इतिहासाचे चक्र फिरवण्यासाठी नेहमी एकट्या व्यक्तीचे साहस, दूरदृष्टी, गरज भासल्यास स्वतःच्या बलिदानाची गरज असते. जर अशी कोणती व्यक्ती उभी राहते तेव्हा त्याचे साहस पाहून बाकीचे सारे समूह, लोक त्याची साथ द्यायला तयार होतात आणि म्हणून क्रांती घडून येते. आपल्या देशातदेखील इंग्रजांचे राज्य असताना एका व्यक्तीने आपले साहस आणि धैर्य दाखवून जगभर राज्य गाजविणाऱ्या साम्राज्यापुढे आव्हान उभे केले. बाकीच्या कोट्यवधी जनतेने त्याची साथ दिली आणि देशाच्या पदरात स्वातंत्र्य पाडून घेतले. आधुनिक काळात हे साहस राहुल गांधी यांनी दाखवले जेव्हा सारा देश, नागरिक हतबल अवस्थेत होते. अशा वेळी त्यांना देशभरातली नागरिकांत जनसंपर्काची मोहीम हाती घेतली. भारत जोडो, न्याय यात्रा काढली. त्यांच्या या यात्रेचे उद्दिष्ट वरवर काही असले तरी देशात राजकीय परिवर्तनाची गरज त्यांनी ओळखली होती. आणि जसे महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच राहुल गांधी यांनी नागरिकांचे / राजकारण्यांचे हिरावलेले, बळकावलेले अधिकार पुन्हा परत मिळवण्यास मदत केली. भाजपच्या तावडीतून भारताच्या लोकशाहीला, इथल्या लोकशाही संस्थांना, न्यायव्यवस्थेवरील दडपणांना पुनश्च मुक्त करून घेतले.
सामान्य जनतेसमोर संविधानात बदल करण्याची जी भीती काही राजकीय नेत्यांनी घातली होती, जरी भाजपने अधिकृतपणे तसे काही म्हटले नव्हते तरी अशा अफवांची त्यांनी वेळीच दखल घेतली नव्हती. याचा अर्थ त्या सर्वांनाच कळू शकते. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा देऊन तर भाजपने खरे तर संविधान बदलण्याची घोषणा करणाऱ्यांचीच एक प्रकारे साथ दिली. आज ते कितीही नाकारत असले तरी त्यात काही अर्थ नाही. दुसरी घोषणा म्हणजे ‘एक राष्ट्र एक नेता’ची संकल्पनाही मांडण्यात आली जी भारतासारख्या विविधतापूर्ण राष्ट्र, संस्कृती, सभ्यता, भाषा असणाऱ्या देशाशी सुसंगत नाही. याचा विपरीत परिणाम बहुसांस्कृतिक, बहुभाषिक भारतीय समूहांच्या मानसिकतेवर झाला. आणि या सर्व गोष्टींमुळे भारतीय नागरिक असहाय झाले होते. लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे त्यामागची जी अनेकविध कारणे आहेत त्यामध्ये वरउल्लेखित कारणे फार महत्त्वाची आहेत.
काँग्रेसविषयी सांगायचे झाल्यास निवडणुकाचा हा निकाल त्याच्यासाठी नवसंजीवनीसारखा आहे. राहुल गांधी यांनी जरी पक्षासाठी यात्रा काढली नसली तरी याचा पूरेपूर फायदा काँग्रेस पक्षालाच झालेला आहे. यापुढे काँग्रेसने नव्याने मिळालेल्या राजकीय संजीवनीचा पक्षासाठी उपयोग करून घेतला तरच हा पक्ष अजून काही काळ टिकू शकेल. यासाठी खरेच काँग्रेसला घराणेशाहीच्या बाहेर पडावे लागेल. पत्रकारपरिषदेच्या वेळी संबोधन करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी प्रियंका आणि सोनिया यांची नावे टाळली असती तर पक्षाच्या दृष्टीने बरे झाले असते. असो.
शासकीय संस्था गुडघे टेकत होत्या. प्रसारमाध्यमे तर निद्रावस्थेत होती. त्यांना आपल्या भवतीचे वास्तविक जग अस्तित्वात आहे, कोट्यवधी मानवता आहेत त्या मानवतेचे लक्षावधी समस्या आहेत, त्या सर्व गोष्टी दिसत नव्हत्या नव्हे त्यांच्याकडे डोळेझाक करून बसले होते, कारण त्यांना त्याच कामासाठी ठेवले होते. गोरगरीब, लाचार, निराधार, उपजीविकेपासून वंचित कोट्यवधी लोक हे सर्व पाहत होते. ते तयारीत होते की कुणीतरी त्यांना साद घालावी. अशात एक माणूस थेट त्यांच्या दारी पोहोचतो. हजारो मैलांचा पायी प्रवास करतो. त्यांच्या समस्या जाणून घेतो, त्यांना धीर देतो, त्यांना हाक देतो. ते सर्व मिळून परिस्थितीत बदल करण्याचे काम हाती घेतात जे एक तथ्य आहे की जगभर जितक्या क्रांत्या झाल्या, जितकी आव्हाने उभी केली गेली त्यांना प्रत्युत्तर दिले ते सर्व गोरगरीब, उपाशी लोकांनीच. श्रीमंत आपल्या महालात बसून राहतात, कारण कोणतीही व्यवस्था असो, ती त्यांच्यासाठीच असते. ह्या गोरगरीब लोकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी लागते. आणि म्हणून जगभर कुठे ना कुठे क्रांती होत राहते, पण त्यासाठी एका व्यक्तीला उभे राहावे लागते, तेव्हा लोक आणि संस्था साथ देतात. कोणत्या संस्थेने जगात कधी क्रांती केली नाही. एका माणसाने उभे राहावे लागते आणि मग संस्था-संघटनांनी त्याला बळ पुरवावे लागते तेव्हा क्रांती घडून येते. राहुल गांधी यांनी जे केले ती संपूर्ण क्रांती नसली तरी त्याची सुरुवात आहे. त्यांना ह्या देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती बदलावी लागणार आहे. राजकीय पक्ष कितीही असू शकतात, त्यांची विचारधारा भिन्न असू शकते, असावीच लागते. यात त्यांना समानता प्रस्थापित करावी लागेल. हे कार्य क्रांतीपेक्षा आव्हानात्मक आहे.
भारत खरेच एक शांतताप्रिय देश आहे. हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीचे, भाषांचे लोकसमूह एकत्र राहत आले आहेत. कधी काही अप्रिय घटना घडत असतील. मानवी समाजाचा अभिन्न घटक असतात त्याचा विचार करावा लागतो. भारताने स्वातंत्र्यदेखील अहिंसेच्या मार्गाने प्राप्त केले, तसेच परिवर्तन सुद्धा अहिंसेच्या मार्गाने केले आहे. हेच या राष्ट्राचे वैशिष्ट्य आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment