जगभराच्या इतिहासात जो रक्तपात, हिंसाचार घडला, अत्याचाराच्या घटना घडल्या व आजही मानवतेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत, त्यामागील कारणे काय? सर्वात मोठे कारण रंग, वंश, भाषा व सीमेवरून केला जाणारा भेदभाव व अत्याचार आहे आणि त्यातून निर्माण होणारी द्वेषभावना व सूडबुद्धी होय. प्राचीन काळापासून आजतागायत प्रत्येक कालखंडात माणसांनी ’माणुसकीकडे’ दुर्लक्ष करून स्वत:ला ’स्वत:च’ बनवलेल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या वर्तुळात विभागून घेतले आणि हीच सर्वात मोठी घोडचूक केली. आपला रंग, वंश, आपली भाषा व सीमेच्या वर्तुळात जे आहेत त्यांना आपले मानले आणि जे या वर्तुळाबाहेर आहेत त्यांना परकीय ठरवले. जो आपल्या भौगोलिक सीमेत जन्माला आला तो आपला आणि जो आपल्या सीमेबाहेर जन्मला तो परकीय, ज्याने आपल्या वंशात जन्म घेतला तो उच्च आणि जो इतर वंशात जन्माला आला तो नीच, ज्याला आपली भाषा बोलता येते तो आपला माणूस आणि ज्याला आपली भाषा बोलता येत नाही तो परका माणूस, या विचारसरणीमुळे आपसातील वैमनस्ये वाढली, माणसं एकमेकांचा तिरस्कार करू लागली, एकमेकांना वाकड्या नजरेने पाहू लागली, तुच्छतेने वागू लागली, कारण अमुक व्यक्ती ही अमुक समूहाची आहे. मग समोरच्या माणसावर आपल्या माणसाने कितीही अन्याय व अत्याचार केले तरीही ’आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं’ या उक्तीप्रमाणे लोकं वागू लागली. अशा प्रकारे भेद निर्माण होण्याचा पाया रचला गेला आणि माणसा-माणसात दुरावा निर्माण झाला. या भेदाच्या आधारावर माणसांनी आपल्या मानलेल्या लोकांना इतरांपेक्षा अधिक प्रेम दिले व त्यांच्याशी करुणेने वागले आणि इतर माणसांना तुच्छ गणले आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. माणसांवर अत्याचाराला वैध मानले आणि मोठ्या बेशरमीने ही धार्मिक गरज असल्याचे वर्णन करून ठेवले. हा दोष असूनही त्यासाठी कायदे करण्यात आले आणि ते ना ना प्रकारे योग्य ठरवले गेले. अनेक राष्ट्र व समुदायांनी अशी तत्वे बनवली ज्यात प्राण्यांची पूजा केली जात असे व आपल्या वर्तुळाबाहेर असलेल्या माणसांचा दर्जा प्राण्यांपेक्षाही कमी गणला जात असे. कमजोर देशाच्या व दडपून ठेवलेल्या लोकांच्या जीवावर उठणे, त्यांच्या मालमत्तेवर हात टाकणे, अब्रूची धिंड काढणे, अशा शतकानुशतके चालत आलेल्या सैतानी परंपरांची पुनरावृत्ती आजही होत आहे. जगभरात कायदे होऊनही ही समस्या का नियंत्रणात येत नाहीये? माणसाचा इतर माणसांबद्दल असलेला चुकीचा दृष्टीकोन कसा बदलता येईल? यासंबंधी आपल्या निर्माणकर्त्याने संपूर्ण मानवजातीला कोणते निर्देश दिले? यावर विचार करण्याची गरज आहे. .......... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment