महिला सशक्तीकरणाची जेव्हा चर्चा होते तेव्हा इस्लाममध्ये स्त्रीचे स्थान काय? यावरून नेहमीच वाद होत असतो. इस्लामवर सर्वात मोठा आरोप हाच लावला जातो की, इस्लाममध्ये महिलांना पुरूषाच्या अधिनस्थ ठेवलेले आहे. प्रत्येक गोष्टींसाठी त्यांना पुरूषांवर अवलंबून रहावे लागते. त्यांची स्वतःची मर्जी नसतेच. ते पुरूषांच्या हाताखाली वागण्यासाठी विवश आहेत. त्यामुळेच मुस्लिम समाज हा पतनाकडे जात आहे. हे सर्व आरोप चुकीचे आहेत.
खरे पाहता इस्लामशिवाय इतर धर्मांमध्ये महिलांशी अशा प्रकारचे वर्तन केले जाते जणूकाही त्यांची रचना कुठल्यातरी वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. ते कुठलेतरी दूसरेच जीव आहेत. याउलट इस्लाममध्ये असे मानले जाते की, स्त्री आणि पुरूष एकच जीव आहेत. जैविकरित्या दोघांमध्ये लिंगाशिवाय दूसरा फरक नाही. ईश्वराने माणसाला एका जीवापासून जन्माला घातले आणि त्या पुरूषापासून स्त्री बनविली. यासंबंधी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’ (सुरे अन्निसा 4: आयत नं.1). या आयातीत ज्या पहिल्या पुरूषाचा उल्लेख आहे तो पुरूष म्हणजे ह. आदम (अॅडम) (अलै.) होत. प्रेषित मुहम्मद सल्ल. या संबंधी म्हणतात, ’’तुम्ही सर्व आदमची संतती आहात’’ (संदर्भ : तिर्मिजी -3955).
कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’ तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या जिन्सपासून बायका बनविल्या.’’(संदर्भ : सुरह अलनहल आयत नं. 72). थोडक्यात रचनेच्या दृष्टिकोनातून पाहिले असता इस्लाममध्ये स्त्री-पुरूष समान आहेत. ईश्वराने कुरानमध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट, खरे-खोटे, पुण्य-पाप यासंबंधी स्पष्ट असे निर्देश दिलेले आहेत. कुरआनमध्ये स्त्रियांना घेऊन कुठलाच भेदभाव केलेला नाही.
’’खचितच जे पुरुष आणि ज्या स्त्रिया मुस्लिम आहेत, श्रद्धावंत आहेत, आज्ञाधारक आहेत, सत्यानिष्ठ आहेत, संयमी आहेत, अल्लाहच्या समोर झुकणारे आहेत, दानधर्म करणारे आहेत, उपवास करणारे आहेत, आपल्या शीलांचे रक्षण करणारे आहेत, आणि मोठ्या प्रमाणात अल्लाहचे स्मरण करणारे आहेत, अल्लाहने त्यांच्यासाठी क्षमा आणि महान मोबदला तयार ठेवला आहे.’’ (सुरह अलअहजाब 33 आयत नं. 35)
या आयातीत 10 मानवी मुल्ये दिलेली आहेत. याची अंमलबजावणी स्त्री आणि पुरूष दोघांवर समानरित्या लागू केलेली आहे. जगात स्त्री असो का पुरूष जे काही कृत्य करतील ते वाया जाणार नाहीत. ईश्वराने समस्त मानवजातीला वचन दिलेले आहे की, जगात जी व्यक्ती मग ती स्त्री असो का पुरूष पुण्य कर्म करेल, मृत्यूनंतर निवाड्याच्या दिवशी त्याचा त्याला योग्य मोबदला दिला जाईल. या मोबदल्यामध्ये स्त्री आणि पुरूष असा कुठलाच भेद केलेला नाही. ही काही मोजकी उदाहरणे आहेत. कुरआनमध्ये याशिवाय, सुरे नहल आयत नं. 97, सुरे अन्निसा आयत नं. 123-124, सुरह मोमीन आयत नं. 40, सुरह अलअस्त्र आयत नं. 15-16 आणि सुरह आतीर आयत नं. 18. यामध्ये जे मार्गदर्शन दिलेले आहे ते स्त्री-पुरूष दोघांना समान आहे.
यावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की एक व्यक्ती म्हणून इस्लाममध्ये स्त्री किंवा पुरूष यांच्यात कुठलाच भेद केलेला नाही. म्हणून प्रेषित नूह अलै. यांच्या मुलाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. एक प्रेषितांचा मुलगा असूनसुद्धा त्याला ईश्वरीय कोपाला सामोरे जावे लागले. प्रेषित नूह आणि प्रेषित लूत अलै. यांच्या बायका यांनीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून त्यांनाही ईश्वरी कोपाला सामोरे जावे लागले. स्पष्ट आहे स्त्री असो का पुरूष असो प्रेषितांच्या शिकवणीची अवहेलना करणारे कोणीही असो त्यांना शिक्षा मिळणारच. इजिप्तचा राजा फिरऔनची पत्नी एक पुण्यवान स्त्री होती. तीने आपल्या जुल्मी पतीविरूद्ध जाऊन प्रेषित मुसा अलै. यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुण्यवान जीवन जगण्याचा निर्णय घेतला. एक क्रूर शासक फिरऔन आणि त्याची पुण्यवान पत्नी दोघांत किती फरक होता. क्रूर फिरऔन समुद्रामध्ये जीवंत गाडला गेला आणि त्याची पत्नी मात्र ईश्वराच्या प्रसन्नतेस पात्र ठरली. यावरून स्पष्ट होते की, इस्लाममध्ये स्त्री आणि पुरूष दोघांचा समान दर्जा आहे. दोघांचा अंतिम निवाडा त्यांच्या-त्यांच्या वैयक्तिक कर्मानुसार होणार आहे. स्त्रीला पुरूषाच्या किंवा पुरूषाला स्त्रीच्या कृत्याबद्दल प्रश्न विचारला जाणार नाही. थोडक्यात इस्लामने स्त्री आणि पुरूषाला समान दर्जा दिला आहे. मात्र दोघांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे ठेवलेले आहे. दोघांची कर्तव्ये वेगळी ठेवलेली आहेत. इस्लामने पुरूषांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीप्रमाणे घराबाहेरील कठीण कामे दिलेली आहेत आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अर्थार्जन करण्याचा आदेश दिलेला आहे. तर स्त्रीला तिच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीप्रमाणे घराच्या आतील जबाबदारी दिलेली आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्यामुळे तिला अर्थार्जनासारख्या कष्टदायी जबाबदारीतून मुक्त ठेवलेले आहे. कुटुंब व्यवस्था योग्य पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी ही विभागणी अत्यंत गरजेची आहे.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment