मानवाची भौतिक लालसा इतकी वाढली की त्यात विश्व बंधुत्वाची जाणीव दडपून गेली. भौतिक हित साध्य करण्यात मानवाला ’माणूसकीचा’ विसर पडला आणि तो हिंस्र पशूसारखा वागू लागला. अत्याधुनिक घातक शस्त्रे वापरून आपल्यासारख्याच माणसांच्या जीवाशी खेळू लागला. आपल्या उद्देशासाठी ’फोडा आणि राज्य करा’ ही धुर्त नीती वापरू लागला. रंग, वंश, भाषा व सीमेच्या नावावर मानवजातीचे तुकडे पाडले. हे उच्चवर्णीय ते निच, यांचा रंग वेगळा त्यांचा रंग वेगळा, यांची भाषा वेगळी आणि त्यांची भाषा वेगळी, अशा मुद्द्यांवरून जगभरात द्वेष निर्माण केले. युद्ध, दंगली, राडे, हिंसक आंदोलने घडवून आणली. ठिकठिकाणी लागलेली ही आग इतकी भडकली की आता खुद्द भडकावणारेही या आगीच्या विळख्यात सापडले आहेत. या परिस्थितीवरही मात करता येते, मात्र एक गोष्ट नीटपणे लक्षात घ्यावी लागेल की एक साधी मशीनही बिघडू नये व चांगल्या स्थितीत राहावी यासाठी मशीनच्या निर्मात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरते. अगदी तसेच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व भडकलेल्या आगीपासून मानवजातीला वाचवण्यासाठी फक्त आपल्या निर्मात्याच्या मार्गदर्शनातूनच मार्ग काढणे शक्य आहे, कारण तोच सर्वज्ञानी आहे. विनाश टाळण्यासाठी आणि चुकभूल सुधारण्यासाठी माणसांना कुरआनच्या या आयतीनुसार आपले विचार बदलावे लागतील.
’’लोकहो! आम्ही तुम्हाला एकाच पुरूष व स्त्रीपासून निर्माण केले, मग तुमचे राष्ट्र व कबीले बनवले, यासाठी की तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकत: अल्लाहच्या जवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा, खबर राखणारा आहे.’’
( 49 अल्-हुजुरात : 13 )
म्हणजे तुम्हा सर्वांचे मूळ एकच आहे. एकाच पुरुष आणि स्त्री जोडप्यापासून संपूर्ण मानवजात अस्तित्वात आली आहे. जगात सापडणाऱ्या तुमच्या सर्व पिढ्या आदरणीय आदम आणि हव्वा ( त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो ) यांच्या मुलांच्या शाखा आहेत. एकाच प्रकारच्या निर्मिती द्रव्यापासून तुम्ही जन्म घेता आणि तुमची जन्म प्रक्रियाही एकच आहे, म्हणून मानव निर्मितीच्या श्रृंखलेत तुम्ही ठरवलेल्या उच्च-निच अशा भेदभावाला आधार नाही.
दुसरे हे की, तुमचे मूळ एक असूनही तुमची विभागणी राष्ट्र आणि कबील्यांमध्ये होणे ही स्वाभाविक गोष्ट होती. जसजसे कुटुंबे, कबीले वाढत जाणार होते तसतसे पिढ्याही वाढत जाणार होत्या. कुटुंबांचे कबीले आणि कबील्यांची राष्ट्रे निर्माण होणे हे अपरिहार्य होते. याबरोबर माणसं वेगवेगळ्या प्रदेशात स्थायिक झाल्यानंतर तेथील परिस्थितीनुसार त्यांचे रंग, भाषा व जीवन शैली नैसर्गिकरीत्या भिन्न होणार होत्या. पण हे फरक उच्च-नीच व श्रेष्ठ-हीन असे भेद निर्माण करण्यासाठी मुळीच नव्हते. रंगाच्या आधारावर दुसऱ्यांचा अपमान वा तिरस्कार करण्यासाठी नव्हते. मानवी हक्कांमध्ये एका गटापेक्षा दुसऱ्या गटाला प्राधान्य मिळावे किंवा एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आपले वर्चस्व गाजवावे यासाठीही नव्हते. वेगवेगळे कबीले, राष्ट्र निर्माण होण्याचे कारण फक्त एवढेच होते की माणसांची आपसातील ओळख स्वाभाविकपणे व्हावी. तसेच जीवन व्यवहारात एकमेकांना मदत व आपसातील सहकार्य नैसर्गिकरीत्या व्हावे, पण निर्मात्याने ज्या गोष्टींना परिचय व सहकार्याचे साधन बनवले होते त्याला लोकांनी द्वेष व अत्याचाराचे साधन बनवले. विडंबना अशी की लोकं या गोष्टींचा गर्व बाळगतात. हे सैतानी विचार आहेत जे अज्ञानाशिवाय दुसरे काहीही नाही.
तिसरे म्हणजे, माणसांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? यासंबंधी स्पष्ट करताना म्हटले गेले आहे कि श्रेष्ठता फक्त नैतिकतेवर आधारित आहे. जो माणूस वाईट गोष्टी टाळतो, सन्मार्गावर चालतो तो सर्वश्रेष्ठ असून अल्लाहच्या जवळचा आहे. मग तो कोणत्याही वंशाचा असो, कुठलाही नागरिक असो व कोणतीही भाषा बोलणारा असो. याविरुद्ध, एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या घराण्यात जन्मलेल्या माणसाचे आचरण भ्रष्ट असेल तर तो माणूस हीन दर्जाचा आहे.
यावरून स्पष्ट होते की सर्व माणसे दोनच भागात विभागली गेली आहेत. एक आपल्या निर्मात्या स्वामीवर श्रद्धा ठेवून, मनात ईशभय बाळगून अल्लाहच्या आज्ञेनुसार जीवन व्यतीत करणारी व्यक्ती जी अल्लाहच्या दृष्टीने आदरणीय आहे. दुसरे काफिर म्हणजे कृतघ्न, जो आपल्या निर्मात्या ईश्वराशी व त्याच्या निर्मितीशी कृतघ्नपणे वागतो, जो मनमानीचे पापमय जीवन व्यतीत करतो, असा माणूस अल्लाहच्या दृष्टीत तुच्छ आहे. अन्यथा सर्व मानव आदमची मुले आहेत आणि अल्लाहने आदमला मातीपासून निर्माण केले, म्हणजे माणूस जे काही अन्न खातो ते सर्व मातीतूनच तयार होते आणि संपूर्ण मानवजातीच्या निर्मितीला कारणीभूत असलेल्या शुक्राणूंचे मूळही एकच आहे, ते म्हणजे माती होय.
......................... क्रमशः*
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment