विश्व निर्मात्या अल्लाहने मानवजातीला उद्देशून केलेले संबोधन म्हणजे पवित्र कुरआन होय. अल्लाहने हा ग्रंथ मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी आपले अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्यावर अवतरित केला. हा ईशसंदेश वाचतांना वाचकांनी निश्चिंत राहावे की खुद्द विश्व निर्मात्याने या ग्रंथाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असल्यामुळे यामध्ये एका अक्षराचाही बदल झाला नाही व होणारही नाही. यापासून मार्गदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीमध्ये ईशभय असणे आवश्यक आहे. तसेच ही जाणीवही असणे गरजेचे आहे की माझे जीवन व्यर्थ वा उद्देशहीन नाही, मला माझ्या जीवनाबद्दल आपल्या निर्माणकर्त्याला जाब द्यायचा आहे.
या संदेशाच्या बाबतीत मानवी प्रतिक्रिया तीन प्रकारे आढळते, ज्याचा उल्लेख कुरआनच्या सुरुवातीला आहे. एक गट तो आहे ज्याने हा संदेश ऐकला-वाचला आणि तो स्वीकारून त्यानुसार प्रामाणिकपणे जगला. हाच गट सरळ मार्गावर आहे. आपल्या निर्मात्याचा आज्ञाधारक असल्याने या जगाबरोबर मरणोत्तर जीवनातही यशस्वी आहे. याउलट, दुसरा गट आहे, ज्याने या प्रकाशाकडे पूर्णपणे डोळेझाक केली आणि आपल्या मनाची दारे त्यासाठी बंद ठेवली. मग निसर्गकर्ताही अशा कृतघ्न लोकांना मार्गदर्शन मिळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवतो कारण आपल्या वर्तनामुळे ते त्याच लायकीचे आहेत. तिसऱ्या गटात ते लोक आहेत जे आपल्या तोंडाने जरूर म्हणतात की आमची या ग्रंथावर श्रद्धा आहे परंतु ते कधी तरीच या प्रकाशाकडे वळतात. त्यानुसार जगण्याची इच्छाही दर्शवतात पण त्यांच्या आवडीनिवडी, पूर्वग्रह, स्वार्थी इच्छा, सांसारिक हितसंबंध आणि चारित्र्याचा कमकुवतपणा त्यांना या दिशेने वाटचाल करू देत नाही. हा गटही मार्गदर्शनापासून वंचित राहतो, भलेही त्यांचे नाव मुस्लिमांच्या यादीत असले तरीही. खरे पाहता माणसांच्या आचार-विचारांनूसार त्यांची विभागणी तीनच गटात होते. सत्य स्वीकारून लाभान्वित होणारा एक गट जो आपल्या स्वामीचा निष्ठावंत आहे आणि सत्य नाकारून, वंचित राहणारे दोन गट जे बंडखोरांच्या गटात मोडतात. ही विभागणी नैसर्गिक आणि तार्किक आहे. याशिवाय रंग, वंश, भाषा इत्यादीच्या नावावर मानवजातीचे पडलेले तुकडे लुच्च्या लोकांचे लबाड कारस्थान आहे. जे मानवतेसाठी अत्यंत घातक आणि विनाशकारी आहे. विश्व निर्मात्याने ईशसंदेशाच्या बाबतीत लोकांच्या वेगवेगळ्या वृत्ती दर्शविल्या. लोकांनी पवित्र कुरआन उघडण्याआधी ’आपण कुठे उभे आहोत?’ हे तपासून घ्यावे. जर खरच मार्गदर्शन मिळवायचे असेल तर ईशभय बाळगणे आवश्यक आहे. पवित्र कुरआनचा संदेश समजून घ्यायचा असेल तर आत्मपरीक्षण करावे लागेल. आवश्यक गुणांची कमतरता असेल तर त्याबद्दल काळजी घ्यावी लागेल.
पवित्र कुरआनने तीन तऱ्हेच्या मानसिकतेचा उल्लेख करून संपूर्ण मानवजातीला अध्याय अल-बकरहमध्ये आपला पहिला संदेश दिला. ज्याची सुरुवात ’या अय्युहन्नास!’ म्हणजे हे लोकांनो! असे संबोधून केली. येथे लोकांना संदेश देतांना ’हे मुस्लिमांनो’ किंवा ’हे अरबांनो’ असा उल्लेख नाही हे विशेष लक्षणीय होय. तर विश्व निर्मात्याने संपूर्ण मानवजातीला संबोधित केले आहे, ज्याच्यासाठी आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्याकडे अंतिम पैगंबरीय कार्य सोपविण्यात आले आणि त्यांच्यावर पवित्र कुरआन अवतरित केले गेले.
.......................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment