बऱ्याच दिवसांपासून एक विषय मनात घोळत होता ज्यावर लिहिण्याचा मानस होता. पण विषय रूक्ष असल्यामुळे लिहिण्याचे टाळत होतो. मात्र मागच्या आठवड्यात राजकुमार हिराणी यांचा ’डंकी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी विचार करत असलेला विषय ऐरणीवर आला. म्हणून या आठवड्यात भारतीयांचे विदेशात पलायन या विषयावर लिहित आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतातून पलायन करून ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये स्थायिक होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात गेलेली आहे. हा एक असा विषय आहे ज्याच्यावर डंकी रिलीज होईपर्यंत फारसे मंथन झालेले नाही. भारतातून पलायन हे नेहमीच होत असते. यात केरळ आणि पंजाब हे दोन राज्य पहिल्यापासूनच आघाडीवर आहेत. केरळमधील महिला नर्स म्हणून तर पुरूष मिळेल ते काम करण्यासाठी मध्यपुर्वेत जाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पंजाबचे लोक कॅनडा आणि अमेरिकामध्ये जाण्यास प्रसिद्ध आहेत. नव्हे तेथील टॅक्सी उद्योग त्यांच्याच जीवावर चालत आहे. शिवाय, ब्रेन ड्रेन (गुणवत्ता पलायन) च्या नावाने कितीही हाका मारल्या तरी हे सत्य नाकारता येणार नाही की अमेरिकेची सिलीकॉन व्हॅली आणि सॉफ्टवेअर उद्योग भारतीय अभियंत्यांच्या जीवावर उभा आहे. भारतीयांचे विदेशात जावून स्थायिक होण्याचा हा जो पॅटर्न होता तो सन्मानजनक होता. मात्र अलिकडे जो पॅटर्न सुरू झालेला आहे तो अपमानजनक आहे. सुरूवातीला भारतीय नागरिक रीतसर वीजा घेऊन विदेशात जाऊन आपल्या मेहनतीने स्वतःचे स्थान बनवत. मात्र आता घुसखोरी करून विदेशात जाण्याचा, ’डंकी मार्ग’ लोकांनी स्वीकारल्याने भारताची बदनामी होत आहे.
डंकी रूट (चोरट्या मार्गाने) अमेरिका आणि कॅनडामध्ये प्रवेश करण्याचा एक मोठा प्रयत्न मागच्याच आठवड्यात फ्रान्सने हाणून पाडला. त्याचे असे झाले की, 26 डिसेंबर 2023 रोजी फ्रान्सने एक विमान मुंबई विमानतळावर पाठवून दिले. यात डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करणारे 276 प्रवासी होते. बोईंग ए-340 जातीचे हे विमान जवळ जवळ 300 प्रवाशांना घेऊन दुबई येथून निकारागुआ येथे चालले होते. यात एका प्रवाशाचे भाडे 80 लाख ते 1 कोटी होते. विशेष म्हणजे ही फ्लाईट चार्टर्ड (विशेषरित्या आयोजित केली गेलेली) होती. जिचा खर्च 15 कोटी होता. निकारागुआ येथे उतरून हे सगळे लोक कॅनडा आणि अमेरिकेच्या भूभागात चोरट्या मार्गाने प्रवेश करणार होते. इंधन भरण्यासाठी म्हणून हे विमान फ्रान्समध्ये उतरले. परंतु, या विमानातून मानवतस्करी होत असल्याची टीप मिळाल्यामुळे फ्रेंच कस्टम विभागाने या विमानाची तपासणी केली व यातून चोरट्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचा खुलासा झाला. विशेष म्हणजे यातील 96 प्रवासी गुजराती होते. तोच वायब्रंट गुजरात ज्याचा डंका अवघ्या देशात वाजतोय. ही फ्लाईट आयोजित करण्यामध्ये इमिग्रेशन माफिया शशी रेड्डी असल्याची माहिती पुढे आलेली आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी हे विमान जेव्हा मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा त्यातील सर्व प्रवासी तोंड लपवत विमान तळाबाहेर निघून गेले. याची फारशी चर्चा झालेली नाही. ही अतिशय लाजीरवाणी अशी घटना आहे. पुढच्या 26 जानेवारीला फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यांच्या आगमनाअगोदरच ही नामुष्कीची घटना समोर आलेली आहे.
ही घटना अभूतपूर्व अशी असल्याने निदान चर्चेमध्ये तरी आली. चोरट्यामार्गान मग ते हवाईमार्गान असो का समुद्रमार्गान असो का पायी असो. अमेरिका आणि कॅनडामध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक सर्वात वर आहे. बऱ्याच वेळा हजारो भारतीय धोकादायकरित्या समुद्रमार्गाने छोट्या छोट्या होडींमधून अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात जीवाला मुकतात. त्यांचे तर नावसुद्धा समोर येत नाही. या संदर्भात सर्वात भयानक अशी हृदयद्रावक घटना 19 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आली आहे. गांधीनगर गुजरातच्या जगदीश पटेल त्यांची पत्नी वैशाली, मुलगी विहांगी आणि मुलगा धार्मिक कॅनडातून अमेरिकेमध्ये चोरट्या मार्गाने प्रवेश करत असतांना हवामान अचानक ड्रॉप होऊन -35 डिग्री सेल्सीयस झाल्याने गारठून मेले. अशाच प्रकारच्या अनेक घटना छोट्या मोठ्या बातम्या बणून आपल्या नजरेसमोरून येतात आणि जातात. गुजरातमध्ये दिगुचा नावाचे एक गाव आहे. ज्याचे 50 टक्के लोक कॅनडा आणि अमेरिकेमध्ये स्थायीक आहेत. गाव ओसाड असून नुसती बुजूर्ग मंडळी उदासपणे गावात बसून असते. अमेरिकेमध्ये घुसखोरी करण्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची कस्टम विभाग अमेरिकेने जारी केलेली आकडेवारी मती गुंग करणारी आहे. सप्टेंबर 2023 मध्ये 80 हजार भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या कस्टम विभागाने कॅनडा बॉर्डरमधून अमेरिकेत प्रवेश करतांना अटक केली. जानेवारी 2021 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये 1 लाख 90 हजार भारतीय चोरट्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश करतांना अटक झाले.
एकीकडे विजय माल्या, ललित मोदी, मेहूल चौकशी सारखे गुजराती देशाच्या बँकांना चुना लावून विदेशात स्थायीक होत आहेत. तर दुसरीकडे घरेदारे विकून गरीब लोक चांगल्या जीवनस्तराच्या शोधात विदेशात पलायन करत आहेत. ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. देशात जर बेरोजगारी नसती, सन्माने काम करण्याची संधी प्राप्त झाली असती, महागाई एवढी वाढली नसती, देशात जातीयवाद नसता , सर्व लोकशाही संस्था व्यवस्थित काम करत असत्या, राजकारण नासलेले नसते तर कदाचित हे लोक देश सोडून गेले नसते. या देशात आपल्याला भविष्य नाही, याची खात्री या लाखो लोकांना झाली म्हणूनच ते आपल्या जीवावर उदार होवून अशा चोरट्या मार्गाने विदेशात पळून गेले. विशेष म्हणजे 2018 पासून हा पलायनाचा ओघ वाढलेला आहे. ही झाली वस्तुस्थिती. आता या स्थितीला बदलण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करूया. खरे तर ही स्थिती बदलण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण अमृतकाल साजरा करणाऱ्या सरकारकडे जनतेसाठी वास्तविक कल्याणकारी योजना राबविण्याची दृष्टीच नाही. ते तर 80 कोटी लोकांना 5 किलो मोफत अन्नधान्य देऊनच संतुष्ट आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्याचा मार्ग माझ्या मते खालीलप्रमाणे आहे.
फक्त भौतिक प्रगतीने जगाचे कल्याण होणार नाही
जपानमध्ये एकटे राहून शांतपणे जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हे लोक कोणाशी ना कोणाशी नाराज असतात. राजधानी टोकिओमध्ये 2019 मध्ये एका व्यक्तीने क्योटो भागातील एका लोकप्रिय अॅनिमेशन स्टुडिओमध्ये एकट्यापणाच्या रागातून आग लावली होती. ज्यात 36 लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा आरोपीने स्टुडिओबद्दलची नाराजीचे कारण सांगितले. प्रगत देशांमध्ये कोण, कशाबद्दल, केव्हा नाराज होईल आणि मोठी घटना घडवून आणेल याबद्दल नेमके काहीएक सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये जो की जगातील सर्वात प्रगत देश मानला जातो, त्यात दररोज कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना घडतात आणि लोक हाकनाक मारले जातात. एकटेपणामुळे आलेल्या वैफल्यातून केली जाणारी गुन्हेगारी असो की प्रगत राष्ट्रात असलेल्या वांझोट्या संपन्नतेतून निर्माण झालेल्या विकृतीमुळे असो सातत्याने हिंसक घटना घडत असतात आणि त्यात निरपराध माणसं मारली जातात. ही एक मानसिक समस्या आहे. संपन्नतेतून मानसिक समस्या उद्भवण्याचे प्रकार आता जगाच्या प्रत्येक पुढारलेल्या देशात नित्याच्या झालेल्या आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक मेडिकल प्रॅक्टिस ही मनोचिकित्सकांचीच चालते. हे या गोष्टीचे द्योतक आहे की, भौतिक संपन्नतेमुळे माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही.
माणसाचे जीवन परिपूर्ण कसे होते?
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी म्हटले आहे की, ’’नैतिक शक्ती की प्रचुरता भौतिक संसाधनों की कमी की भरपाई कर सकती है पर भौतिक संसाधनों की प्रचुरता नैतिक शक्ती के कमी की भरपाई कभी नहीं कर सकती.’’ मनुष्याचा स्वभाव, त्याचे कर्म आणि जीवनाची कार्यप्रणाली ही त्याच्या धर्मावर आधारित असते. माणूस धार्मिक असेल तर धर्मातून प्रेम, त्याग, करूणा, मान, सन्मान, मर्यादा आणि संस्काराच्या चांगल्या भावना उत्पन्न होतात. परंतु जेव्हा माणसं धर्मापासून दूर जातात तेव्हा पतनाकडे अग्रेसर होत जातात. जो जेवढा धर्मापासून दूर तो तेवढा पतीत होत जातो, स्वार्थी होत जातो आणि आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमाविण्यामध्ये त्याला कुठलीही अडचण भासत नाही. स्वार्थी व्यक्ती इच्छा आणि आकांक्षाचा दास होऊन जातो. त्यांच्या पूर्ततेसाठी रात्रं-दिवस प्रयत्न करत असतो प्रसंगी डंकी मार्गाने विदेशात जाण्यासही मागे पुढे पाहत नाही. अशा लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा यांना कुठलीच मर्यादा नसते. रोज नवनवीन इच्छा माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. एक ईच्छा पूर्ण झाली नाही की दूसरी निर्माण होते. ती पूर्ण होते न होते तोच तीसरी उत्पन्न होते. एकाच वेळेस अनेक इच्छा-आकांक्षा मनामध्ये आकार घेतात व त्यांच्या पूर्ततेसाठी पैशाची गरज भासत असते. मग असे लोक पैसे मिळविण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा उपयोग करतात आणि अशा स्वार्थी समाजात ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच सन्मान मिळतो. मग त्याने पैसा कसा कमावला याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. कुठल्याही मार्गाने पैसा कमाविलेल्या प्रत्येक माणसाला जेव्हा समाजमान्यता मिळते तेव्हा वाममार्गाने संपत्ती कमाविण्यासाठी एक आंधळी स्पर्धा सुरू होते जिला कुठलेच निर्बंध राहत नाहीत. त्यातूनच लोक डंकीमार्गाने विदेशात घुसखोरी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशा समाजामध्ये नीती नियमांचे सर्व मापदंड कोसळून पडतात. अशा समाजातील पुरूष हे, स्त्री आणि संपत्ती यांच्याच पाठलागामध्ये आयुष्य खर्ची घालतात. या दोन गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्नशील असल्यामुळे इतर कुठलीही घरेलू आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्ती एकटी राहण्याचा प्रयत्न करते. शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची कायदेशीर सोय केली गेली असल्यामुळे स्त्री पुरूष दोघेही एकाचवेळेस अनेक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असतात किंवा किंबहुना ठेवतात. या सर्व धावपळीमध्ये त्यांना मुलं जन्माला घालण्याचा विसर पडतो. म्हणून अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांचा जन्मदर गेल्या कित्येक वर्षांपासून स्थिरच नव्हे तर मायनसमध्ये गेलेला आहे. नैतिक बंधने अशा समाजामध्ये झुगारून देण्याची प्रवृत्ती वाढते. धर्म जोखड असल्याची भावना निर्माण होते. नीती नियम हे त्यांना आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अंकुश लावणारी वाटतात. त्यामुळे अशा समाजातील लोकांचे चित्त कायम सैरभैर असते व ते स्वैराचाराकडे आकर्षित होतात आणि अख्खे आयुष्य त्यातच घालवतात. मग अशा समाजात बालगुन्हेगारी वाढते, स्त्री-पुरूषांच्या संबंधामध्ये अविश्वास वाढतो आणि त्यातून लैंगिक गुन्हे वाढतात. अमेरिकेमध्ये होत असलेल्या महिलांच्या हत्त्यांच्या एकूण आकडेवारीपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचे खून त्यांच्याच पुरूष मित्रांकडून केले जातात अशी आकडेवारी अनेक सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे.
अमेरिकीची चंगळवादी जीवनशैली ही माणसाला मनोरूग्ण करून विनाशाकडे नेणारी असल्याचे दिसून येते तर दूसरीकडे पुर्वेकडील (जपान) संपन्न जीवनशैली सुद्धा आत्महत्या आणि हत्येकडे नेणारी दिसून येते. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमधील जीवनशैली ही एवढी सक्षम जरूर आहे की त्यामुळे त्या देशात गुन्हेगारी नाही, मनोरूग्ण नाहीत, वृद्धाश्रमे नाहीत, सऊदी अरबमध्ये तर गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास शुन्य असते.
मुस्लिम देशांतून सुद्धा पलायन होते. विशेषकरून बांग्लादेशी मुसलमान भारतात येतात, पाकिस्तानचे मुस्लिमही डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याच्या घटना अधूनमधून कानावर पडतात. परंतु, हे मुसलमान नावाचेच असतात. त्यांना इस्लामी श्रद्धेचा वारा सुद्धा लागलेला नसतो. बांग्लादेशच्याच मुली घ्या, त्या भारतात येवून डान्सबारमध्ये काम करतात. इस्लामी श्रद्धेची त्यांना जाणीव असते तर त्या असे अनैतिक काम करण्यास धजावल्या नसत्या. थोडक्यात पलायनाचा थेट संबंध स्वार्थी जीवनशैलीशी आहे आणि अशा स्वार्थी जीवनशैलीवर अंकुश ठेवण्यासाठी जगामध्ये शरीयतपेक्षा प्रभावी उपाय दुसरा नाही. जे मुस्लिम शरीयतप्रमाणे जीवन जगतात ते परिस्थिती चांगली असो, वाईट असो त्यामध्ये समाधानाने राहतात. आत्महत्या करत नाहीत. डंकी चित्रपटानिमित्त हाच संदेश. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की हे अल्लाह आम्हाला आणि आमच्या देशबांधवांना निस्वार्थ जीवन जगण्यास समज आणि शक्ती दे.
- एम. आय. शेख
Post a Comment