Halloween Costume ideas 2015

भारतीय संविधान कृतीशीलपणे राबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटीबद्ध राहिले पाहिजे...!


भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील हजारो स्वातंत्र्यवीरांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा, सत्य, न्याय, सविनय कायदेभंग, तसेच ब्रिटीशांना "चले जाव" चा अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला, त्यानंतर संपूर्ण देश स्वातंत्र्य संग्रामाने अक्षरशः पेटून उठला. अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि  घटना समितीच्या अथक प्रयत्नांतून, घटनेचे प्रमुख शिल्पकार  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वतापूर्ण अध्ययन आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करून  तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यातून भारतीय संविधान जन्माला आले. इतर व्यक्ती, स्थळ, महात्मे, अशा कुठल्याही गोष्टींना महत्त्व न देता केवळ भारतीय नागरिकाना अर्थात या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक जनतेला दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान समर्पित करण्यात आले. त्यानंतर आपल्या भारत देशाला जगात प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली.

अथक परिश्रमाने आणि रात्रीचा दिवस करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील "सर्वोत्कृष्ठ आणि विशाल असे संविधान" तयार केले. जगभरातील लोकशाही देशांमध्ये आपल्या भारतीय संविधानाची ख्याती आहे. इतकेच नाही तर सर्व कायदे, कलम आणि परीशिष्टांची विस्तृत मांडणी हेही भारतीय संविधानाचे जागतिक वैशिष्ट्य आहे. जगात इतके विस्तृत आणि स्पष्ट उल्लेखित संविधान कोणत्याही देशाजवळ नाही. आजपर्यंत या संविधानाची समीक्षा अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी केली आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान संविधानकार जगात अजूनपर्यंत झाला नाही.'  असा आजवर स्पष्ट उल्लेख अनेकदा देश विदेशातील घटनातज्ञांनी केला आहे. भारतातील समाज व्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. सामान्यातील सामान्य माणूस असो किंवा अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती असो, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनस्वी धारणा होती, या सर्व घटकांचा सुक्ष्मपणे विचार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची मांडणी केली आहे.

या देशावर अनेकदा महाभयंकर संकटे आ वासून उभ्या राहिल्या, पण अशा मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित संकटं असो आजपर्यंत संविधानाची वाटचाल ही दीपस्तंभासारखी राहिली आहे. या संविधानाचे एकमात्र वैशिष्ट्य आहे की,जगातल्या प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाचा गौरव वाटतो आहे. भारतीय नागरिकांना हा त्यांचा स्वतःचा गौरवच आहे, असे वाटते.. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला भारतीय संविधान सुपूर्द करतांना म्हणतात की, "संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाचे यश हे ते संविधान चालविणाऱ्यांवर आणि त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे." बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच भारतीयांसाठी व त्यांच्या भविष्यासाठी  मार्गदर्शक तथा दिशादर्शक ठरला आहे.  भारतीय संविधानाची महती यापेक्षा जास्त सांगण्याची गरज भासू नये. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत सूक्ष्मपणे व संयतपणे भारतीय नागरिकांसाठी  वर्तमानातील तसेच भविष्यातील प्रत्येक गोष्टींचे उत्तर संविधानात देण्यात आले आहे. काय बदलता येईल आणि काय बदलता येणार नाही. हेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. संविधान बदलण्याची प्रक्रिया कशी असेल हे संविधानाच्या भाग २० कलम ३६८ मध्ये नमूद करण्यात आली आहे. संसदेतील कायदा निर्मितीची प्रक्रियाही संविधानाच्या भाग ५ मध्ये कलम १०५ ते कलम १२२ मध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे.परिस्थितीला समर्पक नाही अश्या गोष्टी  संविधानातून काढू शकता येतात किंवा त्यात सुधारणा करू शकता येतात किंवा संविधानात नवीन तत्वे अंतर्भूत करू शकता येतात.

"या देशाचे संविधान निश्चितच श्रेष्ठ आहे. त्याला राबविणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. आपली कर्तव्य आणि जबाबदारी या भारतीयांनी नीटपणे सांभाळली तर देशाचे चित्र बदलू शकेल.  काय करायचे? आणि काय करायचे नाही? याचा विचार करा! जातीय मानसिकता टाकून द्या! संविधानाकडे तुमच्या विकासाचा दस्ताऐवज म्हणून पाहा! संविधानातील तरतुदी कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करा! राजकीय नैतिकता आणण्याचा आग्रह धरा! वैज्ञानिक दृष्टी बाळगणे आणि त्या वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे हे संविधानानुसार (कलम ५१-क नुसार) प्रत्येक भारतीयांचे मुलभूत कर्तव्य आहे." असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या बैठकीत विचार मांडले होते.

इतकेच नव्हे तर त्यासाठी अंधश्रद्धा, देव, चमत्कार, बाबा, बुवा यांना मुळापासून उपटून फेका! संपत्तीचे समान वितरण करण्यासाठी संपत्तीची सीमा निर्धारित करा! निर्धारित सिमेपेक्षा जास्त संपत्ती ही सरकारी खजिन्यात जमा करा! मग ती उद्योगपतींची असो, राजकारण्यांची असो, की मंदिर ट्रस्टची असो! ही संपत्ती जरी सीमित करण्याचा कायदा केला. तरी या देशातली गरिबी, बेरोजगारी, कुपोषण चुटकीसरशी संपुष्टात येतील. देश विज्ञानाच्या बळावर महासत्ता बनेल. जपान, जर्मनी याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या देशांना संविधान बदलण्याची गरज पडली नाही. त्यांनी फक्त देशाची मानसिकता बदलली. देशाचा विकास झाला. भारतातही मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस बदलला तर देशही बदलेल. देशाचा विकास होईल. असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितले आहे, हे आज अगदी चपखलपणे लागू पडले आहे.

भारतीय संविधानातील कायदे आजच्याही परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहेत. आजच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्या कायद्यांचा वापर कसा करायचा याचा कृतिकार्यक्रम बनविण्याची गरज आहे. सविनय कायदेपालन करून "सदरक्षणाय, खलनिग्रहणाय" यासाठी हे संविधान कृतीशीलपणे राबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटीबद्ध राहिले पाहिजे.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक  भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget