हिजाब' या एका शब्दाला घेऊन आज समाजात खूप गैरसमज आहेत. ‘हिजाब का आवश्यक आहे?' या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी देशातील सत्य परिस्थिती पाहू या. तर ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो' या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या अहवालानुसार, फक्त २०२१ साली बलात्काराचे नोंद झालेले गुन्हे आहेत- ३१,६७७. याचा अर्थ की प्रत्येक १६ मिनिटाला भारतात एका महिलेवर बलात्कार होतो. आणि हे फक्त नोंद झालेले गुन्हे आहेत. नोंद न झालेले किती गुन्हे असतील याची कल्पना करा. तसेच याव्यतिरिक्त छेडछाड, महिलांशी अश्लील वर्तन, सोशल मीडियावर बदनामी करणे इ. महिलांबाबत अनेक जे गुन्हे आहेत ते भारतात सतत सुरूच आहेत. निर्भया प्रकरणानंतर कायदे कडक झाले पण बलात्कार वाढले की कमी झाले, हे वरील आकडेवारीवरून सरळ सरळ लक्षात येते. कारण कायदा हा माणसाला पूर्णतः अंकुश घालण्यास असमर्थ आहे कारण वासनेच्या त्या उच्च क्षणी माणसाला कायद्याचा विसर पडतो. आणि कायद्याची कार्यपद्धती पाहिली तर ती पूर्णपणे पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती बलात्कार पीडितांना न्याय मिळतो किंवा मिळाला? न्यायालयाच्या 'हार-जीत'च्या बुद्धिबळात हुलकावण्या किती? न्याय मिळणे तर दूरच पण स्त्रीच्या अब्रूची लक्तरे ओढली जातात. तिचे आयुष्य बरबाद होते. मानसिकरित्या तिचे खच्चीकरण होते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की कायदा पीडित महिलेशी पूर्ण न्याय करु शकतो का?- एक तर गुन्हा साबित होणे अवघड, मग शिक्षा मिळाली तरी स्त्रीला ज्या जीवघेण्या शारीरिक यातना, जो गंभीर मानसिक आघात होतो, त्याची तंतोतंत परतफेड हा कायदा करू शकतो का?... नाही ना!
अर्थात आपण या सर्व ज्या गोष्टी बोलतोय त्या स्त्रीवर बलात्कार झाल्यानंतरच्या आहेत. मुळात अशी एक गोष्ट असायला हवी जी तुम्हाला या घटना रोखण्यापासून मदत करते आणि तीच गोष्ट आहे ‘हिजाब'. जो तुम्हाला या सगळ्या गुंतगुंतीच्या प्रसंगातून रोखणारा प्राथमिक उपाय आहे आणि खूप परिणामकारक देखील.
मुद्दा १- हिजाबची गरज :
अगदी सामान्यातल्या सामान्य माणूसदेखील हे कबूल करतो की स्त्री-सुरक्षा महत्त्वाची आहे, पुरुष-सुरक्षा पाहिजे असे कोणी म्हटले आहे का आजपर्यंत? कारण सरळ आहे, आपल्या डोळ्यांना दिसणारे आहे पण आपण ते मान्य करत नाही. निसर्गाने स्त्रीला नखशिखांत सुंदर बनवले आहे. एक स्त्री व एक पुरुष दोघे रस्त्याने चाललेले असताना कुणाकडे नजरा जातात याचा सर्वांनी विचार करा. त्यातच पुरुष वरपासून खालीपर्यंत पूर्ण झाकलेला असतो. बंद गळ्याचा कोट, पूर्ण बाह्या, खाली पायापर्यंत लांब पँट हा त्याचा आधुनिक पोशाख. आणि स्त्रीचा आधुनिक पोशाख अगदी याविरुद्ध- म्हणजे कमीतकमी पोशाख, घट्ट व जितके जास्त अंग दिसू शकेल असा. अशा वेळेला ही स्त्री वासनेची बळी ठरू शकते. दुसरी बाब अशी की स्त्री-पुरुष परस्पराकर्षण हे स्वाभाविक आहे, पण दोघांच्या आकर्षणात फरक आहे. पुरुषांचे आकर्षण हे अग्रेसरपणाकडे असते, म्हणजे जे आवडत आहे ते एनकेण प्रकारे प्राप्त करण्यासाठी तो अग्रेसर असतो आणि नैसर्गिकरित्या स्त्रीपेक्षा ताकतवर असल्याने तो आपल्या या विचारात यशस्वी ठरुही शकतो. म्हणूनच स्त्रीवर बलात्कार होतो. पण पुरुषावर बलात्कार झालेला आजपर्यंत आपण कधी ऐकले आहे का? आणि निसर्गनियमाने ते शक्यच नाही. म्हणूनच स्त्री-सुरक्षेसाठी इस्लामने हिजाब हा सुरक्षाप्रणालीचा एक महत्त्वाचा आणि प्राथमिक उपाय सांगितला आहे. जो या स्त्रियांना त्यांच्या सुरक्षेबाबत खूप भरवशाची हमी देतो. त्यांची अस्मिता जपतो.
मुद्दा २- हिजाबचे निकष :
१. पूर्ण शरीर झाकले गेलेले असावे. (मनगटापुढील दोन्ही हाताचा भाग व दोन्ही डोळ्यांव्यतिरिक्त) काही इस्लामी अभ्यासाकांनी चेहरा व मनगटापासून पुढे हात, हे उघडे ठेवण्यासही योग्य म्हटलेले आहे.
२. हिजाब खूप आकर्षक नसावा, झगमगित नसावा की जेणेकरून पुरुष त्याद्वारेही आकर्षित व्हावा.
३. हिजाब हा पारदर्शक कपड्यांचा नसावा जेणेकरून आतील अंग दिसून यावे.
४. शरीराशी एकदम घट्ट नसावा ज्याद्वारे शरीराच्या अवयवांचा आकार जाहीर व्हावा.
५. स्त्रीने पुरुषाचे व पुरुषाने स्त्रीचे कपडे घालू नयेत.
६. तुमचा पोशाख दुसर्या धर्माला चिन्हाकित करणारा नसावा.
मुद्दा ३- हिजाबचे निकष फक्त स्त्रियांसाठीच आहेत का?
नाही... एक आदर्श नैतिक समाजाचा पाया भक्कम होण्यासाठी इस्लाममध्ये स्त्री व पुरुष या दोघांनाही खूप बारकाईने मर्यादा घालून दिलेल्या आहेत.
नजरेची सुरक्षा - कोणतेही कुकर्म, मग ते छेडछाड, शोषण, बलात्कार इ. सुरू होण्याचा पहिला टप्पा नजरेपासून सुरू होतो. म्हणूनच याला इथेच रोखण्यासाठी कुरआनमध्ये पुरुष व स्त्री दोघांनाही नजरेचा बचाव करण्यास सांगितले आहे आणि त्यानंतर वेशभूषेचे नियम सांगितले आहेत.
एकमेकांना अनावश्यक पाहणे, रोखून पाहणे हे टाळण्यासाठी कुरआनमध्ये प्रथम पुरुषाला व मग स्त्रीला आदेश दिला आहे की तुमच्या नजरा खाली ठेवा.
(कुरआन २४:३०,३१- हे पैगंबर, श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या नजरेची जपणूक करावी व आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या नजरेची जपणूक करावी व आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे व आपला साजशृंगार प्रकट करू नये.)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एखाद्या स्त्रीला अनावश्यक पाहत राहणे हा एक प्रकारचा बलात्कारच आहे.
पुरुषांसाठी हिजाब हा बेंबीपासून ते गुडघ्यापर्यंत आहे, तसेच वर स्त्रीच्या हिजाबचे जे निकष सांगितलेले आहेत त्यापैकी (२,३,४,५) हे निकष पुरुषांसाठीसुद्धा समान आहेत.
मुद्दा ४- हिजाबमुळे स्त्री-स्वातंत्र्यावर गदा येते का?
अजिबात नाही. कारण हिजाबमुळे फक्त वरून आपले जाहीर होणारे शरीर झाकले जाते... अक्कल, समज, मेंदू, आकलनशक्ती, प्रतिभा, अंतर्भूत गुण या गोष्टी झाकल्या जात नाहीत. उलट हिजाब परिधान केल्याने बाहेर वावरताना स्त्रीला सुरक्षित वाटते. वाईट नजरांपासून तिचा सुटकारा होतो. तसेच हिजाब परिधान केलेल्या स्त्रीचा पुरुष स्वतःहूनच आदर देतात हे निदर्शनास आले आहे. तिचा आत्मविश्वास वाढतो.
आजकाल हिजाब घालून मुस्लिम स्त्रिया सर्रासपणे दुचाकी चारचाकी चालवताना दिसतात. एवढेच नव्हे तर हिजाबी स्त्रिया पायलट होऊन विमानदेखील चालवतानाची उदाहरणे आहेत. त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, नोकरीत मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत, डॉक्टर इंजिनियरसुद्धा आहेत, सामाजिक सेवेत व शासकीय पदावर आहेत. त्यामुळे हिजाब स्त्री-स्वातंत्र्यावर गदा आणते, हे विधान चुकीचे आहे. हिजाबमुळे स्त्रीला समाजात मोकळेपणाने वावरताना कोणत्याही प्रकारची बाधा नाही, बाधा आहे ती संकुचित मनोवृत्तीची जी हिजाबला आपला अडसर मानते.
मुद्दा ५- हिजाब अनिवार्य आहे का?
(कुरआन ३३:५९... हे नबी (स.) आपल्या पत्नी, मुली व श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की आपल्यावरून चादरीचे पदर ओढून घ्या. ही अधिक योग्य पद्धत आहे. जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात व त्रास दिला जाऊ नये.)
हो... या कुरआनातील श्लोकात सांगितल्याप्रमाणे स्त्रीच्या भल्यासाठी, तिच्या शीलरक्षणासाठी, हिजाबचा स्पष्ट आदेश आहे.'हिजाब' का आवश्यक आहे? पण स्त्रीने तो परिधान करावा की नाही हा तिचा ऐच्छिक विषय आहे.
उदा : जसे दारू पिणे हे कुरआनमध्ये पाप सांगितले गेले आहे, तरीही पिणारे पितात व स्वतःचे नुकसान करून घेतात. मग त्यांच्यासाठी ते ऐच्छिक झाले. तसेच हिजाबचेही आहे. हिजाब परिधान करणार्या महिला सुरक्षित होतात व न परिधान करणार्या असुरक्षित होतात.
अल्लाहचा हा आदेश असो वा इतर आदेश, ते न पाळण्यारांचा न्याय मृत्युपश्चात पारलौकिक जीवनातच होणार आहे.
मुद्दा ६-हिजाबचे फायदे :
१. स्त्री-सुरक्षा : अंगप्रदर्शनामुळे स्त्री वाईट वृत्तींना बळी पडू शकते. आधुनिकतेचे कितीही वेष्टन गुंडाळले तरी नग्नता ही नग्नताच असते. भुकेल्या वासनांच्या आहारी जाण्यापासून हिजाब स्त्रीचे रक्षण करतो.
२. आत्मविश्वास वाढतो : हिजाब परिधान केल्याने स्त्री समाजात मोकळेपणाने वावरू शकते. वसवसलेल्या नजरांपासून तिची सुटका होते, तिला दडपण येत नाही. म्हणजे ड्रेसचा खोल गळा सावरताना किंवा साडीत उघडे पडलेले पोट झाकण्याची धडपड, घट्ट पोशाख व त्यामुळे येणारे लाजिरवाणे प्रसंग, हे सगळे टाळले जाऊ शकते. स्त्री स्वतःला सुरक्षित समजते. कारण आता तिला कोणाचे भय नसल्याने तिचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे शांतचित्ताने ती तिच्या कामात पूर्ण लक्ष देऊन यशस्वी होऊ शकते.
३. समाजाचा नैतिक दर्जा सुधारतो : हे सगळेच मान्य करतात की समाजाचा नैतिक दर्जा आज पूर्णपणे ढासळला आहे. लज्जेचा पडदा आपोआपच दूर सारला गेला आहे. टीव्ही मोबाईलसारख्या माध्यमांमधून स्त्री-देहाचे उघडे प्रदर्शन सुरू आहे. अशात भुकेल्या पुरुषांची भूक आणखी चाळवली जाते. मग अगदी पाच वर्षांच्या मुलीपासून मोठ्या महिलेपर्यंत कोणीच सुरक्षित राहत नाही. केवळ आणि केवळ पुरुषालाच यासाठी सर्वस्वी जबाबदार धरणे कितपत योग्य आहे? अगदी पुरुषाच्या बनियनची जाहिरात असली तरी त्यासाठी उघडीनागडी स्त्री का लागते? विचार करणे गरजेचे आहे. अशात ‘तुमची नैतिक मूल्ये सांभाळा' केवळ असे म्हणून चालणार नाही. कारण हे आकर्षण नैसर्गिक आहे. तर अशा परिस्थितीत हिजाबमुळे स्त्री स्वतःही नीतिमंत राहते, सुरक्षित राहते व पुरुषांनाही वासनेच्या आहारी जाण्यापासून रोखते, पुरुषांना पण नीतिमंत राहण्यास मदत करते. एकंदरीतच काय तर समाजाचा नैतिक स्तर हा सुधारतो, उंचावतो.
४. आदर व सन्मान मिळतो : हिजाब धारण केलेल्या महिलांकडे पुरुष नेहमी सन्मानाने पाहतात. त्यांना छेडछाड व त्रास दिला जात नाही. महिलांचा आदर करण्याची भावना पुरुषांच्या मनात आपसूकच येते कारण ती झाकलेली असते.
५. स्त्री-स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो : ज्याप्रमाणे स्त्रीला शरीर प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे तिला शरीर झाकण्याचेही तितकेच स्वातंत्र्य आहे. संविधानांच्या अनुच्छेद २५-२८ प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्याचा मौलिक अधिकार प्रदान केला गेलेला आहे. त्यामुळे हिजाब परिधान करणे हा या मौलिक अधिकाराचा उपयोग आहे.
मुद्दा ७- हिजाब फक्त इस्लाम धर्मामध्येच आहे का?
हिजाबला कट्टरपंथी विचारांशी उगीचच जोडले गेले आहे. हिजाब हा मुस्लिम स्त्रीवर अत्याचार समजला जातो. जर खरंच हा अत्याचार असेल तर हा आदेश दुसर्या धर्मात कसा बरा सापडेल? इसाई व यहुदी धर्मातसुद्धा हिजाबचा आदेश आहे. हे ते लोकही मान्य करतात पण पालन करीत नाहीत. चारित्र्यनिर्माण, लज्जारक्षण व धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून हिजाबकडे पाहिले जाते.
हजरत मरियम यांची प्रतिमा पाहा- त्या नेहमी डोक्यावरून हिजाब ओढलेल्याच दिसतात, जे मरियमचे माहात्म्य दर्शवते. चर्चमधील नन्सचा पोशाखही हिजाबसारख्या वस्त्राने आणि आपले डोके व शरीर झाकलेला आढळून येतो. यहुदी धर्मातदेखील विवाहित महिला आपल्या केसांना झाकून ठेवत असत. आजदेखील ही प्रथा कितीतरी धार्मिक यहुदी महिला पाळताना दिसतात.
शीख महिला आजही प्रामुख्याने त्यांचे डोके दुपट्ट्याने झाकलेल्या आढळून येतात. हिंदू धर्मातही ज्या राण्या, महाराण्या, महान महिला होऊन गेल्या, त्यांच्या प्रतिमाही आपल्याला डोक्यावर पदर घेतलेल्या आढळतात. अगदी अलीकडच्या काळातील सांगायचे झाले, तर राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या पण प्रतिमेत त्या डोक्यावरून पदर घेतलेल्या आढळतात. त्यामुळे कुठेही स्त्री-प्रतिभा उजागर करण्यात हिजाब हा अडसर ठरत नाही हे यावरून कळून येते.
मुद्दा ८- हिजाबच्या विरोधाचे कारण :
वरील सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आपणास कळते की हिजाब हा स्त्री-सुरक्षा वाढवतो. समाजातील वाईट नजरांना प्रोत्साहन नाकारतो. त्यांच्या वासनांना आळा घालतो. खरे पाहिले तर हिजाब हा सर्व धर्मियांच्या शिकवणीला व आदर्शला धरूनच आहे. पण हिजाब आपल्याला का टोचतो? तर तो हिजाबचा द्वेष नसून तो मुसलमानांचा द्वेष आहे. ते वापरतात म्हणून हिजाब वाईट, अन्यायकारक ही विचारसरणी आहे. आजकाल केवळ शहरात नव्हे तर गावातील महिलादेखील सर्रास चेहर्यांवर स्कार्फ बांधून गाडी चालवताना, वावरताना दिसतात. कारण काहीही असो पण ते आपणास चुकीचे वाटत नाही, मात्र हिजाबच चुकीचा वाटतो. खरं तर हिजाब हा नैतिकदृष्ट्या ढासळत चाललेल्या समाजाची निकड आहे. त्यामुळे हिजाबचा विरोध म्हणजे वेडेपणा आणि त्याचा स्वीकार म्हणजे शहाणपणाची गोष्ट आहे. कारण यामध्येच स्त्रीचे आणि पूर्ण मानवजातीचे भले आहे.
- मिनाज शेख
पुणे
Post a Comment