हरीयाणा राज्यातील एका खासदाराने नुकतेच संसदेत अशी मागणी केली आहे की सरकारने लिव्ह इन नातेसंबंधांवर बंदी घालावी, त्याचबरोबर प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करावी.
भारतात जसजशी श्रीमंती वाढू लागली आहे तसतसे संस्कृतीच्या समस्या निर्माण होत आहेत. एकीकडे श्रीमंतीची स्वप्ने बाळगणाऱे मुलेमुली, दुसरीकडे त्यांचे आईवडील किंवा कौटुंबिक संस्कृती यात कलह निर्माण होत आहे. आपल्या मुलांनी आपल्याप्रमाणेच जगावे, ज्या संस्कृती-सभ्यती आणि आर्थिक परिस्थितीत आपण जगलो, जीवन व्यतीत केले, गरिबीचे चटके सहन करीत कर्जाच्या ओझ्याखाली आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षांचा आपण बळी दिला, आपल्या संततीचे संगोपन केले, त्यांना शिक्षण दिले, डॉक्टर-इंजीनियर केले किंवा तसे नाही जमले तर एखाद्या सरकारी किंवा खाजगी कार्यालयात क्लर्कची नोकरी मिळवून दिली, यावर त्यांनी समाधान मानले. आपल्या मुलांनीदेखील आमच्यासारखेच जगावे अशी मातापित्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण जे स्वाभाविक नाही ते हे की भावी पिढ्यांना आपल्या कौटुंबिक संस्कृतीशी तसा काही लगाव नसतो आणि मग इथपासून मातापिता आणि संतान यात मतभिन्नता होते. कधी ती तीव्र होते तरीपण आईवडील आणि संतती कसेबसे निभावून घेतात.
सध्याच्या पिढीला लगन, संतान वगैरे हाच एक ध्यास नाही. त्यांच्यासमोरील ध्येय हे अतिश्रीमंती कमवण्याचा आहे. कारण सगळीकडे हीच संस्कृती वावरताना ते पाहतात. मग आपण तरी कसे मागू राहू, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. यामुळे मातापित्यांपासून त्यांचा दुरावा निर्माण होतो. कधी कधी याचे वाईट परिणाम समाजासमोर येतात. आईवडिलांना वृद्धाश्रमात जमा करून टाकतात जसे त्यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही. कोणतेही कसलेही नाते नाही. पुढे त्यांचे काय होते हेदेखील पाहायची त्यांची इच्छा नसते. इच्छा असली तरी सवड नसते, तर सध्याच्या पिढीसमोर हे आव्हान म्हणण्यापेक्षा त्यांच्यासमोर जी स्वप्ने आहेत ती त्यांना साकारायची आहेत.
ह्या स्वप्नांचा पाठलाग करता करता इतकी वर्षे आणि इतके वय निघून जाते की मुले असोत की मुली त्यांच्या विवाहाचे नैसर्गिक वय निघून जाते. त्यामुळे ते याला दुसरा पर्याय निवडतात. जसे लिव्ह इन नातेसंबंध प्रस्थापित करणे वगैरे. कारण यात धर्म, संस्कृती-सभ्यता, नैतिकता, कौटुंबिक नीतीमूल्ये यातले काहीच पाहण्याची गरज नाही. फक्त लैंगिक-शारीरिक मोहाचे समाधान! काही काळानंतर यात दुरावा येतो. त्या दोघांना एकत्र बांधून ठेवण्याचा कोणताही सामाजिक दुवा नसतो. म्हणून त्यांच्यात कलह निर्माण होऊन याची परिणती हत्येत होते. कारण हाच शेवटचा उपाय मुलांसमोर उरतो. ही भारतातील कोणत्याही धर्माची संस्कृती नाही. म्हणून कोणताही सामाजिक उपाय नाही. स्वतःला संपवून टाकणे एवढाच अंतिम उपाय असल्याचे त्यांना वाटू लागते.
दुसरी एक संस्कृती भारतीय समाजात पसरताना दिसते ती व्यभिचाराची, परक्या स्त्रीशी संबंध जोडण्याची. ही गोष्ट पाश्चिमात्य संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. कारण स्त्री आणि तीही परस्त्रीच्या मोहापासून त्यांची लैंगिक नैतिकता सुरू होते. कुणा दुसऱ्याची प्रॉपर्टी चोरली तर त्यासाठी न्यायालयात खटला चालतो. चोराला शिक्षा होते. त्याला जेलची हवा खावी लागते. पण जर परस्त्रीशी संबंध जोडले तर यात त्यांना काही गैर वाटत नाही. आमच्या बुद्धिजीवी वर्गावर पाश्चात्य मूल्यांचा भलामोठा प्रभाऱ आहे. पाश्चात्यांनी मानवी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती इत्यादींच्या नावाखाली जे केले तो जणू इथल्या शिक्षित वर्गाला एक प्रकारचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा दाखलाच असतो. म्हणून आमच्याकडील न्यायालयाने सुद्धा परपुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे स्त्रीसाठी वैध तर पुरुषासाठी गुन्हा ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत २०१८ साली तसा निर्णय दिला होता. गृहमंत्रालयाच्या संसदीय समितीने अशी शिफारस केली आहे की परपुरुष किंवा परस्त्रीशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला गेला होता त्याला रद्द करून हा गुन्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू करावा अशी मागणी केली आहे.
नुकतेच केरळमधील एक डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर मुलगी यांच्यात विवाहाचा प्रस्ताव संमत झाला होता, पण ऐन वेळेला मुलाने हुंड्याच्या यादीत वाढ करून १५ एकर जमीन आणि एका बीएमडब्ल्यू कारची मागणी केली. त्याच्या सासऱ्याने अगोदरच १५० तोळे सोने देण्याचे वचन दिले होते. तरीपण ते ह्या मुलाला पुरेसे वाटले नाही. त्यामुळे डॉक्टर मुलीने आत्महत्या केली. ही वृत्तीदेखील अतिश्रीमंतीची अमर्याद हाव म्हणावी लागेल. नव्या पिढीच्या या नव्या समस्या आहेत, कारण कौटुंबिक समाजाने माघार घेतली आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment