(९३) जर अल्लाहचा हेतू असा असता (की तुमच्यात कोणतेही मतभेद होऊ नयेत) तर त्याने तुम्हा सर्वांना एकच समूह बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्टतेत टाकतो व ज्याला इच्छितो त्याला सद्बुद्धी देतो आणि निश्चितच तुमच्याकडे तुमच्या कृत्यासंबंधी विचारणा झाल्याशिवाय राहणार नाही.
(९४) (आणि हे मुस्लिमांनो!) तुम्ही आपल्या शपथांना आपापसात एक दुसर्याला फसविण्याचे साधन बनवू नका. एखादे वेळी असे होऊ नये की एखादा पाया भक्कम झाल्यानंतर तो घसरावा आणि या अपराधापायी की तुम्ही लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखले, दुष्परिणाम पाहावा व कठोर शिक्षा भोगावी.२७
(९५) अल्लाहच्या कराराला अल्पशा लाभासाठी विकू नका, जे काही अल्लाहपाशी आहे ते तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल,
(९६) जे काही तुमच्यापाशी आहे ते खर्च होऊन जाणार आहे व जे काही अल्लाहजवळ आहे तेच उरणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणार्यांना त्यांचे मोबदले त्यांच्या उत्तम कर्मानुसार देऊ.
२७) म्हणजे असे होता कामा नये की एखाद्या माणसाला इस्लामची सत्यता पटल्यानंतर तुमची अनैतिकता पाहून त्याला या धर्माचा वीट यावा आणि या समूहाच्या ज्या ज्या लोकांशी त्याची गाठ पडली ते चारित्र्यात व व्यवहारात त्याला काफिरांपेक्षा वेगळे आढळले नसावेत, या कारणाने तो ईमानधारकांच्या समूहात सामील होण्यापासून दूर राहील.
Post a Comment