Halloween Costume ideas 2015

स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत, त्या आधुनिक स्त्रीवादी आणि कृतिशील समाजसुधारक होत्या. शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी आजन्म कष्ट उपसले. धर्माच्या अन्यायी रूढी परंपरेच्या बेड्यात अडकलेल्या स्त्रीला स्वतंत्रपणे व मुक्तपणे जगण्याचा मंत्र दिला.अज्ञान अंध:कारात अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी स्त्रीशिक्षणाचा त्यांनी पाया रचला.

ज्योतिराव फुले यांच्या स्त्रियांना शिक्षित करण्याच्या लढ्यात सावित्रीबाई खांद्याला खांदा लावून सोबत होत्या. त्यांनीच सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची मशाल पेटवल्याने आजच्या पिढीतील ज्या सुशिक्षित महिला आहेत, त्यांच्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईंचा विवाह त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्याशी झाला, त्यावेळी सावित्रीबाईंचे वय ९ किंवा १० वर्षे होते. तर ज्योतिराव १३ वर्षांचे होते. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाई आणि सगुणाबाई शिरसागर या त्यांच्या चुलत बहिणीला त्यांच्या घरी शिक्षण दिले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी १८४८ साली पुण्यात  'भिडे वाडा ' येथे मोठ्या मुलींसाठी आधुनिक भारतातील पहिली शाळा सुरू केली.  दुर्दैवाने, सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या या शिक्षण प्रसाराच्या कार्याला सनातनी विचारांच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना दगड व शेणाचा मारा केला जात असे व शिवराळ भाषा वापरून त्यांना स्त्री शिक्षणाच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात असे, यांचे कारण म्हणजे मनुस्मृती आणि त्यांच्या सनातनी ब्राह्मणी ग्रंथांनुसार त्यांचे स्त्रीविषयक शिक्षणाचे कार्य हे पापकृत्य होते.त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर  ज्योतिरावांच्या वडिलांचे कान भरण्यात आले, परिणामी ज्योतिराव व सावित्रीबाई यांना घरातून बाहेर पडावे लागले. अशावेळी ज्योतिरावांचे एक मित्र उस्मान शेख व  फातिमा बेगम शेख हे  उभयतां त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले.

फातिमा बेगम शेख यांनी तर सावित्रीबाई यांच्या बरोबर सावलीप्रमाणे साथ केली.  ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा  असा विश्वास होता की, नैराश्यग्रस्त वर्गाला सक्षम बनविण्यासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. १८५० मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी दोन शैक्षणिक ट्रस्ट तयार केले. (१) नेटिव्ह, मेल स्कूल, पुणे आणि (२) सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग आणि इट्सेटरस. या ट्रस्टने सावित्रीबाई फुले आणि नंतर फातिमा शेख यांच्या दोन नेतृत्वात अनेक शाळांचा शुभारंभ केला.  या फुले दाम्पत्यांनी १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह अर्थात केअर सेंटर देखील उघडले आणि त्यांच्या प्रसूतीसाठी मदत केली.  सावित्रीबाई भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्याही होत्या. ते होम फॉर द प्रिव्हेंशन ऑफ इन्फँसिटी नावाचे महिला निवारा केंद्र सुरू केले.जेथे ब्राह्मण विधवा स्त्रियांना  सुरक्षितपणे प्रसूती करता येत असे शिवाय त्यांना हवे असल्यास त्यांना तेथे दत्तक अधिकार सोडू शकतात. पून:विवाहाचाही प्रचार त्यांनी केला आणि विधवा पुनर्विवाहाच्या पुरस्‍कार केला. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी सती प्रथेला विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि निराधार महिलांसाठी महिला गृह सुरू केले. त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक विवाह करण्याचा कृतीशील पुरस्कार केला, ज्यामध्ये विवाहात हुंडा, ब्राह्मण पुजारी किंवा ब्राह्मणी विधी यांचा समावेश नव्हता.

सावित्रीबाई ह्या लेखिका आणि कवयित्री सुध्दा होत्या. शिक्षणाचे मूल्य त्यांच्या पुस्तकांत आहे. काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर ही तिची कवितांची पुस्तके अनुक्रमे १८५४ आणि १८९२ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. 

सावित्रीबाईनी त्यांचा दत्तक यशवंत मुलगा याच्यासमवेत १८९७ मध्ये नालासोपारा येथे ब प्लेगच्या साथीच्या रोगाने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुक्त क्लिनिक उघडले.    प्लेगबाधीत रुग्णांवर उपचार करीत असतांनाच सावित्रीबाई फुले यांना प्लेगचा संसर्ग झाला आणि १० मार्च १८७९रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी अथक परिश्रम व चिकाटीने स्त्री शिक्षणाच्या पाया रचला, ज्या काळात स्त्री शुद्रादी शुद्र यांना धर्माच्या नावावर शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, त्या काळात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले त्यामुळेच आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत, हे आता सर्वमान्य झाले आहे.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget