Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग २०)

फळे व इतर उत्पादने देणारी खजूर


खजुराचे झाड, ज्याला वैज्ञानिक भाषेत Phoenix dactylifera म्हणतात, हे त्याच्या गोड फळांसाठी लागवड केलेल्या सर्वात जुन्या सपुष्प वनस्पतींपैकी एक आहे. हे फळपीक मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका (MENA) आणि दक्षिण आशिया प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. Bateel.com या वेबसाईटवरील एका अहवालानुसार खाण्यायोग्य खजुराची फळे आणि इतर खजूराच्या उत्पादनांनी या प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्न, निवारा आणि उपजीविकेत ५००० वर्षांपासून योगदान दिले आहे. तेथे फार पूर्वीपासून खजूर हे मुख्य अन्न राहिले आहे. कदाचित यामुळेच अन्न आणि कृषी संघटना (FAO) परिषदेने २०२७ हे 'खजूरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष' म्हणून घोषित करण्याच्या सौदी अरेबियाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे वर्ष प्रतिकूल हवामान परिस्थितीत खजुराची  शाश्वत लागवड आणि तिच्या उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पीक उपउत्पादनांसह कृषी प्रणाली विकसित करण्यासाठी व्यवसायाला सक्षम बनविण्यात योगदान देईल.

खजुराच्या झाडाचा उपयोग त्याची फळे, फायबर, घरांसाठी लागणारी सामग्री आणि इंधन यांसाठी होतो जे त्याचे अष्टपैलुत्व आणि मोठे महत्त्व दर्शवते. सुसज्ज लाकडी खोड आणि पाने छप्पर घालण्यासाठी साहित्य देतात. तसेच पानांचा वापर टोपल्या बनवण्यासाठी केला जातो. पानांचे तळ आणि फळांच्या देठांचा वापर इंधन आणि दोरी बनवण्यासाठी केला जातो. फायबरवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग पॅकिंग सामग्री म्हणून केला जातो. खजुराच्या भरडलेल्या बिया स्टॉक फीड म्हणून वापरल्या जातात. याचे कोवळे कोंब कोशिंबीर म्हणून खाल्ले जाऊ शकतात. जेव्हा खजुराचे झाड तोडले जाते, तेव्हा पाम हार्ट म्हणून भाजीसारखेदेखील खाल्ले जाते.

कुरआनमध्ये अध्याय 'कॉफ'च्या १० व्या आयतीमध्ये इतर फळबागांच्या उल्लेखानंतर या बहुगुणी खजुराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे,

"आणि उंच उंच खजुरीची झाडे निर्माण केली, ज्यांना फळांनी भरलेले घड थरावर थर लागतात."

मौलाना डॉ. मुहम्मद अस्लम सिद्दिकी यांनी आपल्या रूहुल्-कुरआन या ग्रंथात या आयतीचे भाष्य करताना खालील प्रमाणे नोंदी केल्या आहेत. ते म्हणतात,

मागील आयातीला संलग्नीत करून पुढील आयतीमध्ये म्हटले आहे की, आम्ही या बागांमध्ये उंच खजुरांची झाडे देखील तयार केली आहेत, ज्यावर फळांनी लटकलेले पुंजके म्हणजे घोसच्या घोस दिसतात. फळबागांचा उल्लेख केल्यानंतर वरवर पाहता खजुरांचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नव्हती. पण इथे उल्लेख करण्याची दोन कारणे सांगता येतील.  सर्वप्रथम, कोणत्याही बागेची गुणवत्ता आणि सौंदर्य त्या बागेच्या आजूबाजूला उंच खजुरांच्या किंवा ताडाच्या झाडांशिवाय शक्य नाही.  यासोबत दुसरे कारण म्हणजे हे अरबांचे खास फळ होते, जे त्यांच्या मेजवानीतही वापरले जात होते आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची गरज देखील पूर्ण करत होते. ते त्यांच्या प्रवासामध्ये खजूर आणि सत्तूपासून आपली भुक भागवत असत. पण खजुराच्या उल्लेखाबरोबरच त्या झाडाची मजबूत स्थायी संरचना आणि फळांच्या घोसांचा उल्लेख माणसाच्या सौंदर्य आवडीच्या तृप्तीबरोबरच अन्नाच्या गरजेसाठी केला जातो. माणसाचा स्वभावच असा आहे की तो जनावरांप्रमाणे केवळ पोट भरण्याची चिंता करत नाही तर आपल्या आवडी-निवडीची भुकही भागवत असतो.

खजुर अरबांच्या आवडीचे फळ असल्याचे येथे लक्षात येते ज्यामुळे त्यांच्या बागेचे सौंदर्य खुलून तर दिसतेच पण जगभरातील लोकांनाही ते आकर्षित करत असते.

(क्रमशः)


-डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget