिरवितात ते आहेत. त्यांच्यानंतर मुख्य कार्यकर्ते आहेत. जे पक्षासाठी कमी आणि दलालीच्या कामाकरिता सामिल झालेले आहेत. आणि सर्वात शेवटी सामान्य प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. वरच्या थरातील जहागीरदार काँग्रेस नेत्यांना या प्रामाणिक कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही. सामान्य माणसांपर्यंत पोहोचणाऱ्या मंडळींचेच जर काही अस्तित्व राहिले नाही तर फटका नक्कीच बसणार. एक आणखीन गट आहे. काँग्रेसमध्ये असून भाजपाशी सहानुभूती असणारा त्यांचा जो भाग आहे तो सर्वांना माहित आहे.
तर अशा काँग्रेस पक्षाकडून सामान्य नागरिकांनी जिंकण्याची आशा करणे म्हणजे याला काय म्हणावे. भाजपा फक्त निवडणूक आहे म्हणून लढत नाही तर ती निवडणूक जिंकायचीच आहे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सर्वस्व पणाला लावत आहे. त्याचे कार्यकर्ते पक्षाला, पक्षाच्या विचार धारेला वाहून घेतलेले आहेत. त्यांचा मुकाबला अशा पक्षाशी ज्याने स्वतःची विचारधारा विसरलेली आहे. ज्या पक्षात सामान्य कार्यकर्ते, नेते कमी आणि जहागीरदार मंडळीच अधिक आहे अशा पक्षाला हरवणं भाजपासाठी सहज शक्य आहे. राष्ट्रीय पातळीवर तर विरोधी पक्षाची आघाडी केली पण सध्याच्या निवडणुकीत कोणत्याही घटक पक्षाला जवळ केले नाहीच तर त्याची चेष्टा केली. याचा अर्थ काय काँग्रेसला सत्तेत कोणाचा सहभाग नको? राजस्थानमध्ये एकीकडे गेली दोन वर्षापासून मला मुख्यमंत्री व्हायचंय अशा वल्गना सचिन पायलट करत होते. तर दुसरीकडे मीच मुख्यमंत्री राहणार असा अशोक गहलोत यांचा हट्ट. कमलनाथ यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मध्यप्रदेश मध्ये येण्यास मज्जाव केला. शेवटी ते हरले. त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद मिळविले होते पण ते पचवू शकले नव्हते. तरी पण त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले. ही काँग्रेस पक्षाची लाचारी पक्षश्रेष्ठींनी जर लाचारीच्या जागी दुसरा उमेदवार जाहीर केला असता तर कदाचित काँग्रेस पक्षाची अशी दयनीय स्थिती झाली नसती. कमलनाथ यांना इतका विश्वास होता की निवडणुका होण्याच्या अगोदर त्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावही निश्चित केली होती.
काँग्रेस पक्षाला ही शेवटची संधी सुधारण्यासाठी होती. यापुढे संधी मिळणार नाही. जर इंडिया आघाडी यशस्वी होत नाही किंवा इतर विरोधी पक्ष त्यांची साथ द्यायला तयार होत नसतील तर मग काँग्रेसने आपला गाशा गुंडाळलेला बरा. आम जनतेच्या आकांक्षा धुळीत मिळवू नयेत.
काँग्रेस पक्षाची स्थापना एक स्वयंसेवी संस्था म्हणून इंग्रजांनी केली होती. मात्र काँग्रेसने स्वातंत्र्यतेची चळवळ उभी केली आणि पुढे राजकीय पक्ष म्हणून देशभर विस्तार केला. काँग्रेस एक विचारधारा होती आणि जनतेच्या आशा आकांक्षांना पूर्ण करत स्वातंत्र्य मिळवून देणारा एक राजकीय पक्ष होता. उदारमतदवादी विचारधारा काँग्रेसचा गाभा होता म्हणून सर्व धर्म, जात, पंथाचे लोक याकडे आकर्षित झाले. काँग्रेस पक्षाचा विरोध करण्यास दूसरा कोणताच पक्ष नव्हता. त्याकाळी कोणाचे आव्हान नव्हते म्हणून की काय काँग्रेस नेत्यांमध्ये गर्व आणि अभिमान वाढत गेला. इतका की एकेकाळी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधी यांनी या गर्विष्ट अभिमानी नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आणि स्वतःचा नवीन पक्ष बनवला. सध्या हेच काम काँग्रेसमध्ये कोणीतरी करायला हवं. राहुल गांधी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला खरा पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हे दोन वेगळी गट आहेत. कॉँग्रेस पक्ष त्यांची साथ देईल यात शंका आहे. स्वतः राहुल गांधींकडे तसा अनुभव नसेल पण तो त्यांना कमवावा लागेल. 80 कोटी गरीब दुर्बल भोळ्या भाबड्या लोकांचा हा देश आहे. त्यांना एकाच पक्षाच्या स्वाधीन करू नये. आज ना उद्या राहुल गांधी यांनी हे काम करावेच लागणार आहे. पक्षातील गर्विष्ट जहागीरदार नेत्यांकडून काँग्रेसला पहिले वेगळे करावे लागेल आणि नंतर पक्षाचा विस्तार करावा लागेल. जर तसे झाले नाही तर 2024 नंतर पक्ष शिल्लक राहणार नाही.
जे झाले ते झाले. निवडणुका जिंकण,हरणं असतेच. जिंकण हे जर अंतिम ध्येय ठरवले तरच पक्ष पुन्हा उभा राहू शकतो.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment