ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, माझ्यानंतर तुम्हाला असे निर्बंध घ्यावे लागतील आणि अशा घटनांना सामोरे जावे लागेल ज्या तुम्हाला पसंत नसतील. लोकांनी विचारले, आमच्यापैकी कुणासमोर हे प्रश्न पडले तर त्याने काय करावे? प्रेषितांनी उत्तर दिले, तुमच्यावर जे अधिकार आहेत त्यांची पूर्तता करा आणि आपला हक्क अल्लाहकडे मागा. (बुखारी, मुस्लिम)
अबू कतादा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की चांगली स्वप्ने अल्लाहकरवी पडतात आणि वाईट स्वप्ने सैतानाची असतात. तुमच्यापैकी जर कुणी आपल्या पसंतीचे स्वप्न पाहिले असेल तर त्याने ते स्वप्न फक्त अशा व्यक्तीला सांगावे जी त्याच्यावर प्रेम करते. आणि जर कुणी असे स्वप्न पाहिले असेल जे त्याला आवडत नसेल तर अशा माणसाने सैतानाच्या वाईटापासून अल्लाहची शरणागती पत्करावी. कुणालाही ह्या स्वप्नाविषयी सांगू नये. कारण असे स्वप्न त्याला काहीच नुकसान करणार नाही. (बुखारी व मुस्लिम)
माता ह. आएशा (र.) म्हणतात की एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, “तुम्ही कधी माझ्याशी प्रसन्न होता आणि कधी नाराज होता त्याची मला माहिती असते.” मी त्यांना विचारले, “हे आपण कसे ओळखता?” प्रेषितांनी त्यांना सांगितले, “जेव्हा तुम्ही माझ्याशी राजी असता तेव्हा असे म्हणता की मुहम्मद (स.) यांच्या विधात्याची शपथ, ही अशी गोष्ट नाही. आणि जेव्हा तुम्ही माझ्यावर रागवता तेव्हा असे म्हणता की इब्राहीम (अ.) यांच्या विधात्याची शपथ, ही गोष्ट अशी नाही.” ह. आएशा (र.) म्हणाल्या, गोष्ट तर हीच खरी आहे, पण मी फक्त आपले नाव सोडत असते (मनातून आपल्याशी असलेले प्रेम अशा वेळीही विलग होत नाही. (संदर्भ – मुस्लिम)
माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणता ऐकले आहे, “मनुष्य आपल्या कुटुंबियांच्या, संपत्तीच्या आणि शेजाऱ्यांच्या बाबतीत जी काही चूक करतो, नमाज, रोजा आणि सदका त्या चुकांचे (पापांचे) प्रायश्चित्त बनतात.’’ (हदीस : बुखारी बाबुस्सौम)
मनुष्याच्या हातून आपल्या मुलाबाळांसाठी पाप (चुका) घडतात. अशा प्रकारे व्यापार-उदिम आणि शेजाऱ्यांच्या बाबतीत सामान्यत: चुका घडतात, तेव्हा या उपासनांच्या परिणामस्वरूप अल्लाह त्या चुकांना क्षमा करील (अट अशी की या चुका किंवा पाप जाणूनबुजून केलेले नसून अनावधानाने घडलेले असावेत).
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment