विश्व निर्मात्याने माणसामध्ये इतर निर्मितीच्या तुलनेत उच्च दर्जाची कौशल्ये आणि क्षमता निर्माण केली, ज्यांमुळे माणूस अनेक निर्मितीमध्ये श्रेष्ठ व आदर-सन्मानास पात्र ठरला. विश्व निर्मात्याने कुरआनमध्ये म्हटले आहे, व-लकद कर्रमना बनी आ-द-म आम्ही आदमच्या संततीला प्रतिष्ठा दिली. ( 17 बनी इस्त्राईल : 70 )
विश्व निर्मात्याने माणसाला सन्मानित केले, अन्यथा तो स्वत: इतका कमकुवत व अक्षम आहे की तो इतर अनेक निर्मितीशी स्पर्धा करूच शकत नाही. अल्लाहने माणसाला उत्तम शरीर रचनेत व देखण्या रूपात निर्माण केले. सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचे ज्ञान त्याला दिले. मग फरिश्त्यांना हुकुम दिला की त्यांनी माणसासमोर नतमस्तक व्हावे. तसेच सूर्य, चंद्र, वारा आणि इतर निर्मिती माणसाच्या हितासाठी त्याच्या सेवेत ठेवल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे अल्लाहने पृथ्वीवर माणसाला आपला उत्तराधिकारी बनवले. माणसाला यासाठी प्रतिष्ठित केले गेले की त्याने सर्व कृपांची कदर करावी. त्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी. पृथ्वीवर जी कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्याला पाठवले आहे त्यांची काळजी घ्यावी. अल्लाहच्या भूमीवर उपद्रव माजवण्याऐवजी मानवजातीच्या कल्याणाची व्यवस्था करावी आणि आपल्या निर्मात्याचा कृतघ्न होण्याऐवजी त्याचा कृतज्ञ व आज्ञाधारक भक्त बनून राहावे. पण किती मोठा अन्याय आहे हा की माणूस आपल्या निर्मात्या, स्वामीला विसरून त्याच्यापासून दूर होतो, स्वतःसारख्या दुसऱ्या माणसांसमोर किंवा इतर कोणत्याही सजीव व निर्जीव वस्तूंसमोर नतमस्तक होऊन त्यांची भक्ती, उपासना करू लागतो. जर माणसाने आपली मान-मर्यादा सांभाळली नाही तर तो आपल्या निर्मात्याचा भक्त होण्याऐवजी सैतान व भौतिक जगाचा गुलाम बनतो. मग मृत्यूनंतरच्या जीवनाला आपल्या प्रवासाची दिशा बनवण्याऐवजी तो रंगबिरंगी जगाच्या प्रेमात भरकटतो. याचाच परिणाम आहे की, माणसाने आपल्या भौतिक स्वार्थापोटी रंग, वंश, धर्म, भाषा व सीमेच्या नावावर माणसांमध्ये फूट पाडली. माणसा-माणसात द्वेष निर्माण करून त्यांना आपसात भिडवले. वास्तविक पाहता सर्व मानव एकाच आई-बापाची मुलं आहेत. प्रत्येकाच्या शरीरात एकाच रंगाचे रक्त वाहते. सर्वांच्या गरजा व भावना एकसारख्याच आहेत. पण क्षणभंगूर स्वार्थापायी मानव स्वतःसारख्या इतर मानवांचे निर्दयीपणे रक्त सांडतो. त्याच्या अन्याय व अत्याचाराला कोणतीही सीमा नसते. आज मानवी हक्कांच्या नावावर माणसांचे हक्क तुडवणारेही मानवच आहेत. धुर्त आहेत ती माणसे व संघटना जी मानवी हक्कांचा मोठा आव आणतात आणि मानवी हक्कांच्या नावाखालीच मानवजातीच्या विरुद्ध लांच्छनास्पद खेळी खेळतात. अशा सर्व माणसांवर इतिहासकारांची नजर आहे, जे मानवजातीवर डाग आहेत. ज्यांना या जगात कधीही खरा मान मिळाला नाही आणि मरणोत्तर जीवनातही मिळणार नाही. विश्व निर्मात्याने माणसांना प्रतिष्ठित केले पण लोकं आपल्या दुष्कर्मांनी स्वतःच्या पायावर स्वतःच्याच हातांनी वार करून घेतात. अशा सर्व लोकांना आपल्यावर लागलेले डाग धुवायचे असतील तर त्यांना प्रत्येक माणसाची कदर करावी लागेल. संपूर्ण मानवजातीच्या जीवाची, मालमत्तेची, आदर-सन्मानाची व प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल. लोकांच्या खऱ्या व योग्य भावना समजून घ्याव्या लागतील. लोकांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य द्यावे लागेल. आपण खरोखरच माणुसकीचे प्रणेते आहोत हे त्यांना आपल्या कृतीतून सिद्ध करावे लागेल. या सर्व गोष्टींचे पालन करायचे असेल तर आपापल्या मनमानी पद्धतीने नव्हे, तर यासंबंधी विश्व निर्मात्याला माणसांकडून काय हवे आहे? हे त्याने अवतरित केलेल्या अंतिम ग्रंथाद्वारे जाणून घ्यावे लागेल.
... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment