Halloween Costume ideas 2015

मृत्यूनंतर पुढे काय?

मृत्यू : जीवन प्रवासाचा एक टप्पा 


वनातील सर्वात गंभीर वास्तविकता माणसाचा मृत्यू आहे. माणूस कोणतीही गोष्ट नाकारू शकतो पण प्रत्येक जीवाचा मृत्यू अटळ आहे या कठोर सत्याला नाकारू शकत नाही. ईश्वराचे अस्तित्व, मृत्यूनंतरचे जीवन व यासारख्या इतर मुद्द्यांना लोकं श्रद्धा व अंधश्रध्देचा भाग मानतात. जीवनाचा उद्देश, नैतिक मूल्ये, यासारख्या विषयांना समजून न घेता तर्क वितर्क लढवतात. कोणत्याही गोष्टीविषयी वाद घालतात, पण याविषयी दुमत नाही की, सरतेशेवटी प्रत्येकाला हे जग सोडावेच लागते आणि हे सांसारिक जीवन काही मोजक्या दिवसांपुरतेच मर्यादित आहे. माणूस कोणत्याही देशाचा असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, आस्तिक असो वा नास्तिक, स्त्री-पुरुष, लहान-मोठे सर्वांचे मत याबाबतीत एकच आहे की मृत्यू निश्चित आहे आणि त्याची वेळ माणसावर केव्हांही येऊ शकते. याविषयी जगभरात कुठेही आणि कसलेही मतभेद नाहीत. मात्र हा प्रश्न नेहमीच माणसासमोर राहिला आहे की मृत्यूच्या पडद्यामागे काय आहे? आणि या क्षणभंगुर आयुष्याला काही अर्थ, काही उद्देश आहे कि नाही? आणि जर या जीवनाचा काही उद्देश असेल तर माणूस भरपूरपणे जीवनात मग्न असतांना अचानक मृत्यूचा निर्दयी हात त्याच्यावर का पडतो? बरं मग, मृत्यू हाच आपल्या जीवन प्रवासाचा शेवटचा मुक्काम समजावा का? की ते आल्याबरोबर एकदमच सर्वकाही संपून जाते? आणि जर तसे नसेल तर या प्रवासाचा अंतिम पडाव कोणता? या प्रश्नांची उत्तरे विज्ञानात सापडत नाही, कारण मृत्यूनंतरचे जीवन हे मानव इंद्रियांच्या पलीकडे आहे. माणसाची श्रवणशक्ती, त्याची दृष्टी, त्याची बुद्धी, त्याचे वैज्ञानिक अनुभव, आणि त्याच्या ज्ञानाचा कोणताही स्रोत मरणोत्तर जीवनाच्या वास्तविकतेला बघण्या, समजण्याइतका सक्षम नाही. यासंबंधीची उत्तरे जगभरात आलेल्या सर्व पैगंबरांनी पुर्ण विश्वासाने दिलीत. सर्वप्रथम याच प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी आपल्या पुढील कार्याला सुरुवात केली. या सृष्टीमध्ये माणसाचे स्थान काय आहे? माणसाच्या जीवनाचा उद्देश काय? जीवन व मृत्यूची वास्तविकता काय आहे? मृत्यूनंतर माणसाला पुढे कोणकोणत्या टप्प्यातुन जावे लागते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्येक काळात, प्रत्येक देश व समाजात अल्लाहने नियुक्त केलेल्या पैगंबरांनी दिलीत, पण हे खेदाने नमूद करावेसे वाटते की आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या आधी आलेल्या सर्व पैगंबरांच्या शिकवणी त्या काळात ज्यांनी मान्य केल्या त्यांनी जतन केल्या नाहीत, म्हणूनच लोकं मरणोत्तर जीवनाच्या महत्त्वपूर्ण शिकवणींपासून कोसो दूर भटकत गेले, परिणामी सांसारिक जीवनाबरोबर त्यांचे मरणोत्तर जीवनही धोक्यात आले.

संसाराच्या या अंतिम युगात अल्लाहची कृपा आहे की आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शन कोणत्याही कमी जास्तीशिवाय प्रत्येक माणसासाठी उपलब्ध आहे. कुरआन आणि हदीसच्या अभ्यासातून हे कळते की, मृत्यू आल्यावर मानवी जीवनाचा प्रवास संपत नाही, तर अजून बराच लांबचा पल्ला गाठणे बाकी राहते. मृत्यू पश्चात जीवनाला अंत नाही, ही वास्तविकता मृत्यू जवळ येताच प्रत्येक व्यक्तीवर स्पष्ट होऊ लागते, पण त्यावेळी पुढच्या प्रवासासाठी कोणतीही तयारी करण्यास वेळ मिळत नाही. मृत्यू कधी येईल हे कुणीही सांगू शकत नाही पण त्यानंतरचे जीवन कसे सुखाने जगता येईल? हे जाणून घेणे प्रत्येक माणसाची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी आज काय करावे लागेल? मृत्यूच्या वेळी काय होते? त्यावेळी काय करावे? मृत्यूपासून ते कयामत म्हणजे न्यायाचा दिवस येईपर्यंत मधल्या काळात कोणकोणत्या परिस्थितीतून माणसाला जावे लागते? न्यायाचा दिवस कसा असेल? त्या वेळी माणसाने जन्मभर केलेल्या कर्मांचा हिशोब कसा चुकता केला जाईल?आणि त्यानंतर कधीही न संपणाऱ्या जीवनात कृपा किंवा शिक्षेचे स्वरूप काय असेल? या प्रश्नांची उत्तरे कुरआन आणि हदीसच्या माध्यमातून क्रमवार मांडणे हा या लेख मालिकेचा उद्देश आहे. मरणोत्तर जीवन हा विषय ईशसंदेश किंवा पैगंबरीय कार्याच्या मुलभूत कार्यांपैकी एक महत्वपूर्ण संदेश आहे. हा विषय समजून घेतल्यास सांसारिक जीवनाची वाटचाल सन्मार्गावर होते आणि मरणोत्तर जीवनातील प्रवासाचे टप्पेही सुलभतेने पार पडण्याची आशा निर्माण होते. 

मरणोत्तर जीवन हा विषय अल्लाहच्या हुकुमानुसार चालणाऱ्या अदृश्य व्यवस्थेचा भाग आहे. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून या जगातील फक्त भौतिक गोष्टींबद्दलच जाणून घेऊ शकतो. विश्व निर्मात्याच्या आदेशांनुसार सृष्टीच्या अदृश्य कारभाराला समजण्या इतपत आपल्या ज्ञानेंद्रियांची कुव्वत नाही. अशा विषयासंबंधी कुणाला माहिती मिळवायची इच्छा असेल तर त्याला पैगंबरांनी सांगितलेल्या अदृश्य गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. याचेच नाव इमान बिल गैब म्हणजे न पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे आहे. ज्यामध्ये अनेक बाबी मानवाच्या ज्ञानेंद्रियांपासून लपलेल्या आहेत. अनेक अशा वास्तविकता आहेत ज्या मानवाच्या आकलनापलिकडे आहेत. ज्या कधीही प्रत्यक्षपणे सामान्य माणसांच्या पाहण्यात किंवा अनुभवात येत नाहीत. मृत्यू नंतरच्या जीवनात मानवाच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी, मृत्यू ते कयामत येण्यापूर्वी मधल्या काळातील परिस्थिती, स्वर्ग, नर्क इत्यादी अनेक बाबींचा संबंध मरणोत्तर जीवनाशी आहे. 

मरणोत्तर जीवनाविषयी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की जगात आलेल्या हजारों पैगंबरांपैकी अनेकांना अल्लाहने त्यांच्या पदानुरूप आकाश आणि जमीनीतील अनेक अदृश्य हकीकतींचे निरीक्षण करविले. भौतिक पडद्यांना बाजूला सारून पैगंबरांच्या डोळ्यांना मरणोत्तर जीवन व अदृश्य व्यवस्थेसंबंधी ते सर्व काही दाखविले ज्यांच्यावर सामान्य माणसाला न पाहता श्रद्धा ठेवण्यास सांगितले गेले आणि हीच माणसाची परिक्षा आहे की मृत्यूनंतरचे परिणाम न पाहताही तो चांगली कर्मे करतो की वाईट मार्गांचा अवलंब करतो. या ठिकाणी पैगंबर आणि एखाद्या तत्वज्ञानीमध्ये असलेला फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. तत्वज्ञानी जे काही सांगतात ते त्यांच्या बुद्धी व अनुमानावर आधारित असते. परंतु हजारो पैगंबरांनी जे सांगितले ते त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सत्य आहे, म्हणूनच सर्व पैगंबरांनी आपापल्या समाज बांधवांना सर्वप्रथम अल्लाहच्या अदृश्य व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. ज्यामुळे माणसाचे सांसारिक जीवन सुखी होते आणि मृत्युनंतर माणसाला ज्या परिस्थितीतून जायचे आहे, मजल दरमजल करत अखेर अंतिम पडाव असलेल्या ठिकाणावर पोहचायचे आहे, त्या प्रवासाची तयारी सुरू होते. तो प्रवास जो मृत्यूच्या गडद पडद्याआड लपलेला आहे. मृत्यूनंतरच्या जगाला अरबीमध्ये ’आखिरत’ म्हटले गेले आहे. ज्याचा अर्थ आहे नंतर येणारी गोष्ट, नंतर येणारे जग, मृत्यूनंतर माणसासमोर प्रकट होणारे एक नवीन जग. पैगंबरांच्या आवाहनाचा सार हाच आहे की लोकहो! त्या न्यायाच्या दिवसाची तयारी करा आणि त्या जीवनासाठी काम करा जे जीवन शाश्वत आहे, मृत्यूनंतर येणारे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत, कधीही न संपणारे आहे. 


पैगंबरांचे आवाहन स्वीकारण्यात माणसाला ही अडचण येते की पैगंबरांनी ज्या अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले, त्या वास्तविकतेला माणूस या भौतिक जीवनात पाहू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही किंवा ऐकू शकत नाहीत. त्या जीवनाच्या श्रद्धेचे अंतिम अवलंबन पैगंबरांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे हेच आहे. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. माणसाने पैगंबरांच्या शब्दांवर विश्वास का ठेवावा? कारण त्यांच्यापेक्षा जास्त सत्यवादी जगात कोणीच नव्हते. ही गोष्ट त्यांच्या काळातील विरोधकांनाही मान्य होती आणि आजचे विरोधकही मान्य करतात. भले ही त्यांनी इस्लामी शिकवणीनुसार आचरण करण्यास नकार दिला. पैगंबरांवर विश्वास ठेऊनच मरणोत्तर जीवनातील वास्तविकता समजून घेणे शक्य आहे. ............. क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget