(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)
मुल्ला नसरुद्दीनचे असंख्य किस्से, आपण वाचले असतील पण बहुत्तेक लोकांना हे माहित नसेल की, मुल्ला नसरुद्दीन हे काल्पनिक पात्र नसून खरे पात्र होते. त्यांचा जन्म 1208 साली तुर्कस्तानच्या 'हशार' प्रांतात असलेल्या "हुरतू" नावाच्या गावात झाला.
मुल्ला नसरुद्दीन हे त्यांच्या विनोदी प्रतिवादासाठी आणि हजरजबाबीसाठी प्रसिद्ध होते. आज मुल्लाचे विनोद जगाच्या विविध भागांमध्ये पोहचले आहेत. त्यांची कीर्ती तुर्कीपासून जगातील विविध देशांमध्ये पसरली.
त्यांच्याशी संबंधित काही रंजक आणि मजेशीर घटना खाली देत आहे.
----------
"तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार की गाढवावर?"
एकदा मुल्ला नसरुद्दीनआपल्या घराच्या अंगणात बसले होते. त्यांचा एक मित्र आला आणि त्याने विचारले की, 'मुल्ला, मला काही महत्त्वाच्या कामासाठी जवळच्या गावात जायचे आहे, काही सामानही घेऊन जायचे आहे, कृपया मला गाढव द्या, मी जाऊन संध्याकाळी परत येईन.'
मुल्लाला आपल्या मित्राला गाढव द्यायचे नसल्याने, गाढव घरी नाही कोणीतरी गाढव घेवून गेल्याचे सांगितले. इतक्यात घराच्या मागून गाढवाच्या ओरडण्याचा आवाज आला. मित्र म्हणाला, "गाढव तर इथेच दिसतोय!"
मुल्लाने उत्तरात विचारले की, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार की, गाढवावर?"
-------------
मुल्ला नसरुद्दीनचा सल्ला
एकदा मुल्ला नसरुद्दीनला एका मेळाव्यात जबरदस्तीने स्टेजवर बोलावले आणि काही सल्ला देण्यास सांगितले गेले. मुल्ला नसरुद्दीन स्टेजवर आले आणि श्रोत्यांना विचारले, "तुम्हाला माहित आहे का मी काय बोलणार आहे?"
लोक म्हणाले, "नाही."
मुल्ला म्हणाले, "तुम्हाला माहीत नसताना सांगून काय उपयोग."
काही दिवसांनी मुल्लाला पुन्हा एका मेळाव्यात पकडण्यात आले आणि त्यांना सल्ला देण्याची विनवणी करण्यात आली. मुल्लाने तोच जुना प्रश्न पुन्हा विचारला, "तुम्हाला माहित आहे का मी काय बोलणार आहे?"
मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेवून सर्वांनी उत्तर दिले, “हो.”
मुल्ला म्हणाले, “जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, मी काय सांगणार आहे तर सांगायची गरज काय?"
तिसर्यांदा पुन्हा मुल्लाला, सल्ला द्यायला सांगितले. मुल्लाने त्यांच्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली. सुज्ञपणे, निम्म्या श्रोत्यांनी नकारात्मक आणि निम्म्या श्रोत्यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला. मुल्ला म्हणाले, "ज्यांना मी काय सांगणार आहे हे माहीत आहे, त्यांनी ज्यांना माहीत नाही त्यांना ते सांगावे."
एवढे बोलून ते स्टेजवरून खाली उतरले.
----------------
पत्र वाचा
एक अशिक्षित जमीनदार पत्र घेऊन
मुल्ला नसरुद्दीन यांच्याकडे आला. मुल्लाने मोठी पगडी घातली होती. त्याकाळी पगडी हे विद्वानांचे लक्षण मानले जात असे. जमीनदाराने मुल्लाला पत्र वाचायला सांगितले.
मुल्ला म्हणाले, "मी ते पत्र वाचू शकत नाही."
जमीनदार म्हणाला, "आपण एवढी मोठी पगडी घातली आहे आणि आपल्याला पत्र वाचता येत नाही!"
मुल्लाने ताबडतोब डोक्यावरून पगडी काढून जमीनदाराच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाले, "आता पगडी तुमच्या डोक्यावर आहे, तुमचे पत्र स्वतः वाचा."
-----------------
बकरीचे मांस
एके दिवशी मुल्ला नसरुद्दीनने बकरीचे मांस आणले आणि आपल्या पत्नीला ते लवकर शिजवण्यास सांगून बाहेर गेले. त्याच दरम्यान पत्नीच्या दोन मैत्रिणी आल्या. मुलाच्या पत्नीने त्यांना जेवू घातले आणि स्वतः तिनेही मांस खाल्ले. त्यात सर्व मांस संपले.
मुल्लाजी परत आल्यावर पत्नीने त्यांच्यासमोर डाळ आणून ठेवली. मुल्लाजीने विचारले, "मी आणलेल्या मांसाचे काय झाले?"
पत्नीने उत्तर दिले, "ते मांस मांजरीने खाल्ले." मुल्लाजींनी लगेच स्वयंपाकघरातून तराजू आणून मांजर पकडले. मांजरीचे वजन केले. मांजरीचे वजन अर्धा किलो भरले.
मुल्लाजी म्हणाले, "हे विचित्रच आहे, मांस अर्धा किलो होते. जर हे मांजर अर्धा किलो आहे तर मग मांसाचे काय झाले? आणि जर हे मांस असेल तर मग मांजरीचे काय झाले."
- सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment