जशी-जशी देशाची संसाधने मुठभर लोकांच्या हातात एकवटत आहेत, राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचार हिमालयासारखा वाढत आहे तशी-तशी देशात गरीबी वाढत आहे. याच आठवड्यात रायगडच्या गोरेगावमध्ये रिना जयमोहन नायर आणि त्यांच्या दोन मुली लक्ष्मी (11) व जिया (14) यांनी गेल्या शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ’कोकण कन्या’ एक्सप्रेसखाली स्वतःला झोकनू देत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येसंबंधी आपल्या वहिणीला मॅसेज करून कळविले होते की, आर्थिक विवंचनेमुळे जगणे शक्य नसल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. रायगड पोलिसांनीही या कारणाची पुष्टी केलेली आहे. दुसऱ्या एका घटनेत अवकाळी पावसामुळे झालेल्या हानीचा फटका बसल्यामुळे तळेगाव रोही येथील एका शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या समोरच त्या नुकसानीची पाहणी करण्यास आल्या असता स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बेरोजगारी
उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’कमाता बेटा और नांदती बेटी सबको अच्छे लगते हैं’. एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक तरूणांकडून समाज कामधंद्याची अपेक्षा करतो. ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तरूणांवर घरातून आणि बाहेरून इतका दबाव वाढतो की, त्याची अंतिम परिणीती बेरोजगार तरूणांच्या आत्महत्येमध्ये होते. बीबीसीच्या 11 फेब्रुवारी 2022 च्या बातमीपत्रात असे म्हटले होते की, राज्यसभेमध्ये गृहमंत्री नित्यानंद रॉय यांनी बेरोजगारीच्या कारणावरून तरूणांच्या आत्महत्येची माहिती देताना सांगितले की, 2018 मध्ये 2741 तर 2019 मध्ये 2851 तर 2020 मध्ये 3548 बेरोजगार तरूणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्नाच्या भीषणतेची कल्पना येण्यास हरकत नाही. कमावते वय झाल्यानंतर बेरोजगार राहिल्यानंतर अनेक समस्यांना तरूणांना तोंड द्यावे लागते. लग्न वेळेवर होत नाही, झाले तरी अनुरूप स्थळ मिळत नाही, लग्नानंतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो, लग्न केले नाही तर अनेक मानसिक समस्या उत्पन्न होतात, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पाय घसरण्याचा संभव असतो, त्यातून समाजात अनैतिकता वाढते त्यामुळे समाज नासतो, अनेक तरूण मनोरूग्ण होऊन जातात, एकांतप्रिय होऊन जातात, परवडेल ते व्यसन करण्यास सुरूवात करतात. जे हे सर्व दबाव सहन करू शकत नाहीत ते शेवटी आत्महत्या करतात. कोरोनानंतर बेरोजगार झालेल्या तरूणाांना स्वतःला सावरण्यामध्ये अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त होत आहेत, असा कयास केल्यास वावगे होणार नाही.
बेरोजगारीची ही भयान परिस्थिती किती जीवघेणी आहे याचा अंदाज गेल्या तीन वर्षाचे व्यक्तीगत ऋण (पर्सनल लोन) आणि गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या प्रचंड संख्येवरून करता येईल. गेल्या एका वर्षात जून 2022 ते सप्टेंबर 2023 असे लोन घेणाऱ्यांची संख्या 20 ते 23 टक्क्यांनी देशभरात वाढलेली आहे. पर्सनल लोन म्हणजे इएमआयवर घेतलेल्या वस्तूंचे लोन नव्हे. जेव्हा उपजिविकेचे सर्व आर्थिक मार्ग बंद होतात तेव्हा भारतीय माणूस सोने गहाण ठेवून किंवा पर्सनल लोन घेवून आपल्या गरजा भागवितो. असे लोन घेणारे तीस कोटी कुटुंब देशात असावेत, असा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून काढता येवू शकतो. पर्सनल लोन हे (असुरक्षित ऋण)अनसेक्युअर्ड लोन समजले जाते. कारण यात कुठलेही तारण न घेता ग्राहकाची व्यक्तीगत पत गृहित धरून लोन दिले जाते. जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले की, अशा प्रकारचे लोन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तेव्हा नुकतीच एक अॅडव्हायझरी जारी करून रिझर्व्ह बँकेने सिक्युरिटी न घेता अशा प्रकारचे लोन बँकांनी देवू नयेत, असे सक्तीचे आदेश दिलेले आहेत. याचाच अर्थ आता या पुढे लोकांना पर्सनल लोन सुद्धा मिळणे शक्य होणार नाही. ही एकंदरित अशी परिस्थिती आहे जिच्यावर प्रत्येक जबाबदार नागरिकाने गांभीर्याने विचार करायला हवा.
नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका संपल्या. त्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला ते पाहता एक गोष्ट लक्षात येते की, राजकीय लोकांकडे अमाप पैसा साठविलेला आहे. पैसा नाही तर फक्त गरीबांच्या हातात नाही. म्हणूनच देशातील 80 कोटी जनता सरकारकडून मिळत असलेल्या मोफत अन्नधान्यावर कसेबसे जीवन जगत आहे. भारतासारख्या अमाप खनीज संपत्तीने, नदी नाल्याने, तीन ऋतूने नटलेल्या देशातील अर्ध्यापक्षा जास्त लोकसंख्या सन्मानाने दोन वेळेसचे अन्नसुद्धा स्वतःहून कमावू शकत नसेल तर हे आपल्या आतापर्यंत आलेल्या सर्व सरकारांचे अपयश आहे, हाच याचा अर्थ होतो.
देशाला स्वतंत्र होवून 75 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे आणि देशाची ही आजची भयानक अवस्था आहे. एकीकडे मूठभर औद्योगिक घराण्यांची आणि सर्वपक्षीय प्रथम फळीतील राजकीय नेत्यांची संख्या कॅन्सरप्रमाणे वाढत आहे आणि दुसरीकडे बेरोजगारीने थैमान घातलेले आहे. लोकांना हातातोंडाची गाठ घालणे जिकरीचे होवून बसले आहे. शहरांचा विकास वेगात होत असून तितक्याच वेगात ग्रामीण भाग गरीबीच्या खाईत लोटला जात आहे. या स्थितीला देश ज्या कारणामुळे आलेला आहे त्यातील पहिले कारण : क्रोनी कॅपीटॅलिजम आहे. क्रोनी कॅपिटॅलिझम म्हणजे सरकार आणि भांडवलदारांची अभद्र युुती होय. इले्नशन बाँडच्या माध्यमातून अमर्याद धन देशातील भांडवलदार राजकीय पक्षांना देत आहेत. विशेष म्हणजे हे धन गुप्त दान दिल्यासारखे आहे. कोणत्या पक्षाला किती धन दिले आहे याची माहिती माहिती अधिकारात तर सोडा सर्वोच्च न्यायालयालाही विचारण्याचा अधिकार नाही. यामुळे भ्रष्ट मार्गाने कमाविलेला काळा पैसा मोजकेच भांडवलदार या पक्षांना देऊन आपल्यासाठी लाभदायक नीति सरकारकडून तयार करवून घेत आहेत.
देशातील खनीज संपत्ती बंदरे, विमानतळे, आणि जंगले दोनच व्यक्तींच्या मालकीत देणे म्हणजे क्रोनी कॅपिटलिझमची परिसिमा आहे. हा भ्रष्टाचार नाही तर देशद्रोह आहे जे की सध्याचे केंद्र सरकार करत आहे. अशा प्रकारे देशाची साधनसंपत्ती मूठभर लोकांच्या हातात केंद्रीत झाली तर कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात बाकीचे लोक गरीबीच्या खाइत लोटले जाणार नाहीत तर काय होणार? यात नवल ते कसे. गरीबीचे दूसरे कारण भ्रष्टाचार असून, देशात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे याची उदाहरणं खालील प्रमाणे देता येतील. पहिले उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री हेल्थ इन्शुरन्स स्कीम अर्थात ’आयुष्यमान भारत योजने’मधील झालेल्या भ्रष्टाचारचे होय.
कॅगचा अहवाल
यावर्षी संसदेच्या मान्सून सत्रामध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. ज्यात सरकारी कामकाजामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. उदा. आयुष्यमान भारत योजना जी की पंतप्रधानांच्या नावाशी थेट जोडलेली आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या निदर्शनास आलेले आहे. कॅगचा असा आरोप आहे की, या योजनेचा वित्तीय लाभ बोगस नावे दाखवून उचलण्यात आला आहे. 9999999999 या मोबाईल क्रमांकावर 7.5 लक्ष लोकांनी तर 8888888888 वर 1.3 लक्ष याशिवाय 9000000000 वर ही अनेक बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. केवळ 7 आधार कार्डवर 4 हजार 741 बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी नोव्हेंबर 2022 पर्यंतचीच आहे. वाचकांना आश्चर्य वाटेल की या सरकारी योजनेचा लाभ 24 कोटी लोकांना झालेला आहे. कोट्यावधी रूपयांचा खर्च यातील बोगस लाभार्थ्यांवर झालेला आहे. असा बोगस खर्च सर्वाधिक 22.4 कोटी तामिळनाडूमध्ये, 4.65 कोटी कर्नाटकात तर महाराष्ट्रामध्ये 1.47 कोटी झालेला आहे. रिपोर्टमध्ये असे सुद्धा म्हटलेले आहे की, यात अनेक लाभार्थी असे आहेत जे कित्येक दिवसांपुर्वीच मरण पावलेले आहेत. जवळ-जवळ 88760 मृत लोकांच्या नावावर 2.15 लाख दावे दाखल करण्यात आलेले आहेत.
शिवाय, एस.बी.आय. ला न मागताच 8 हजार 800 कोटी रूपये वित्तीय सेवा विभागाने दिले असल्याचा ठपका कॅगने ठेवलेला आहे. याशिवाय नवीन विमानाचे मार्ग सुरू करण्याच्या योजनेमध्येही घोटाळा झाला असून, सर्वात मोठा घोटाळा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यामध्ये झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. रस्ते बांधणीमध्ये चढ्या दराने ठेकेदारांना रकमा दिल्या गेल्याचा ठपका रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांकांच्या शिष्यवृत्तीमध्येही घोटाळा झाला असून, 1572 संस्थांमध्ये केलेल्या चौकशीत 830 संस्था म्हणजे 53 टक्के संस्था ज्या बंद होत्या त्यांनाही नियमित शिष्यवृत्ती देण्यात आली होती, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. थोडक्यात 7 प्रकारचे मोठे घोटाळे कॅगने उघडकीस आणलेले आहेत. संघाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेले भाजपचे मंत्रीमंडळ आणि त्यातील मंत्री एवढा मोठा भ्रष्टाचार करूच कसे शकतात ही आश्चर्यजनक बाब आहे. परंतु याचे आश्चर्य कोणालाच झाले नसल्याचे दिसून येते.
थोडक्यात नेहरूंच्या पहिल्या मंत्रीमंडळात संरक्षण विभागात झालेल्या जीप घोटाळ्यापासून ते आज अस्तित्वात असलेल्या व स्वतःला राष्ट्रहितवादी म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारच्या आयुष्यमान योजनेच्या घोटाळ्यापर्यंत सर्वच मंत्रीमंडळं भ्रष्ट निघालेली आहेत. कोणत्याही सरकारची कोणतीही टर्म भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय पूर्ण झालेली नाही. कॅगच्या अहवालामध्ये राफेल घोटाळ्यासंबंधी काय लिहिलेले आहे याबद्दल कुठलीच माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. त्यामुळे त्या संदर्भात भाष्य करणे शक्य नाही.
भ्रष्टाचार का केला जातो?
माणूस स्वार्थी असतो. त्याला स्वतःच्या स्वार्थी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ ’भ्रष्टाचार करू नका’ असा सुभाषितवजा सल्ला देऊन भागत नाही. त्याच्या आंतरमनाला झोंबेल तेव्हाच तो या प्रवृत्तीवर विजय मिळवू शकतो. या प्रवृत्तीवर विजय मिळविण्याचे सर्वोत्कृष्ट मेकॅनिझम इस्लाममध्ये दिलेले आहे. इस्लामी इबादती या माणसाला स्वार्थी बनविण्यापासून फक्त वाचवितच नाहीत तर मानवतेच्या हितासाठी त्याग करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात. इस्लामी इबादतींमुळे माणसाच्या मनामध्ये ईश्वराची भीती निर्माण होते व तो संधी उपलब्ध असली तरी भ्रष्टाचार करत नाही. याची सुरूवात रमजानच्या रोजांपासून होते. 8 ते 10 वर्षांची कोवळी मुलं जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा प्रचंड तहाण लागलेली असतांना व पाणी उपलब्ध असतांना तसेच कोणीही पाहत नसताना सुद्धा पाण्याचा एक घोट पीत नाहीत. जीव कासाविस होत असतो. पाणी उपलब्ध असतं. तरीपण मुलं पाणी पीत नाहीत, याचे कारण रोज्यांमुळे त्यांच्या मनामध्ये एवढी अध्यात्मिक उर्जा निर्माण होते की ते आपल्या भूक आणि तहान या दोन्हीवर विजय प्राप्त करतात. ज्या पद्धतीने रोजा हा माणसामध्ये ईशभय वृद्धींगत करतो त्याचप्रमाणे पाचवेळेसची नमाज ही सुद्धा माणसाला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवण्यास मोलाची मदत करते. फजरची नमाज अदा करून आपल्या कार्यालयात किंवा व्यवसायात आलेल्या मुस्लिम व्यक्तीसमोर भ्रष्टाचार करण्याची संधी मिळाली तरी त्याने अदा केलेली फजरची नमाज त्याला त्या भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यास मदत करते. लगेच दुपारी जोहोरची नमाज येते, मगर असर, मगरीब आणि इशा या पाचही नमाजांच्या दरम्यान काळात मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या संधी एक नमाजी व्यक्ती स्वेच्छेने सोडतो. त्यातून मिळत असणारा अनुचित लाभ स्वेच्छेने सोडतो. या संदर्भात कुरआनमधील खालील आयातीचे विश्लेषण करताना जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात-
ऐ पैग़म्बर...! इनसे कहे दो कि पाक और नापाक बरहाल बराबर नहीं है, चाहे नापाक की बहुतायत तुम्हें कितनी ही लुभाने वाली हो. (सूरे माईदा आ नं 100)
इन्सान की नज़र में 5 रुपये के मुक़ाबले में 100 रुपये यक़ीनी तौर पर ज्यादा क़ीमती हैं, क्योकि और वे 100, लेकिन ये आयत कहती है कि 100 रुपये अगर ख़ुदा की नाफरमानी करके हासिल किए गए हों तो वे नापाक हैं और 5 रुपये अगर ख़ुदा की फरमाँबरदारी करते हुए कमाए गए हैं तो वे पाक हैं और नापाक चाहे मिक़दार में कितना ही ज्यादा क्यों न हो बहरहाल वह पाक के बराबर किसी तरह नहीं हो सकता. गन्दगी के एक ढेर से इत्र की एक बूँद ज्यादा क़ीमत रखती है. पेशाब से भरी हुई एक नाँद के मुक़ाबले में पाक पानी का एक चुल्लू ज्यादा वज़नी है. इसलिए एक सच्चे अक्लमन्द इनसान को लाज़िमी तौर पर हलाल ही से काम चलाना चाहिए, चाहे वह ज़ाहिर में कितना ही मामूली और थोड़ा हो और हराम की तरफ किसी हाल में भी हाथ नहीं बढ़ाना चाहिए, चाहे वह देखने में कितना ही ज़्यादा और शानदार हो. (तफहिमुल कुरआन हिंदी खंड 1 पेज नं हाशिया नं 115)
या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला असून, भ्रष्टाचाराला समाजमान्यता मिळालेली आहे. नेते सर्वाधिक भ्रष्ट आहेत. हे माहित असतांनासुद्धा समाज त्यांचा तिरस्कार न करता त्यांची हांजीहांजी करतो. समाजात ज्या वाईट गोष्टी प्रचलित होऊन जातात काही काळानंतर त्या वाईट वाटेनाशा होतात. भ्रष्टाचार केवळ आर्थिक भ्रष्टाचारच नाही तर सर्व प्रकारचे भ्रष्ट आचरण म्हणजेच भ्रष्टाचार. मात्र आर्थिक भ्रष्टाचाराचा फटका इतर भ्रष्ट आचरणाच्या तुलनेत जास्त लोकांना बसतो. थोडक्यात भ्रष्टाचारापासून केवळ इस्लामी आस्थाच माणसाला रोखू शकते. हेच सत्य आहे. मग कोणाला हे पटो की न पटो. म्हणून भारतीय मुस्लिमांची ही राष्ट्रीय तसेच धार्मिक जबाबदारी आहे की त्यांनी दैनंदिन व्यवहारात भ्रष्टाचार मुक्त व्यवहार करून बहुसंख्य बांधवांपुढे इस्लामी संस्कारांचे प्रत्यक्ष दर्शन घडवावे. जेणेकरून इबादतींचे मेकॅनिझम खरोखरच माणसाला भ्रष्ट आचरणापासून रोखण्यात यशस्वी ठरते, याची त्यांना खात्री होईल.
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment