न्यायाच्या तेजस्वी घटना
एका व्यक्तीने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे एक पिशवी अनामत म्हणून ठेवली होती. ती पिशवी दिनारांनी (सोन्याची नाणी) भरलेली असल्याचे सांगितले. बरीच वर्षे लोटली तरी ती व्यक्ती आपली पिशवी न्यायला परत आली नाही. विश्वस्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने एक युक्ती खेळली. पिशवीच्या तळातून काळजीपूर्वक दोरा उस्वला आणि सर्व दिनार बाहेर काढले. त्याऐवजी पिशवीत दिरहम (चांदीची नाणी) टाकली. मग पूर्वीप्रमाणेच पिशवी शिवून ठेवून दिली.
हा अनामतदर सुमारे पंधरा वर्षांनंतर या उच्च अधिकाऱ्याकडे आला आणि त्याने अनामत म्हणून ठेवलेली दिनारांनी भरलेली पिशवी परत मागितली. अधिकाऱ्याने ती पिशिवी अनामतदाराला परत केली. अनामतदाराने पिशवी आपलीच असल्याची खातरजमा केली आणि पिशवी उघडली. तेव्हा त्यात दिनारांऐवजी दिरहम होते. हे पाहून तो संतापला आणि म्हणाला, ही पिशवी माझी नाही. माझ्या पिशवीत दिरहम नसून दिनार होते. मला माझी दिनारांची पिशवी हवी आहे.
अधिकारी म्हणाला, ‘अरे! काळजीपूर्वक बघ. ही पिशवी तीच आहे, जी तू माझ्याकडे ठेवली होती, आजपर्यंत ती बंदच आहे. मी तुला फसवले नाही.’ अनामातदार म्हणाला, माझ्या पिशवीत दिनार होते. ही पिशवी जरी माझी असली तरी त्यात दिनार नाहीत, दिरहम आहेत.’ आपसात खूप वादविवाद झाला. प्रकरण मिटले नाही, तेव्हा अनामातदार, तत्कालीन अमीर, उमर बिन हुबेराह यांच्याकडे गेला आणि आपली तक्रार दाखल केली. उमर बिन हुबेराहने काझी इयास बिन मुआवियाकडे हे प्रकरण पाठवले.
काझी इयास यांनी अनामातदाराला आपली बाजू मांडायला सांगितले. अनामतदार म्हणाला,’मी अनामत म्हणून या अधिकाऱ्याकडे दिनारांनी भरलेली पिशवी ठेवली होती, पण तो मला दिरहमने भरलेली पिशवी देत आहे.’ काझी इयास यांनी विचारले, ‘किती वर्षांपूर्वी ही पिशवी अनामत म्हणून ठेवली होती? अनामातदार उत्तरला,’पंधरा वर्षांपूर्वी.’
आता न्यायाधीश अधिकाऱ्याकडे वळले आणि विचारले,’तुम्ही काय म्हणता?’ अधिकारी म्हणाला, ‘त्याची पिशवी गेली पंधरा वर्षे आहे त्याच अवस्थेत माझ्याकडे सुरक्षित ठेवलेली आहे. ही पिशवी त्याचीच आहे.’
काझी इयास यांनी नोकरांना पिशवी उघडण्याचा आदेश दिला. नोकरांनी आदेशाचे पालन केले आणि पिशवीतील संपूर्ण दिरहम विखुरले. विखुरलेल्या दिरहमांमध्ये काही दहा वर्षे जुनी नाणी आणि काही पाच वर्षांची नाणी होती आणि काही नाणी त्यापूर्वीची आणि नंतरची नाणी होती.
काझी इयास अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले,’तुम्ही कबूल केले आहे की, ही पिशवी तुमच्याकडे पंधरा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. याचा अर्थ या पिशवीमधील सर्वच नाणी 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी असायला हवी होती, परंतु पिशवीत पाच वर्षांपूर्वीचीही नाणी आहेत. म्हणजे या पंधरा वर्षांच्या काळात कधीतरी ही पिशवी उघडली गेली असावी आणि त्या वेळी दिनारांचे रूपांतर दिरहममध्ये झाले.’
काझी इयासच्या युक्तिवादाने गुन्हेगाराला आपला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. शेवटी अधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली. अशा प्रकारे अधिकाऱ्याचा गुन्हा उघडकीस आला. त्याचे पितळ उघडे पडले.
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित,
‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 165)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment