(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)
इमाम शाफई (रह.) हे न्यायशास्त्रातील एक विश्वासू नाव. लोक त्यांच्याकडे जात असत. महिला आणि पुरुष दोघेही त्यांच्याकडे आपल्या समस्या आणत असत. ते इतक्या सहजतेने लोकांच्या समस्यांचे निराकरण करत की, लोक खूश होऊन जात. खटल्यांचा निवाडा अशा पद्धतीने करत की न्याय निवाड्यावर कोणालाच आक्षेप नसायचा.
एकदा त्यांच्याकडे एक बाई आली. ती खूप घाबरलेली होती. ती इमाम साहेबांना म्हणाली, "हे बघा, माझ्याकडे एक खजूर आहे, हे माझ्या पतीने मला दिले आणि म्हणाले की, जर तू हे खजूर खाल्ले तर तुला घटस्फोट आणि फेकून दिले तरी तुला घटस्फोट. माझे वैवाहिक जीवन संकटात सापडले आहे. मला काही तरी मार्ग सांगा. मी काय करू?"
मामला गंभीर होता. जर योग्य मार्ग दाखवला गेला नाही तर बिचारीचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याची दाट शक्यता होती. पत्नीला या गोष्टीची जाणीव होती की, या संकटातून आपल्याला इमाम साहेबच वाचवू शकतात. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि याच अपेक्षेने ती इमाम साहेबांकडे आली होती.
इमाम साहेबांनी थोडा वेळ विचार केला आणि मग तिला म्हणाले, "अर्धे खा, अर्धे फेकून दे."
अर्थात अर्धी खजूर खा आणि अर्धी फेकून दे. ती स्त्री आनंदाने तिच्या नवऱ्याकडे गेली. तिने त्याच्यासमोर अर्धी खजूर खाल्ली आणि अर्धी फेकून दिली.
हे पाहून नवरा स्तब्ध झाला. एवढं चातुर्य पत्नीकडे आले कोठून याचाच तो विचार करू लागला. नंतर त्याला समजले की, पत्नीने इमाम साहेबांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तेंव्हा त्याला इमाम साहेबांच्या चातुर्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी सांगितलेला उपाय देखील गंमतीदार वाटला.
मोठा कोण?
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे एक लाडके काका होते. त्यांचे नाव हजरत अब्बास (र.) होते. हजरत अब्बास, अतिशय सभ्य होते. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आणि समोरील व्यक्तीच्या मोठेपणात फरक पडणार नाही अशा पद्धतीने बोलत. आपल्या पुतण्यावर जीवापाड प्रेम करायचे.
एकदा खूप मजा आली. हजरत अब्बास (रजि.) यांना एका गृहस्थाने विचारले, "तुम्ही मोठे आहात की प्रिय प्रेषित मुहम्मद (स.)?"
प्रश्न ऐकून हजरत अब्बास हसले. ते का हसले असतील बरं. मुद्दा असा होता की हजरत अब्बास हे पैगंबर (स.) यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, परंतु पैगंबर (स.) दर्जाच्या बाबतीत सर्व लोकांपेक्षा मोठे आहेत. प्रश्न विचारणाऱ्यालाही वयाच्या बाबतीतच जाणून घ्यायचे होते की वयाने कोण मोठा आहे. परंतु आदरणीय अब्बास (रजि.) यांनी वेगळा विचार केला. पैगंबरांपेक्षा मी मोठा आहे असे म्हणणे, हजरत अब्बास (रजि.) यांना योग्य वाटले नाही. प्रेषितांचा आदर सन्मानही बाधित होणार नाही याची काळजी ते घेत.
तेंव्हा त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर अशा काही पद्धतीने दिले की, पैगंबरांचा आदर सन्मानही अबाधित राहिला आणि ऐकणाऱ्यांनाही त्यांच्या उत्तराने आनंद मिळाला. सर्व लोक आनंदी झाले आणि सर्वांना खूप गंमत वाटली. हजरत अब्बास (र.) यांनी उत्तर दिले की, "ऐका बंधुंनो, मोठे तर पैगंबरच (स.) आहेत पण, मी आधी जन्माला आलो!"
किती छान उत्तर दिलं. मजेशीर आणि तितकंच खरं.
- सय्यद झाकीर अली
परभणी,
9028065881
Post a Comment