जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात 18 व्या लोकसभेची निवडणूक उत्साहात पार पाडली. लहान-मोठ्या अनुचित घटना वगळता निवडणूक सात टप्प्यात सुरळीत झाली. यामध्ये प्रमुख दोन गठबंधन पक्ष होते. एनडीए आणि इंडिया आघाडी. या दोन्ही गठबंधनातील मुख्य पक्ष भाजप आणि काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपाला 241 तर काँग्रेसला 99 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोणालाच मनमानीची एकहाती सत्ता गाजविता येणार नाही. ही आनंदाची बाब आहे.
निवडणुकीआधी मोदींनी आणि त्यांच्या काही वाचाळ नेत्यांनी जी बेताल वक्तव्य केली होती ती जनतेला पसंद पडली नाहीत. जनता पंतप्रधानांकडून त्यांच्या अडीअडचणी भविष्यात कशा सोडविल्या जातील हे ऐकण्यास उत्सुक होती. परंतु त्यांना बेताल वक्तव्य ऐकावी लागली. त्यामुळे सुजान मतदारांनी त्यांची घौडदौड रोखून त्यांना जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. हे सर्व भारतीयांचे यश म्हणावे लागेल. विशेषतः त्या सर्वांचे जे लोकशाही अबाधित रहावी, हा उद्देश समोर ठेवून रात्रंदिवस मेहनत घेत होते. एवढ्यावरच हुरळून न जाता आता सर्व भारतीय नागरिकांची जबाबदारी ही आहे की त्यांनी आपले संविधान आणि त्याची नितीमुल्ये अबाधित राखण्यासाठी जागल्याची भूमिका निभवावी.
गेल्या दहा वर्षात मुठभर लोकांचा झालेल्या आर्थिक विकासाने आर्थिक विषमतेची दरी अधिक रूंद केली. वाढती महागाई आणि कमाल बेरोजगारीने जनतेला सळो की पळो करून सोडले आहे. यापेक्षा जास्त नुकसान गेल्या दहा वर्षातील शासनामुळे हे झाले की, देशात धार्मिक ध्रुवीकरण केल्याने नागरिकामध्ये एकमेकांप्रती असलेले आपुलकीचे संबंध खराब झाले. यात मोठी दरी पडली आहे. ती किती खोल गेली आणि किती काळाने भरून निघेल याचे मूल्यमापन मात्र करता येणार नाही. जसे की, मणिपूर राज्यतील नागरिकांची मने पूर्णतः दुभंगली आहेत. मोदी व शहा सरकारने मुस्लिम समाजाचे जेवढे होईल तेवढे खच्चीकरण करण्याचा या ना त्या कारणाने प्रयत्न केला. आदीवासी, दलित आणि बहुसंख्यांक समाजामध्येही मोठी दरी निर्माण करण्याची कुठलीच कसर बाकी ठेवली नसल्याचे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. जरी एनडीएला बहुमत मिळाले असले तरी आपण त्यांच्या आनंदात सामील होत लोकशाहीप्रधान असल्यामुळे आपणाला सर्वांचा आदर आणि सन्मान आहे. मात्र भविष्यात ते कोणत्या योजना आणि कोणती धोरणे आखतात याकडे आपले बारकाईने लक्ष असले पाहिजे. भारतीय संविधानात उद्देशपत्रिकेमध्ये ज्या मुल्यांचा उद्घोष करण्यात आला आहे त्यात म्हटले आहे की - ‘‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांसः सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वतः प्रत अर्पण करत आहोत.’’ देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व धोरणकर्त्यांनी आपल्याला जो उद्देश भारतीयत्व टिकवून ठेवण्यासाठी दिलेला आहे त्याचे रक्षण, संरक्षण आणि अमलात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करणे गरजेचे आहेत. आम्ही कुठल्या धर्मात, समाजात जन्मलो आहोत, त्याचे विचार अंगीकारत आम्ही आपल्या देशासाठी काय योगदान देवू आणि याला कसे पुढे नेवू यासाठी अतोनात प्रयत्न होणे गरजेचे आहे. कुरआनमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही एक असा गट असलो पाहिजे की जो लोकांना नैतिकतेकडे वळवितो आणि वाईटांपासून रोखतो. याप्रमाणे आमचे विचार आणि कृती असली तर निश्चितच आपण आपल्या देशाला पुढे नेवू शकतो. आपल्या हातून कुठलाही अतिरेक न होता सर्वांसमवेत न्याय भावनेने वागून आपण आपली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. जगाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असताना आपण सर्वांनी आपला देश हुकूमशाही मार्गाकडे जाता-जाता वाचविला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याबद्दल सर्व भारतीय बंधू-भगिनींचे कौतुक करायला हवे. मानवी स्वभाव शांततेचा आहे त्याच्या मनात दीर्घकाळ द्वेष टिकून राहत नाही. त्याचाच परिपाक आपल्याला 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला. जे सरकार स्थापन होईल ते संवैधानिक नितीमुल्यांप्रमाणे चालेल अशी अपेक्षा ठेवूयात. आपण सर्व भारतीयांनी मनात एकात्मता, न्याय, बंधूता ही मूल्ये सदैव आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत महासत्ता करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपले सर्वोतोपरी योगदान देण्यासाठी सज्ज राहूयात. सत्यमेव जयते.
- बशीर शेख
मो : 8830273038
Post a Comment