न्यायाच्या तेजस्वी घटना
काझी (न्यायमूर्ती) अय्यास बिन मुआविया यांच्या बुद्धिमत्तेची आणि चाणाक्षतेची सर्वत्र चर्चा होती. दरबारात बसून ते असे आश्चर्यकारक निर्णय देत असत की लोक चकित व्हायचे. त्यांच्या निर्णयांबाबत इतिहासात अनेक घटनांची नोंद आहे.
थोर, ज्ञानी, महान लोकांचे जसे अनेक प्रशंसक आणि आदर करणारे असतात, तसेच त्यांची निंदा करणारे, त्यांना पाण्यात पाहणारे आणि त्यांच्याविषयी ईर्षा बाळगणाऱ्यांची संख्याही मोठी असते. काझी अय्यास यांच्या बाबतीतही तेच घडत होते. त्यांच्याविषयी काही लोकांच्या मनात मत्सर होता. ईर्षेने पेटून उठलेले हे लोक काझी अय्यास यांच्या जीवनात काही दोष सापडतो का? ते एखादी चूक करतात का? यावरच नजर ठेवून असायचे.
काझी अय्यास यांचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे कलंकित होऊ शकेल, यासाठी खूप खूप धडपड केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, काझी इयास निर्णय घेण्यात खूप घाई करतात. तसे पाहिले तर खरोखरच हा एक मोठा दोष आहे. जो काझींच्या गौरवाच्या विरुद्ध आहे. निर्णय घेण्यापूर्वी आणि नंतर निर्णय देण्याआधी गांभीर्याने आणि विवेकबुद्धीने काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
ईर्षेने पेटून उठलेल्या लोकांनी त्यांच्यालबद्दल ही अफवा पसरवायला सुरुवात केली. हळूहळू लोकांमध्ये काझी साहेबांविषयी असंतोष वाढू लागला. ते घाईगडबडीत निर्णय घेणारा काझी म्हणून चर्चिले जाऊ लागले.
दुसरीकडे, काझी अय्यास बिन मुआविया यांनाही या चर्चेची माहिती मिळाली. त्यांनीही ईर्षा बाळगणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. काझी अय्यास यांनी नम्रपणे या लोकांना आपल्या संमेलनात आमंत्रित केले. त्यांनी त्यांचा चांगलाच आदरसन्मान केला. त्यांना चांगले खाऊ घातले. मग अनौपचारिक गप्पा रंगल्या.
गप्पांच्या भरात, काझी अय्यास यांनी अचानक हात वर केला आणि म्हणाले, “मित्रांनो! मला या बोटांबद्दल सांगा, या बोटांची संख्या किती आहे?”
सर्वांनी काझी अय्यास यांच्या हाताकडे बघून क्षणाचाही विचार न करता एका सुरात म्हणाले, “पाच आहेत, श्रीमान पाच!”
काझी अय्यास बिन मुआविया यांनी त्यांच्याकडे हसतमुख नजरेने पाहिले आणि म्हणाले, “साथीदरांनो! तुम्ही उत्तर द्यायला इतकी घाई का केली? तुम्ही एक, दोन, तीन, चार, पाच असे मोजले असते आणि थोडा वेळ थांबून विचार करून नंतर उत्तर दिले असते!”
ते लोक म्हणाले, “काझी साहेब! जी बाब आम्हाला सहज समजली, आमच्या लक्षात आली तिच्यासाठी थांबण्याची आणि विचार करण्याची गरज काय आहे!”
आता काझी अय्यास त्यांना अत्यंत समाधानाने आणि शांतपणे सांगू लागले, “जेव्हा माझ्याकडे न्यायासाठी प्रकरणे येतात, मी पक्षकारांचे म्हणणे ऐकतो आणि लगेच प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचतो. मग न्याय देण्यासाठी का थांबावे?”
काझी अय्यास यांनी या उदाहरणाद्वारे उत्तर दिले. अशा प्रकारे मत्सरांचा डाव फसला आणि त्यांना समजले की काझी अय्यास घाईगडबडीत न्याय देत नाहीत; उलट, ईश्वराने दिलेल्या बुद्धिमत्तेमुळे आणि क्षमतेमुळे ते पटकन प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचतात. विलंब न करता ते खटल्याचा निकाल सुनावतात. त्यांना काझी अय्यास यांच्या बुद्धिमत्तेची खात्री पटली. सभांमध्ये जे त्यांच्याविरुद्ध बोलत होते त्यांनी ते थांबवले.
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित,
‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 162)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment