सांगली जिल्ह्यातलं एका लहानशा खेड्यातील कवी बा. ह. मगदूम हे सध्या नोकरीच्या निमित्याने पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांचं बालपण खेड्यात गेलंय्. गावातलं मातीचं, शेतशिवाराचं वातावरण आजही त्यांच्या मनाला व्यापून राहीलय्. त्यांच्या घराण्यात कोणत्याही तऱ्हेची वांग्मयीन परंपरा नसतानाही ते उत्तमोत्तम कविता लिहिताहेत. ही अप्रूपाची, कौतुकाची गोष्ट आहे. 'नक्षत्रपेरणी' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झालंय्. तो रसिकांचं लक्ष वेधणारं आहे. केवळ पोटापुरतीच शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालाय्. त्यातही खडकाळ माळरानच अधिक आहे. परंतु कवीनं त्यावर शब्दांची नक्षत्रपेरणी करून मोहक कवितांचा मळा फुलविलाय्. एका सच्च्या भूमिपुत्रानं निसर्गाशी केलेलं हे हितगूज आहे.
कवी बा. ह. मगदूम यांच्या कवितांमधून शेतशिवार, माती, पाऊस, निसर्ग, झाडं, दुष्काळ, नद्यानाले ओढे यांचं जिवंत चित्रण जसं येतं तसंच बालपणात अनुभवलेली हलाखीची कौटुंबिक परिस्थिती, आई-वडिलांनी उपसलेले अपारकष्ट, आई-वडिलांवरील प्रेम, गावाविषयीचा जिव्हाळा, सुखददुःखद आठवणी, आशा, निराशा आदी विषयावरील कविताही त्यांच्या संग्रहातून वाचायला मिळतात. मगदूम हे हळव्या मनाचे कवी असले तरी त्यांची सामाजिक जाणीवही प्रगल्भ आहे. बांधिलकी घट्ट आहे. मायमराठी, देशप्रेम, भारतीय संस्कृती अन् भक्तीभावाचा उत्कट अविष्कार त्यांच्या अनेक कवितांमधून झालेला दिसून येतो. ते कितीही कार्यव्यस्त असले तरी काव्याचं वेड त्यांची पाठ नाही सोडत. कवितेनं त्यांना भारून टाकलेलं असते. जागोजागी हा कवी शब्दांची पेरणी करून नक्षत्राचा मळा फुलवितो. नियमित काव्यलेखनांबरोबरच ठीकठिकाणी होणाऱ्या कविसंमेलनातील त्यांचा निमंत्रित सहभाग अन् प्रभावी सादरीकरण रसिकांना सुखावणारा असतो. मगदूम यांच्या कवितांची सर्वत्रच धूम असते. मायमराठीविषयी कवीला अतीव जिव्हाळा आहे. तर संतांविषयी कमालीचा लळा आहे. मायमराठीचा मळा सतत फुलला पाहिजे. प्रत्येकाच्या बोलण्यातून शब्द खळाखळा वाहिला पाहिजे. अक्षरांच्या फुलमाळा सर्वांच्या घरोघरी लागल्या पाहिजेत. संतांनी कीर्तनातून, अभंगातून समाजाचं प्रबोधन करण्याचं अजोड कार्य केलंय्. त्यांच्या रचनांना मायमराठी समृद्ध झालीय्. याची जाणीव ठेवायला हवी. तरच मराठीचं मराठीपण, संतांचं संतत्व टिकून राहील. असं कवीला वाटतं.
माय मराठीचा मळा
शब्द वाहे खळाखळा
अक्षरांची फुलमाला
संतांनी लाविला लळा
निसर्ग अन् अध्यात्म या विषयाची मांडणी अनेक कवितांमधून झालेली असली तरी प्रतिमांची, प्रतीकांची पुनरुक्ती आढळून नाही येत. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' हा सोयरेपणाचा स्थायीभावच शब्दाशब्दांतून प्रकट होत राहतो.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कवीचे आदर्श आहेत. शिवाजी महाराज यांच्या पारदर्शी राज्यकाराची, सर्वधर्मसमभावी डॉ. आंबेडकरांना देशाला दिलेल्या सर्वव्यापी, सर्वस्पर्शी राज्यघटनेचा प्रत्येक नागरिकाने विशेषतः नेत्यांनी अंगीकार करायला हवा. विद्यमान राजकीय परिस्थितीला आरसा दाखविणाऱ्या दोन स्वतंत्र कविता मुळातून वाचण्यासारख्या आहेत. एकतेचा, मानवतेचा सूर आळवणाऱ्या या कवीला आपल्या महान परंपरेचा श्रेष्ठ भारतीय संस्कृतीचा, जाज्वल्य इतिहासाचा विलक्षण अभिमान आहे. त्याची जीवापाड जपणूक व्हावी. त्याला गालबोट लागता कामा नये, परंपरेचा पाईक होण्यातच सर्वांचं कल्याण आहे. ही गोष्ट विशद करताना कवी म्हणतो.
भारतीय संस्कृती
साऱ्या विश्वात श्रेष्ठ
नका लावू तुम्ही
परंपरेला गालबोट
आईचा मोठेपणा तिचा मायाळूपणा वादातीत आहे. आईच्या त्यागाची, कष्टाची थोरवी सांगणाऱ्या कितीतरी कविता आवर्जून लिहिल्या गेल्यात्. परंतु मगदूमांनी अध्यात्म अन् संस्कृतीचा सुयोग्य मेळ घालत आईवर लिहिलेली कविता अप्रतिम आहे. त्यातील मातृप्रेमाला तोड नाही. तीळ, गूळ या दोहोना भारतीय संस्कृतीत मोठं महत्त्व आहे. कवीनं आईला दिलेली उपमा लेकरांच्या मनात गोडवा निर्माण करणारी आहे.
आई गं गूळ तू
आई गं तीळ तू
आई गं माळ तू
आई गं टाळ तू
आईचं ॠण सगळेच मान्य करतात. ग्रामीण भागातील बापाचं नातं कष्टाशीच घट्ट जुळलेलं असतं. बाप आपल्या कष्टाचा बोभाटा न करता भुकेची काहीली सहन करत मातीत प्राण ओततो. अहोरात्र कष्ट करत असतो. पण बापाच्या या ढोर मेहनतीचं, कर्तव्याचं बहुतांशी मुलांना विसर पडतो. मराठी कवितेतही बाप हा नेहमीच दुर्लक्षित राहात आलंय्. पण इथं कवी बापाच्या घामाच्या धारांची दखल घेतो. हे विशेष.
प्राण ओतून मातीत
भुक ठेवत पोटात
रात्रंदिवस कष्टात
बाप राबतो शेतात
मगदूम यांच्या कवितांमध्ये विषयांचं वैविध्य आहे. ते जसं सामाजिक विषमतेची शोकांतिका मांडतात तसंच प्रीतीच्यास्पर्शाच्या हळुवार भावनाही व्यक्त करतात. प्रियेचा हात हाती आला की उरात प्रेमाची वात उजळते. जीवन प्रकाशमय होते. तिचा पहिला स्पर्शही पहिल्या पावसासारखा अल्हाददायक वाटू लागतो. मातीसारखा सुगंध दरवळू लागतो. जीवनाला रंग चढतो.
तुझा तो पहिला स्पर्श
जसा पहिला पाऊस
देई सुगंध पाऊस
रंग भरुनी प्रेमास
सत्यशील माणसाच्या अंत:करणातच देवाचं अस्तित्व अबाधित असतं. त्याला मंदिर-मशिदीत जायची फारशी गरज भासत नाही. तरीही ऊठसूट मंदिर-मशिदीवरून तंटे होतात. वैमनस्यातून दंगली उसळतात. त्यात गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी होते. याबद्दल कोणीच संवेदनशील नसतं. जातीचं भूत माणसाच्या मानगुटीवरून कधी उतरणार, हा खरा प्रश्न आहे. सहिष्णुतेचा संदेश देणारा हा अभंग कवी लिहितो.
चिखलात जाती मधल्या
समाज माखलेला
या बंधुभावनेला
जोडून टाकले मी
कृषिप्रधान देशात शेतकरी दुष्काळाच्या दुःखकळा सोसतोच आहे. सावकारांच्या कर्जानं धास्तावलेला शेतकरी फास जवळ करतोच आहे. दुष्काळाचं हे सार्वत्रिक भीषण चित्र आहे. श्रमिकांचं सर्रास होणारं शोषण, स्त्रीची फरफट, राजकारणात दिवसेंदिवस होत चाललेलं लोकशाही मूल्याचं ऱ्हास, वाढत्या महागाईनं होत चाललेली जनतेची त्रेधातिरपिट अशा एक ना अनेक अस्वस्थ करणाऱ्या समस्या कलियुगात पाहावयास मिळत आहेत. गळून पडलाय् आपलेपणाचा तारा, आटून गेलाय् माणुसकीचा झरा, सदाचाराला कुठेच नाही थारा कलियुगाच्या या विदारक परिस्थितीचा कवीनं सातबारा सादर केलाय्.
तुटून गेल्या हृदयातील आपुलकीच्या तारा
मगदूमने लिहिला कलियुगाचा सातबारा
कवीची शब्दकळा गीत, गझलच्या अंगानं जाणारी आहे. परंतु त्यांनी त्याचा अजूनही अभ्यास करण्याची गरज आहे. तंत्राशिवाय अशा रचनांना तंत्रशुद्ध म्हणता नाही येत. याचा कवीनं विचार करावा.
- बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी : ९८९०१७१७०३
-०-०-०-
नक्षत्रपेरणी : काव्यसंग्रह
कवी : बा. ह. मगदूम
यशोदीप पब्लिकेशन्स पुणे
पृष्ठे : ९६ मूल्य : १५० ₹
Post a Comment