Halloween Costume ideas 2015

सहिष्णु रामोजी राव


देशातील सर्वात मोठ्या प्रादेशिक वृत्तपत्र इनाडू समुहाचे मालक, रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) आणि ई टिव्ही समुहाचे संस्थापक माननीय रामोजी राव यांचे आज शनिवार 8 जून रोजी निधन झालं. सन 2000-2001 मध्ये त्यांच्या ई टिव्ही मराठी चॅनेलमध्ये काही वर्षे काम करण्याचे भाग्य मला लाभले होते. तेंव्हाच्या एका प्रसंगाची आठवण झाली -

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत इतर भाषेतील चॅनेल्ससोबतच आमच्या ई टिव्ही मराठीचाही स्टुडिओ होता. एकदा आमच्या स्टुडिओमधील वॉशरुमच्या बेसीनमध्ये एकदा मी वज़ु (नमाजपूर्वी हात पाय तोंड धुण्याची एक विशिष्ट पद्धत) करत होतो. ते करतांना शेवटी पाय धुवावे लागतात. पाय धुण्यासाठी असा वेगळा नळ तिथे जवळपास उपलब्ध नव्हता. म्हणून आम्ही मुस्लिम कर्मचारी पाय वर करून बेसीनमध्येच पाय धूत होतो. तसं मीही पाय वर करून बेसीनमध्येच धुतलं. ते धुताना अचानक रामोजी राव तिथे आले अन् मला तसं करतांना पाहिलं अन् चटकन निघून गेले. त्यावेळी मला मनात भिती वाटू लागली की, आता आपल्याला कॅबीनमध्ये बोलावून त्यांचं बोलणं एकून घ्यावं लागेल किंवा बेशिस्तीची कारवाई तरी होईल.  पण दुसऱ्या दिवशी त्याच वॉशरुममध्ये गेलो असता पाहतो तर काय ... बेसीनखाली एक छोटासा नळ बसवलेला होता. मनात रामोजींविषयी असलेला आदर आणखीनच वाढला. आम्हाला शुक्रवारची नमाज़ मस्जिदीतच सामुहिकरित्या पठण करणे अनिवार्य असते. म्हणून आम्हाला दर शुक्रवारी फिल्मसिटीच्या बाहेर असलेल्या मस्जिदीत जावं लागत होतं. फिल्मसिटी आणि ई टिव्ही उर्दू व इतर भाषेतील चॅनेल्समध्ये मुस्लिमांची संख्या बरीच होती. आमच्यासाठी रामोजी राव यांनी खास एका बसची व्यवस्था केलेली होती. ई टिव्ही उर्दूच्या निमित्ताने त्यांनी जगभरातील उर्दू भाषिकांसाठी एक मोठं असं विचारपीठ उपलब्ध करवून दिलंय. कर्मचाऱ्यांना तिथे पगार कमी दिला जायचा, याची तक्रार अनेक जण करत होते. फिल्मसिटीत अर्धनग्न महिलांचे पुतळे लावलेले होते. या काही खटकणाऱ्या गोष्टी तिथे होत्या. पण स्वतः नास्तिक असूनही इतरांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याची ही सहिष्णु वृत्ती मात्र नक्कीच रामोजींच्या अंगी होती. म्हणूनच ते आदरास पात्र ठरतात. त्यांचा ई टिव्ही समुह हा आमच्यासाठी फक्त एक स्टुडिओ नव्हता, तर ती आम्हा नवीन पत्रकारांसाठी एक शाळाच होती. आज अनेक चॅनेल्स व वृत्तपत्रांमध्ये चमकणारे पत्रकार जास्त करून त्याच शाळेतले विद्यार्थी आहेत. आज मी ज्या ’इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर (टोल फ्री नंबर1800 572 3000)’ येथे मराठीसाठी कॉल रिप्रेज़ेंटेटिव्ह म्हणून काम करतो, त्याचं मुख्यालयही हैद्राबादलाच आहे. हे काम करत असतांना ई टिव्हीची नेहमी आठवण येते. आम्ही सगळे पत्रकार व इतर कर्मचारी एका कुटुंबाचा भाग होतो. रामोजींच्या जाण्याने आपल्या घरचंच कुणी गेल्याचं दुःख झालंय. 

- नौशाद उस्मान, औरंगाबाद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget