समाजात आपण पाहतो की, जे मोठे लोक असतात मग ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असोत, अधिकारी असो की पदाधिकारी असोत, त्यांना अंगरक्षक दिले जातात. राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना विशेष करून मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती प्रत्येकाला सुरक्षा पुरविली जाते. कोणाला 21 अंगरक्षक दिले जातात, कोणाला वाय कॅटेगरी दिली जाते, कोणाला एक्स कॅटेगरी दिली जाते तर कोणाला झेड तर कोणाला झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा दिली जाते. या अंगरक्षकांच्या गराड्याशिवाय हे लोक कुठेच ये-जा करू शकत नाहीत. तपासणी झाल्याशिवाय कोणी त्यांना भेटू शकत नाहीत व ते कोणाला भेटत नाहीत. असे करणे या लोकांचा अपमान नव्हे तर सम्मान समजला जातो. ज्याला जेवढ्या मोठ्या दर्जाची सुरक्षा दिलेली आहे त्याचे मान आणि महत्त्व तेवढे जास्त असते.
इस्लामच्या नजरेमध्ये प्रत्येक महिला सन्माननीय आणि महत्त्वपूर्ण (व्हीआयपी) आहे. म्हणून इस्लाम प्रत्येक महिलेला एक सुरक्षा कवच प्रदान करतो. या सुरक्षा कवचात त्या स्त्रीच्या शिलाचे रक्षण केले जाते. तिच्या सन्मानाचे रक्षण केले जाते, तिला सुद्धा एकापेक्षा जास्त अंगरक्षक इस्लामने दिलेले आहेत. ती जेव्हा मुलगी असते तेव्हा तिचे वडिल तिचे अंगरक्षक असतात, ती जेव्हा थोडीसी मोठी होते तेव्हा तिचा भाऊ अंगरक्षक असतो, आईसाठी मुलगा तर पत्नीसाठी पती अंगरक्षक असतो. सुनेसाठी सासरा, पुत्नीसाठी चुलता अशाच प्रमाणे इतर जवळचे नातेवाईक पुरूष इस्लामने तिचे अंगरक्षक म्हणून नेमले आहेत. इस्लामचे असे निर्देश आहेत की, दैनंदिन कामासाठी स्त्री एकटी बाहेर निघू शकते. मात्र लांबचा प्रवास असेल तर ती अनिवार्य पद्धतीने आपल्यासोबत महेरम (जवळचा पुरूष नातेवाईक) अंगरक्षक म्हणून घ्यावा. असा अंगरक्षक घेणे तिचा अपमान नाही तर सन्मान आहे. या पद्धतीची अवहेलना नव्हे तर सन्मान व्हायला हवा.
एकदा माझे महान शिक्षक सय्यद जलालुद्दीन उमरी (माजी अध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद) यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, ’’जे सुरक्षा रक्षक पदाधिकाऱ्यांच्या रक्षणाचे काम करतात ते त्यांचे हितचिंतकच असतीलच असे नाही. केवळ कर्तव्य म्हणून ते करत असतात. परंतु, इस्लाम प्रत्येक स्त्रीला जो अंगरक्षक देतो तो तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा असतो. तिला सर्व सवलती मिळतील, तिच्या सर्व गरजा वेळेवर पूर्ण होतील, याकडे हा अंगरक्षक कटाक्षाने लक्ष देत असतो. हा अंगरक्षक त्या स्त्रीच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करण्याचे सुद्धा कर्तव्य बजावतो. तिच्यावर मनापासून प्रेम करतो. या अंगरक्षकाच्या समोर मुस्लिम महिलेकडे वाईट नजरेने कोणी पाहू शकत नाही. कोणी तसा प्रयत्न केला असेल तर तो पेटून उठतो. तिच्या सन्मानाच्या बचावासाठी हा अंगरक्षक स्वतःचा जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत’’
त्या महिला मुर्ख आहेत ज्या इस्लामने प्रदान केलेल्या या सन्मानाला आपल्या अधिकार व स्वातंत्र्यावर गदा समजतात. त्या बिना महेरम (सुरक्षारक्षक) एकट्याच प्रवासावर निघतात आणि बऱ्याच वेळेस संकटात सापडतात. ते बुद्धीजीवी लोकसुद्धा मूर्ख आहेत जे महिलेला प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेला महिलांच्या हक्कावर अतिक्रमण समजतात आणि महिलांना एकट्यानेच प्रवास करण्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत् करतात. ते सुद्धा लोक मूर्ख आहेत ज्यांना इस्लामच्या कल्याणकारी निर्देशांमागील हिकमतींचा (युक्तींचे) ज्ञान नाही. म्हणून अशा लोकांचे असे मत आहे की, मुसलमान आपल्या महिलांना घरामध्ये कोंडून ठेवतात आणि तिच्या स्वतंत्र हालचालींवर नियंत्रण ठेवतात.
त्यांना काय माहित इस्लामने प्रत्येक स्त्रीला उत्तदर्जाची सुरक्षा पुरविली आहे. तिच्या संरक्षणासाठी तिच्या रक्ताचे, तिच्यावर प्रेम करणारे अंगरक्षक नेमलेले आहेत.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment