(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)
हजरत मुआविया (र.) हे प्रिय पैगंबर (स.) यांचे सहकारी होते. ते खूप हुशार आणि समजूतदार होते. कुणी कितीही धूर्त नि चलाक असला तरी तो हजरत मुआवियाला फसवू किंवा ठगू शकत नाही हे प्रसिद्ध होते. पुढे जाऊन हजरत मुआविया (र.) मुस्लिमांचे खलिफा झाले. ते खूप उदार होते आणि राग आला तर गिळून घ्यायचे.
आता त्यांची एक मजेदार गोष्ट पाहू. एक माणूस होता, जो खूप हुशार नि धूर्त होता. त्याने ऐकले की हजरत मुआविया (र.) खूप उदार आहेत. त्यांच्या समोर कोणी काही मागितले तर रिकाम्या हाताने कधीच परत पाठवत नाहीत. चांगलं भरभरून दान देतात. मगणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक देतात. हे ऐकून या माणसाला वाटलं, जर आपण त्यांच्याशी आपले नाते संबंध सांगितले तर, मुआविया (र.) आपल्याला खूप काही देतील. इतरांच्या तुलनेत आपल्याला अधिक संपत्ती मिळेल. या लालसेने त्याने मुआवियाशी (र.) एक नातं शोधून काढलं. तो मुआवियाकडे (र.) गेला आणि म्हणाला, "मी तुमचा भाऊ आहे. तुम्ही आणि मी एकाच आईबापाची मुले आहोत."
हजरत मुआविया (र.) यांनी त्याला ओळखले नाही. म्हणाले, "भावा मी तुला ओळखले नाही, काही खूण तरी सांगा." तो म्हणाला, "हे पाहा, सर्व मानव आदम आणि हव्वा ( जगात आलेले पाहिले स्त्री आणि पुरुष ) यांची संतती आहेत. या नात्याने मी तुमचा भाऊ आहे की नाही?"
त्याचा धूर्तपणा पाहून हजरत मुआविया (र.) म्हणाले, "खरंच तू माझा भाऊ आहेस, ठीक आहे. बस."
तो माणूस खाली बसला आणि म्हणाला, "हे मुआविया, भावाचा हक्क भावाला दे. मी खूप गरीब माणूस आहे."
हजरत मुआविया (र.) हसले आणि समजले की, या व्यक्तीला धूर्तपणे काहीतरी मिळवायचे आहे. त्याचा धूर्तपणा लक्षात आल्यावर मुआविया (र.) यांनी मोठ्या गमतीदार पद्धतीने त्याच्या धूर्तपणाला उत्तर दिले. मुआविया यांनी आदेश दिला की, "माझा हा भाऊ आहे. त्याला एक दिरहम (सुमारे पंचवीस नवीन नाणी) द्या."
ही आज्ञा ऐकल्यावर तो धूर्त माणूस म्हणाला, "भावाचा हक्क एवढाच!"
हजरत मुआवियाने (र.) उत्तर दिले, ''भाऊ! एक दिरहम सुद्धा खूप जास्त आहे, घेऊन टाक, ज्या नात्यातून तू माझा भाऊ बनला आहेस, त्या नातेसंबंधाने सर्व जगाचे लोक माझे भाऊ आहेत. मी जर माझी संपत्ती सर्वांमध्ये समान वाटली तर करोडो लोकांमध्ये एक एक पैसाही बरोबर मिळणार नाही."
हे ऐकून तो माणूस तोंड बंद करून आणि एक दिरहम घेऊन निघून गेला. सगळीकडे असे सांगत फिरला की खरोखर, कोणीही मुआवियाला (र.) फसवू शकत नाही किंवा ठगू शकत नाही.
'आपण सर्वजण वजू करू या'
ही गोष्ट वाचण्यापूर्वी आपण वुजू काय आहे हे समजून घेऊया. वुजू ही थोडक्यात हात पाय धुण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मुस्लिम बांधव नमाज पठण करावयाची असल्यास किंवा कुरआन पठण करावयाचे असल्यास त्यापूर्वी एका विशिष्ट पद्धतीने हात, पाय, चेहरा स्वच्छ धुऊन घेतात. त्याला वुजू असे म्हणतात. वुजू केल्याशिवाय कोणी नमाज किंवा कुरआन पठण करत नाही. मस्जिदमध्ये प्रवेश करावयाचे असल्यास देखील वुजू करणे उचित असते.
एकदा वुजू केलेला असताना जर एखादी व्यक्ती प्रातर्विधी किंवा लघुशंकेसाठी जाऊन आली तर त्याला पुन्हा वुजू करावे लागते. एवढेच नव्हे तर, एखाद्याचे आपान वायू (पाद) निघाले असेल तरी देखील वुजू करणे आवश्यक असते.
एकदाची गोष्ट आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसले होते. प्रिय साथीदार त्यांच्या शेजारी बसले होते. हजरत अब्बास यांचाही त्यात समावेश होता. गप्पा चालू असताना पैगंबर (स.) यांना दुर्गंधी जाणवली. त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी आपान वायू (पाद) सोडले.
प्रेषित म्हणाले, "ज्याने कोणी आपान वायू सोडला आहे त्याने उठून जाऊन वुजू करावे."
त्यांच्या आज्ञेने कोणीच उठले नाही. मुद्दा असा होता की, ज्यांचा आपान वायू सुटला होता ते शरमेने उठले नाहीत. प्रिय पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) पुन्हा तेच बोलले. पुन्हा कोणीच उठले नाहीत.
हजरत अब्बास (र.) यांना समजले की, ते जे कोणी असेल ते लाजेने उठत नाहीत, मी पादले हे लोकांना कळेल. याची त्यांना लाज वाटत असावी. बरं, आता पाहा हजरत अब्बास इतके युक्तीपूर्ण आणि विनम्रपणे म्हणाले, की प्रेषितांच्या आदेशाचे पालनही झाले आणि पादणारी व्यक्ती कोण हेही कोणाला समजले नाही.
हजरत अब्बास (र.) पैगंबरांना म्हणाले: 'जर तुम्ही असे म्हणत असाल तर आम्ही सर्वजण वुज़ू करून घ्यावे का?"
प्रेषित मुहम्मद (स.) आणि सर्व सोबती यावर आनंदी झाले. प्रेषित मुहम्मद (स.) यांना हजरत अब्बास (र.) यांचे युक्तिशिर बोलणे आवडले. सर्वांना त्याचा आनंद झाला.
- सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment