पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''निश्चितच अल्लाहने लोकांवर `सदका' (दानधर्म) अनिवार्य केला आहे, जो त्यांच्यापैकी श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल आणि त्यांच्यापैकी गरजवंतांमध्ये परतविला जाईल.'' (हदीस : मुत्तफ़क़ अलैहि)
स्पष्टीकरण : 'सदका' हा शब्द 'जकात' (ऐपतीप्रमाणे अनिवार्य दान) साठीही वापरला जातो, जी देणे आवश्यक आहे आणि येथे हाच अर्थबोध होतो. एखाद्या मनुष्याने स्वखुशीने अल्लाहच्या मार्गात खर्च केलेल्या संपत्तीवरदेखील जारी होत असतो. या हदीसमधील 'तुरद्दु' (परतविला जाईल) या शब्दाने स्पष्ट होते की श्रीमंतांकडून वसूल करण्यात आलेली 'जकात'वर खरे तर समाजातील गरीब आणि गरजवंतांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळवून दिला जाईल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''ज्या मनुष्याला अल्लाहने संपत्ती प्रदान केली आणि मग त्याने त्या संपत्तीची 'जकात' अदा केली नाही, त्याची संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामत) डोक्यावर दोन काळे ठिपके असलेल्या (हा अतिशय विषारी होणाचा संकेत आहे) अत्यंत विषारी सापाचे रूप धारण करील आणि तो त्याच्या गळयातील जोखड बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना हा साप पकडेल आणि म्हणेल, मी तुझी संपत्ती आहे, मी तुझा खजिना आहे.''
मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या या आयतीचे पठण केले, ''वला यहसबन्नल लज़ीना यबख़लूना.''
(हदीस : सहीह बुखारी)
स्पष्टीकरण : आपली संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यात कंजूषी करणारे लोकांनी असे समजू नये की त्यांची ही कंजूषी त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल, मात्र ती त्याच्यासाठी वाईट सिद्ध होईल. त्यांची ही संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्या गळयातील जोखड बनेल. म्हणजे ती त्यांच्यासाठी विध्वंस व विनाशाचे कारण ठरेल.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment