Halloween Costume ideas 2015

एकही मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख मंत्री नसलेले एनडीए सरकारभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. परंतू २९३ लोकसभा खासदार असलेल्या एनडीएकडे मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख समुदायाचा एकही खासदार नाही.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या १८व्या लोकसभेच्या विश्लेषणानुसार, एनडीएचे ३३.२ टक्के खासदार ‘तथाकथित’ उच्च जातीचे आहेत, १५.७ टक्के मध्यवर्ती जातीचे आहेत आणि २६.२ टक्के इतर मागास जातींचे आहेत, परंतु यात एकही मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख समुदायातील नाही. राजकीय अभ्यासक गिल्स व्हर्नियर्स यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की एनडीएच्या तुलनेत इंडिया ब्लॉकच्या २३५ खासदारांपैकी मुस्लिम ७.९ टक्के, शीख ५ टक्के आणि ख्रिश्चन ३.५ टक्के आहेत. विश्लेषणात असेही दिसून आले आहे की कनिष्ठ सभागृहातील भारतीय ब्लॉक खासदारांमध्ये उच्च जाती, मध्यवर्ती जाती आणि ओबीसी अनुक्रमे १२.४ टक्के, ११.९ टक्के आणि ३०.७ टक्के इतके आहेत.

१८व्या लोकसभेसाठी २४ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत आणि त्यापैकी २१ खासदार हे इंडिया आघाडीचे आहेत. गतवेळी निवडलेल्या खासदारांपेक्षा ही संख्या तीनने कमी आहे. देशात सुमारे २० टक्के मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या १०० जागांसाठी या वेळी देशाच्या प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी केवळ ९० उमेदवार उभे केले होते. २०१९ मध्ये प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या १३६ मुस्लिम उमेदवारांपैकी २६ विजयी झाले. २०१४ मध्ये १६ व्या लोकसभेसाठी याच पक्षांच्या २१६ उमेदवारांपैकी २३ खासदार म्हणून निवडून आले. गतवेळी जिंकलेल्या २६ पैकी १८ खासदारांनी पुन्हा बाजी मारली.

या वेळी जिंकलेल्या २४ खासदारांमध्ये काँग्रेसचे ७ आणि तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार आहेत. केरळची मल्लापुरम आणि पोन्नानी जागा तसेच तामिळनाडूच्या रामनाथपुरम जागेवर आययूएमएलच्या उमेदवाराने पुन्हा विजये खेचून आणला. त्यातील मल्लापुरमच्या जागेवर भाजपने एकमेव मुस्लिम उमेदवार दिला होता. पश्चिम बंगालच्या ४२ पैकी ६ आणि यूपीच्या ८० पैकी ५ जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले. हैदराबादेत एआयएमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी आपली जागा कायम राखली. याठिकाणी त्यांचा हा सलग आठवा विजय ठरला. मुर्शिदाबाद, धूबडी, बारामुल्ला, श्रीनगर आणि लक्षद्वीपमध्ये १८व्या वेळी मुस्लिम उमेदवारच निवडून आला. ५०% हून जास्त मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या पश्चिम बंगालच्या बहरामपूर जागेवर प्रथमच मुस्लिम उमेदवार जिंकला आहे. येथे तृणमूल काँग्रेसच्या यूसुफ पठाण यांनी काँग्रेस उमेदवार अधीर रंजन चौधरी यांना पराभूत केले.

केरळमधील मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे एकमेव मुस्लिम उमेदवार डॉ. अब्दुल सलाम यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ही जागा आययूएमएल च्या बशीर यांनी जिंकली. मुख्तार अब्बास नकवी यांचा कार्यकाळ जुलै २०२२ मध्ये संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात मुस्लिम समुदायातील एकही व्यक्ती नाही. नकवी यांनी २०१४ ते २०२२ पर्यंत अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिले होते.

एनडीए आघाडीचे ३० खासदार लोकसभेवर निवडून देणाऱ्या बिहारला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. या वेळी सहा नवे चेहरे असलेले आठ जण आहेत. आठ पैकी तीन ओबीसी, तीन सवर्ण आणि दोन दलित आहेत. महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आता एनडीएच्या खासदारांचा एक छोटा गट तयार झाला आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ या सहा जणांची मंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील नऊ मंत्र्यांमध्ये चार ओबीसी, तीन सवर्ण आणि दोन दलित समाजाचे आहेत. आंध्र प्रदेशात भाजपचा मित्रपक्ष तेलुगू देसम पक्षाचा (टीडीपी) मोठा वाटा असून, मोदी सरकारमध्ये तीन मंत्री असतील- दोन सामान्य प्रवर्गातील आणि एक ओबीसीचा. यूपीत समाजवादी पक्षाला मुस्लिम उमेदवारांच्या जागांवर सर्वाधिक फायदा झाला. गतवेळपेक्षा चारच्या तुलनेत यावेळी सपला मुस्लिम बहुल १० जागांवर विजय मिळाला. या जागांवर सपचे चार मुस्लिम उमेदवारही विजयी झाले आहेत.

देशात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या जम्मू-काश्मीर, प. बंगाल, आसाम, यूपी आणि केरळमधूनच यावेळी सर्वाधिक उमेदवार संसदेत पोहोचले. मप्र, राजस्थान, गुजरातमधून एकही मुस्लिम खासदार झाला नाही. यूपीमध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने मुस्लिम बहुल प. बंगालममध्ये आपल्या जागा वाढवल्या.

- शाहजहान मगदुम 

कार्यकारी संपादकPost a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget