Halloween Costume ideas 2015

धुक्यातले दवबिंदू : काव्यसंग्रह


धुक्यातून दवबिंदू न्याहाळण्यात एक वेगळीच मजा असते. त्यात आभाळाच्या अंतरंगाचे प्रतिबिंब पडलेले असते. हे दवबिंदू डोळ्यांना सुखावणारे असतात. ते डोळ्यातून अलगद मनात उतरवून प्रसन्नता फुलवतात. ऊर्जेचा स्तोत्र पुरवतात. आल्हाददायक दवबिंदू ओंजळीत झेलणे हा प्रत्येकाच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. नेरूळ नवी मुंबई येथील व्यवसायाने फार्मसिस्ट असलेल्या कवयित्री शबाना मुल्ला यांचा नुकताच नुकताच प्रकाशित झालेला ‘धोक्यातले दवबिंदू’ या पहिल्याच गेय कवितासंग्रहातील विविधरंगी भावभावना अत्यंत हळुवारपणे वाचकांच्या अंतर्मनाला हात घालतात.

मानवी जगण्यातील नातीगोती, सुखदुःखाचा लपंडाव, स्त्रियांना येणारे बरेवाईट अनुभव, व्यक्ती, समाज, सृष्टी, पाऊस, प्रीतभाव, संसारातील चढउतार, आपुलकीचे बंध, आठवांची अस्वस्थ अनुभूती, बोलके मौन आदी पैलूंचे पदर कवयित्रीने अलगद उलगडले आहेत. त्याचबरोबर राने,  झाडे, वाऱ्यांची सळसळ, पाना-फुलांची मोहकता ही निसर्गाची भुरळ घालणारी रुपेही तितक्याच मनस्वीपणे साकारली आहेत. ज्याला स्वतःच्या मनाशी बोलता येते त्यालाच जनाशी बोलता येते. आतल्या आवाजाला ओ देणे म्हणजेच आत्मप्रकटीकरण होय. आत्मप्रकटीकरणातूनच आत्मस्वर झंकारतो त्याचीच तर कविता होते. याची निर्मितीशील जाणीव शबाना मुल्ला यांना आहे. त्यांच्या ग्रामीण शहरी जीवनातील अनेक छंदोबद्ध रचनामधून हा झंकार ऐकू येतो. त्यातून कैक अभिव्यक्तीचे सूर सापडत जातात.

निसर्गाचे चाक नित्यनेमाने फिरत असते. या चाकाच्या फिरण्यात मातीची भूमिका नेहमीच निर्णायक ठरत आली आहे. ऋतुमान, पर्जन्यमान, बियांची उगवण या सर्वांचीच निष्ठा मातीशी निगडित असते. सृजनाच्या काळात मेघांच्या वर्षावात माती सुखावते. गवतीची हिरवीगार पाती थेंबाथेंबातून आनंदाने डोलतात.


आषाढाचे मेघ बरसता सुखावते माती

आनंदाने डोलत झुलती गवताची पाती


निसर्गातल्या वेगवेगळ्या घडामोडी टिपणारी गीत प्रकारातली ही रचना आहे. लय, तालबद्ध गाण्यास सुयोग्य अशी ही रचना आहे. माती आणि माता दोन्हीही सृजनात्मक असतात. आईच्या ठायी देवरूप वसलेले असते. ते सर्वव्यापी असते. वात्सल्य हा तिचा स्थायीभाव असतो. आई लेकरांच्या मनातले सर्वकाही जाणून असते. न मागताही सर्वकाही आणून देते. यातच तिच्या जन्माचे सार्थक असते. ‘आई वात्सल्याचे रूप’ या गीतातून आई विषयीच्या हळुवार भावना व्यक्त होतात.


वसलेले तिच्या ठायी असे देवरूप

माया ममतेची आई वात्सल्याचे रूप


आईच्या वात्सल्याचे अप्रूप कौतुकातीत आहे. हे मान्यच. परंतु बाबाही मायेत आणि कर्तव्यात कुठेच कमी पडत नाहीत. त्याचे मन फुलाप्रमाणे कुसुमकोमल असते. ते नुसती आसवे गाळत नाहीत. परिस्थितीपुढे हातबल होत नाहीत. मुलांना जपण्यासाठी खडतर प्रसंगाचा सामना करण्यासाठी ते कणखर सुद्धा असतात. बाबांच्या कर्तव्याची ध्वजा उंचावणारी कविता मराठीत अभावानेच दिसून येते. ‘बाबा’ ही अनलज्वाला वृत्तातली गझल तितकीच परिणामकारक साधणारी आहे.


माया करुनी फुलाप्रमाणे जपतो बाबा

वेळप्रसंगी कणकर सुद्धा बनतो बाबा


खरे तर सुख हे माणसाच्या मानण्यावर अवलंबून असते. सुख माणसाच्या अंतरंगातच दडलेले असते. पण माणूस अंतरात डोकावून कधीच पाहत नाही. तो सुखाच्या शोधात वेडापिसा होवून दाहीदिशा भटकत असतो. त्याच्यासाठी सुख हे मृगजळ ठरते. हे वास्तव सांगताना कवयित्री म्हणते.


होतो शोधात सुखाच्या उगा माणूस वेडापिसा

अंतरंगी दडलेले, अन फिरतो दाहीदिशा


संतांनी माणसांना माणुसकीची कास धरण्याची, होता होईल तेवढे ज्ञान संपादन करून जगाचे कल्याण साधण्याची शिकवण आपल्या अभंगातून दिली आहे. हे अभंग म्हणजे जीवनाचे सार आहे. ही बाब कवयित्रीने अभंग रचनेतून सुलभतेने विशद केली आहे. 


जीवनाचे सार / संताचिये वाणी

भक्तीयुक्त गाणी / अभंगात


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनात अनेक प्रकारच्या खस्ता खावून मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. शिक्षणानेच स्त्रियांना न्याय-हक्काची जाणीव होते. मुलींनी शिकले पाहिजे. एक मुलगी शिकली तर आख्खे कुटुंब साक्षर होते. यासाठीच त्यांना शैक्षणिक क्रांती केली. त्यामुळे स्त्रिया बोलू लागल्या. लिहू लागल्या. हे त्याचे थोर उपकारच आहेत. विषयाची कृतज्ञता शबाना मुल्ला यांनी त्यांच्या गीतातून व्यक्त केली आहे.


स्त्रियांसाठी केला किती शिक्षण प्रसार

साऊ तुझे आम्हांवर थोर उपकार


हिंदू-मुस्लीम समाजात सणावाराला असलेले पूर्वपार महत्वही कवयित्री तितक्याच श्रद्धेने प्रकट करते. श्रावण हा सौंदर्याचा नवसृष्टीला जिवंत करतो. पानाफुलांच्या चैतन्याला सुगंधित करतो. श्रावण हा निसर्गाची श्रीमंती वाढवतो. श्रावण शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनाला हिरवळ देतो. नद्यानाले धरणांना जलयुक्त करतो. म्हणून श्रावण प्रत्येकासाठी मनभावन ठरतो.


डोंगर-पर्वत शिवार वाटा

कृतार्थ करतो श्रावण

सरिता सागर धरणे भरतो

यथार्थ करतो श्रावण


मुस्लीम समाजात रमजान मासाचे पावित्र्य अनन्यसाधारण आहे. रमजान हा केवळ मास नाही तर तो मुस्लीम बांधवांचा श्वास आहे. अन्नधान्यापासून, नव्या वस्त्रांपासून वंचित राहणाऱ्यांना दानधर्म करण्याच्या हा पुण्यशील मास आहे. इबादतीतून संयमाची शक्ती देणारा हा महिना आहे. त्याचे नेमके स्थान कवयित्री गझलेतून मुखरीत करते. ते असे.


पावित्र्य राखणारा रमजान मास आहे

मुस्लीम बांधवांचा रमजान श्वास आहे


महाराष्ट्र ही समृद्धीची खाण आहे. इथे मातीतून सोने उगवते. नद्यातून खळाळत वाहणारे पाण्याचे पाट जागोजागी हिरवाई निर्माण करतात. इथे पीक-पाण्याची मोठी आबादानी आहे. तो देशात अग्रेसर आहे. अशा स्वावलंबी, सुखसंपन्न महाराष्ट्रात आपण जन्माला आलो याचा कवयित्रीला सार्थ अभिमान वाटतो.


उगवते या मातीत सोन्यावाणी धनधान

स्वावलंबी महाराष्ट्र हाच अमुचा सन्मान //


महाराष्ट्राची वैविध्यपूर्ण संपन्नता विशद करणारे हे एक उत्तम महाराष्ट्र गीत आहे. लावणी सायकल, लावणी बैलगाडी, लावणी विडा या शृंगारप्रधान लावण्या पानाच्या विड्याप्रमाणे रंगत जातात. एखाद्या कवयित्रीच्या काव्यसंग्रहात मराठमोळ्या लावण्याचा बाज अभावानेच आढळून येतो. शबाना मुल्लांच्या लावण्या प्रस्तुत संग्रहाची रंगत वाढविणाऱ्या आहे. वाचकांना जाणीवपूर्वक आकर्षित करण्यासाठी बोजड, मोठ मोठ्या प्रतिमा, प्रतिकांच्या फंदात न पडता प्रासादिक शब्दातून त्यांनी अनुभूतींचे अविष्करण केले आहे. हे त्यांच्या कवितांचे खास वैशिष्ट्य आहे. शबाना मुल्ला यांनी गझलेचा व्यासंग तंत्रासह वाढविला तर येणाऱ्या काळात त्या उत्तम गझला लिहू शकतील, याची शाश्वती देणारा हा कवितासंग्रह आहे. 


धुक्यातले दवबिंदू : काव्यसंग्रह

कवयित्री : शबाना मुल्ला

प्रकाशक : शॉपिजन प्रकाशन

पृष्ठे :१०९

मूल्य : २९१ रूपये



- बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी : ९८९०१७१७०३


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget