कुरआनी फळ - अंजीर
फळ येणे हा सपुष्प आवृत्तबिजी वनस्पतींचा मूळ गुणधर्म आहे. पुष्पावस्थेतील स्त्रीकेसराचा खालचा भाग फलित क्रियेनतर फळांमध्ये रूपांतरित होतो आणि या अंडाशयापासून तयार झालेल्या फळाला खरे फळ (true fruit) म्हणतात. अंडाशयाव्यतिरिक्त पुष्पासन, फुलाचा इतर भाग किंवा फुलांच्या गुच्छापासून तयार झालेल्या फळांना वैज्ञानिक भाषेत आभासी फळ (false fruit) म्हणतात. स्ट्रॉबेरी, तुती, अंजीर हे फुलांच्या गुच्छापासून तयार झालेल्या आभासी फळांची काही उदाहरणे आहेत.
उंबर किंवा अंजीर हा सूक्ष्म फुलांचा गुच्छ असतो ज्याला वनस्पतीशास्त्रात हायपॅन्थोडियम (Hypanthodium) म्हणतात.
इतर फुलांप्रमाणेच पुंकेसर आणि स्त्रीकेसर असणारी फुले यामध्ये विशिष्ट प्रकारे रचलेली असतात जेणेकरून किटकांद्वारे परागीभवन पण होऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे उंबर व अंजीर ही फळे सपुष्प आवृत्तबिजी गटात मोडतात, परंतु यामधील फुले लहान असुन ते एका विशिष्ट आवरणात आतिल बाजूला असतात जी बाहेरून दिसत नाहीत, जणू काही यांना फुलेच येत नाहीत. म्हणूनच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला 'उंबराच्या फुलाची' उपमा देतात. हेच हायपॅन्थोडियम परिपक्व होऊन फळांचा आकार घेते ज्याला आपण आभासी फळ म्हणतो. पिंपळ, वड, रबर, उंबर, अंजीर हे पिंपळकुळातील सर्वच फळे आभासी फळे आहेत. या सर्वांमध्ये अंजीर फार उपयोगी आणि पारंपरिक पिकवले जाणारे फळपीक आहे.
अंजीर या फळाच्या वेगळेपणाबरोबरच यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत. अंजीराच्या सेवनाने मधुमेह, सर्दी, पडसे, दमा आणि अपचनासारख्या अनेक व्याधींवर लाभ होतो. worldatlas.com अनुसार अंजीर हे मुळचे दक्षिण अरबस्तानातील फळ आहे. जेथे याची लागवड केली जाते. या बहुगुणी फळाचे महत्त्व अधिक वाढते जेव्हा अल्लाहने कुरआनमध्ये अत्-तीन म्हणजे अंजीर या नावाने एक अध्याय अवतरीत केला आणि त्याची शपथ घेतली.
"शपथ आहे अंजीर व जैतुनची,..." (९५:१)
या आयतीविषयी तय्-सीरुल कुरआन या ग्रंथात मौलाना अब्दुर्रहमान कीलानी यांनी केलेल्या भाष्याचा आशय असा घेतला जाऊ शकतो. मुळ अरबी शब्द अत्-तीन म्हणजे अंजिराचे झाड किंवा त्याचे फळ किंवा फक्त अंजीराचे बी. उत्तम चव असलेले हे एक प्रसिद्ध फळ आहे, जे भरपूर पौष्टिकतेने भरलेले आहे आणि अनेक रोगांवर उपचारही करते. ढोबळपणे बघीतले तर असे वाटते की अंजीर या फळाचीच ही शपथ आहे पण या आयतीत अंजीर किंवा त्याचे झाड आणि जैतुनाच्या झाडाची शपथ घेतलेली नाही, तर ज्या भूमीत ही झाडे विपुल प्रमाणात वाढतात त्या भुमीची शपथ घेतली आहे. ते क्षेत्र सीरिया आणि पॅलेस्टाईनचे क्षेत्र आहे.
ज्याप्रमाणे अरबांचा नियम आहे की, एखाद्या गोष्टीचा मुख्य भाग म्हटल्यावर ते मूळ वस्तूचा अर्थ घेतात. त्याचप्रमाणे, त्यांच्यामध्ये एक नियम हाही आहे की एखाद्या प्रदेशाच्या प्रसिद्ध उत्पादनाचे नाव घेतल्याने ते त्या प्रदेशाचा अर्थ काढतात. जसे, महाराष्ट्रात जळगाव केळींसाठी आणि नासिक द्राक्षांसाठी ओळखले जाते. या अध्यायाच्या पुढील दोन आयतींनीदेखील हे स्पष्ट होते, म्हणजे सिनाई पर्वत आणि मक्का शहर ही सर्व ठिकाणे पैगंबरांची जन्मभूमी आणि निवासस्थाने आहेत.
यावरून हे लक्षात येते की अरबांना अंजीर आणि अंजीर उगवणारे ठिकाण किती प्रिय होते आणि एखाद्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेताना किंवा त्याच्या सत्यतेवर साक्ष देताना त्याची शपथ घेतली जाते.
(क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment