Halloween Costume ideas 2015

महापरिनिर्वाण दिनी उग्रवाद्यांचे काळे कृत्य!

...बाबासाहेबांना खरी आदरांजली..!


नुकताच आपण संविधान दिवस साजरा केला. या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनास महापरिनिर्वाण दिन म्हणतात. त्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीय समाजात आदर असणे साहजिक आहे. त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशी संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भारत देशात विषमता एवढी पसरली होती की तेथे समतेची आशा करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर आली. त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्या संविधानाचा पाया स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाने पक्का केला. त्यामुळे समानतेच्या छायेत विषमतेची गुरमी थंड पडली आणि प्रत्येक जण स्वतंत्र श्वास घेण्यास सक्षम झाला.

आज संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच सर्व जण आपले धार्मिक रितीरिवाज, सण-उत्सव मिळून मिसळून उत्साहाने साजरे करतात. त्यामध्ये इतर धर्मीय बांधवही सहभागी होतात. प्रत्येक धार्मिक समुदाय आपल्या प्रार्थनास्थळांची निर्मिती करून या स्वातंत्र्याची हमी देत असताना 1992 च्या महापरिनिर्वाणाच्या दिनी असंवैधानिक कृत्य घडले, ते म्हणजे बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांनी दिलेल्या संविधानाचा अपमान या घटनेच्या रूपात सगळ्या जगाने उघड्या डोळ्यांनी पाहिला. 

संविधानाचा आदर करणारे या दिवसाला काळा दिवस म्हणून पाळतात. ही घटना फक्त सत्तेच्या लालसेपोटी राजकारण्यांनी जाणूनबुजून घडवली. त्याच्या परिणामस्वरूप सामान्य हिंदू-मुस्लिम होरपळून निघाले. सोबतच स्वातंत्र्य आणि समतेची धिंड निघाल्यासारखे वाटले.

यात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वर वर पाहता या दोन्ही बाबींचा काही संबंध असेल असे जाणवत नाही. परंतु साशंक नजरेने पाहिले तर प्रश्न पडतो की याच दिवशी हे कृत्य घडवण्यामागे काही कट असेल का? राष्ट्रवादाच्या नावावर एवढे मोठमोठे नारे देणारी अराजक तत्त्वे एखाद्या शुभमुहूर्तावर किंवा तिथीवर हे काम का करू शकले नाही? यासाठी हाच दिवस निवडण्याची काय गरज भासली? याचे उत्तर शोधताना जर आंबेडकरांच्या धर्मपरिवर्तनाचा अभ्यास केला तर हे माहीत होते की हिंदू धर्मातील वर्णवादाने त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले. हे करत असताना त्यांनी आपल्या कृतीने आणि लेखणीने धर्माची खास करून विषमतावाद, रूढीवादाचे दहन करून संविधानासारखे समानतेचे धडे लोकांना शिकवले. याच गोष्टीची आठवण 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर सारख्या दिवशी संपूर्ण भारतभर केली जाते.

6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद शहीद करण्याची घटना लोकांच्या मनावर अशाप्रकारे बिंबवली जाईल की लोकांना महापरिनिर्वाण दिन साजरा करताना बाबासाहेबांनी धर्माचा त्याग केल्यामुळे जी विषमतावाद्यांची असफलता दिसून येत होती त्याऐवजी लोक बाबरी मस्जिद शहीद केल्याची आठवण करतील.

1992 ते 2019 पर्यंत, इतका प्रदीर्घ चाललेला बाबरी मस्जिद उद्ध्वस्तीकरणाचा संवेदननशील खटला माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 ला निकाली काढला. हा निकाल भारतीय नागरिकांनी अगदी शांतपणे स्वीकारला ही बाब खरंच अभिमानास्पद आहे, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली.


- हर्षदीप बी. सरतापे

7507153106


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget