माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणता ऐकले की, ''ज्या संपत्तीतून 'जकात' काढण्यात आली नाही आणि ती त्यातच मिसळली गेली तर ती त्या संपत्तीचा विनाश करून टाकते.'' (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण
'विनाश करणे' म्हणजे असे नाही की एखाद्या मनुष्याने 'जकात' दिली नाही आणि स्वत:च खाल्ली तर कोणत्याही स्थितीत त्याची सर्व संपत्ती नष्ट होईल, असे नाही तर 'विनाश' म्हणजे ज्या संपत्तीपासून लाभ घेण्याचा त्याला अधिकार नव्हता आणि तो गरिबांचा हिस्सा होता, ती संपत्ती खाऊन त्याने आपल्या 'दीन' (जीवनधर्म) आणि ईमानचा विनाश केला. इमाम हंबल यांनी हेच स्पष्टीकरण दिले आहे आणि असेही आढळून आले आहे की 'जकात' खाणाऱ्याची संपूर्ण संपत्ती अचानक नष्ट झाली आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी 'फितरा'च्या 'जकात'ला लोकसमुदायावर अनिवार्य केले जेणेकरून ती उपवासाच्या (रोजाच्या) स्थितीत रोजादारद्वारा घडणाऱ्या व्यर्थ आणि निर्लज्जपणाच्या गोष्टींचे (पापांचे) प्रायश्चित्त बनावी आणि गरिबांच्या आणि गरजवंतांच्या भोजनाचे नियोजन व्हावे. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
'सदका-ए-फित्र'ला 'शरियत' (इस्लामी धर्मशास्त्र) मध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत दोन वैशिष्ट्ये कार्यरत आहेत. एक रोजादाराकडून उपवासाच्या स्थितीत प्रयत्न करूनसुद्धा घडलेल्या त्रुटी व चुकाची त्या (सदका-ए-फित्र) द्वारे नुकसानभरपाई होते; आणि दुसरा उद्देश असा आहे की ज्या दिवशी सर्व मुस्लिम ईदचा आनंदोत्सव साजरा करीत असतील त्या दिवशी समाजातील गरीब लोक त्या आनंदापासून वंचित न राहता त्यांच्या भोजनाचे थोड्या-फार प्रमाणात का होईना नियोजन व्हावे. याच कारणास्तव मुस्लिमांच्या घरातील सर्वच लोकांवर 'फित्रा' (धर्मदान) अनिवार्य करण्यात आले आहे आणि ईदच्या नमाजपूर्वी त्याचे वितरण करण्यास सांगितले गेले आहे.
माननीय इब्ने उमर यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''पावसाच्या पाण्याने अथवा पाण्याचा ओढा - लहान नदी सिंचित करण्यात येणारी जमीन अथवा नदीकाठच्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दहावा भाग 'जकात' स्वरूपात वेगळा करण्यात येईल आणि ज्या जमिनीला मजूर लावून सिंचित करण्यात येते त्या जमिनीतील उत्पन्नाच्या विसावा भाग गरिबांसाठी `जकात'स्वरूपात वेगळा करण्यात येतो.'' (हदीस : बुखारी)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment