भारत हा कृषिप्रधान देश आहे, या देशातील ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती आहे, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. वर्षभरात राबराब राबून हातात आलेले पीक अवकाळी पावसाने बघता बघता गिळंकृत केले आहे. विदर्भ मराठवाडा येथील शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागले आहे. काही दिवसांत हातात येऊ घातलेल्या संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपिकांचे तर होत्याचे नव्हते झालेच शिवाय सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, यासारख्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा ऊस उत्पादन ही तुलनेने कमी झाले आहे. विक्रमी उत्पादन झालेल्या कांदा व लसूण या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत.आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो, शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र यंदा वर्षी अवकाळी पावसामुळे पिकांची व फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश, हतबल व निराश होऊ लागला आहे. शेतकरी आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. एक दोन दिवस झाले की, शेतकरी आत्महत्यांचे वृत्त कानावर पडत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसली पाहिजे. नैसर्गिक आपत्ती ही पूर्वकल्पना नसताना येते आणि अल्प कालावधीत होत्याचे नव्हते करून जाते. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्राला यांचा जोराचा फटका बसला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई याला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना हैराण केले आहे.
नैसर्गिक आपत्तीशी सामुदायिकपणे, परस्पर सहकार्य व समन्वयाने सामना करावा लागतो. प्रचंड गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी, फळबागांचे नुकसान, पशूधनाची दूरावस्था, पाहता ही नैसर्गिक आपत्ती सहनशीलतेच्या पलिकडची आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दुबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यायलाच हवा. राज्यातील महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित, योग्य व वास्तव पंचनामे करायला हवेत. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी , तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करतांना कामचुकारपणा व भेदभाव तसेच आर्थिक गैरव्यवहार करतात. त्यांची मिलीभगत असल्याने वास्तवतेप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते,गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही.तरी सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित व योग्य ते सर्वेक्षण व्हावे आणि कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यात अडथळा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. शेतकरी पुर्णपणे खचला आहे, अशा वेळी शासनाची मदत ही शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे.तरी विनाविलंब मदत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.
सध्या नागपूर येथे सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेऊन मायबाप सरकारने धावून जावून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक होते, शेतकऱ्यांसमोर आलेल्या संकटाची जाणीव सध्याच्या राजकारण्यांना असणे स्वाभाविक आहे, तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
Post a Comment