डॉ.अदनान : युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राची ’जुवा हटाव देश बचाव’ मोहिम
नागपूर (शोधन प्रतिनिधी)
‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र’ (वायएमएम) ही संस्था समाजोपयोगी काम करण्यासाठी सदैव तत्पर असते. युवकांचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रासाठी उत्तम नागरिक घडविणे हा या संघटनेचा उद्देश आहे. हा उद्देश समोर ठेवत युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राने ’जुवा हटाव देश बचाव’ ही मोहिम सुरू केली आहे. नागपूर येथे सिव्हिल लाइन्सच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत शहराध्यक्ष डॉ. अदनानुल हक म्हणाले की, समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक तरुण आहे. देशातील युवक योग्य मार्गावर राहिला तरच देश विकासाच्या मार्गावर पुढे जाईल. तरुण पिढी दिशाहीन झाली तर देश विनाशाच्या मार्गावर जाईल. युवकांना वाममार्ग व जुगारातून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक आणि युवकांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभणे गरजेचे असे अदनान म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आजच्या काळात ऑनलाइन जुगार व खेळामुळे तरुणाई दिशाहीन झाली आहे. आपल्या भारत देशात ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 40% तरुण रम्मी सर्कल, रम्मी ए टू थ्री, ड्रीम इलेव्हन, पबजी, लोडू इत्यादी ऑनलाइन जुगार खेळतात. महाराष्ट्रात ही टक्केवारी 50% आहे. 18 ते 30 वयोगटातील बहुतांश तरुण ऑनलाइन जुगारात गुंतलेले आहेत. दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 18-30 वर्षे वयोगटातील 70% तरुण ऑनलाइन जुगार खेळण्याच्या सवयीमध्ये गुंतलेले आहेत. ऑनलाइन जुगारामुळे युवक आपल्या मौल्यवान वेळेसोबत मानसिक आणि आर्थिक नुकसान करून घेत आहेत. त्यामुळे आपल्या देशात मानसिक सामाजिक आणि आर्थिक समस्या वाढत आहेत. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाच्या मानसिक समस्या वाढत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स न्यूरोसिस (छखचक-छड) च्या संशोधनाचा हवाला देत डॉ. अदनान म्हणाले की, या संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांत आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जास्त असते. ऑनलाइन जुगारामुळे फक्त काही खेळाडूंना फायदा होतो आणि अनेकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कर्जबाजारी होऊन लोक आत्महत्या करतात. उदाहरणार्थ, बंगळुरूमधील एक लहान व्यावसायिक दर्शन बाळूने क्रिकेट सट्टेबाजी पवर 1.5 कोटी रुपये गमावले, त्यानंतर त्याची पत्नी रंजिता व्ही ने 26 मार्च 2024 रोजी आत्महत्या केली. ऑनलाइन जुगारामुळे निद्रानाशाची समस्याही सुरू होते आणि नैतिक ऱ्हासामुळे जुगारी कुटुंब व समाजापासून दुरावत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन जुगारात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे.
आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाइन गेम आणि जुगाराच्या विरोधात आणि ते रोखण्यासाठी ‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राने’ 7 जून ते 14 जून 2004 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे. ऑनलाईन जुगार हटवा, देशाच्या तरुणांना वाचवा या नावाने हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानाखाली सर्व प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जात आहे. बॅनर्स, ऑटो बॅनर, स्टिकर्स, हँड बिल हे देखील या मोहिमेचा भाग आहेत. अभियान, पथनाट्य आणि कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाइन जुगारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये जनजागृती झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाकडून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण तामिळनाडू, आसाम, तेलंगणा आदींसह भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याचा प्रयत्न करू.
पत्रपरिषदेत युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचे शहराध्यक्ष डॉ. अदनान यांनी युवकांना आवाहन केले आहे की, या मोहिमेत आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या समाजातून ऑनलाईन जुगाराचे उच्चाटन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. या पत्रकार परिषदेला ‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र’चे शहर सचिव अब्दुल मतीन, नागपूर पश्चिम अध्यक्ष असीम गाझी उपस्थित होते.
Post a Comment