(६१) आणि स्मरण करा जेव्हा आम्ही दूतांना सांगितले, की आदमपुढे नतमस्तक व्हा तेव्हा सर्व नतमस्तक झाले पण इब्लीस (सैतान) नतमस्तक झाला नाही. त्याने सांगितले, ‘‘काय मी त्याच्यापुढे नतमस्तक होऊ ज्याला तू मातीने बनविले आहेस?’’
(६२) मग तो म्हणाला, ‘‘पाहा तर खरे, काय हा माझ्यावर श्रेष्ठत्व प्रदान करण्यायोग्य होता? जर तू मला कयामतच्या दिवसापर्यंत सवड दिलीस तर मी याच्या संपूर्ण वंशाचे समूळ उच्चाटन करून टाकीन. केवळ थोडेच लोक माझ्यापासून वाचतील.’’
(६३) सर्वश्रेष्ठ अल्लाहने फरमाविले, ‘‘बरे तर जा,यांच्यापैकी जे कोणी तुझे अनुकरण करतील तुझ्यासह त्या सर्वांसाठी जहन्नमच भरपूर मोबदला आहे.
(६४) तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणाने फूस लावू शकतो, लाव. त्यांच्यावर आपले स्वार व प्यादे चालून आण, संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर आणि त्यांना आश्वासनाच्या जाळ्यात अडकव आणि सैतानाचे आश्वासन एका फसवणुकीशिवाय काहीही नाही.
(६५) नि:संशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा पालनकर्ता पुरेसा आहे.’’
(६६) तुमचा (खरा) पालनकर्ता तर तो आहे, जो समुद्रात तुमची नौका वल्हवितो जेणेकरून तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. वस्तुस्थिती अशी आहे की तो तुमच्या स्थितीवर अत्यंत मेहरबान आहे.
(६७) जेव्हा समुद्रात तुमच्यावर संकट येते तेव्हा त्या एकाशिवाय अन्य ज्यांचा तुम्ही धावा करीत असता ते सर्व हरवलेले असतात, परंतु जेव्हा तो तुम्हाला वाचवून खुश्कीवर पोहचवितो तेव्हा तुम्ही त्याच्यापासून विमुख होता. मनुष्य खरोखरच मोठा कृतघ्न आहे.
Post a Comment