न्यायाच्या तेजस्वी घटना
एका व्यापाऱ्याची मालमत्ता चोरीला गेली. लोकांनी संशयाच्या आधारे दोघांना पकडून काझींच्या (न्यायाधीश) सेवेत हजर केले.
त्यांनी काझींना सांगितले की, ‘व्यापाऱ्याची मालमत्ता चोरीला गेली आहे. आम्हाला या दोन व्यक्तींवर संशय आहे, परंतु दोघेही स्वतःला निरपराध सांगत आहेत. त्यांच्यापैकी नेमका कोण खरा चोर आहे हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाहीत. आता दोषी कोण आहे, ते न्यायालयाने ठरवावे.’
काझींनी लोकांना आदेश दिला की, ‘तुम्ही थोडे थांबा, मला तहान लागली आहे, मी आधी पाणी पिईन, मग निर्णय देईन.’
मग काझींनी आपल्या सेवकाला पाण्याचा पेला आणण्याची आज्ञा केली. सेवकाने आदेशाचे पालन केले.
अतिशय सुंदर आणि शोभिवंत काचेच्या पेल्यात पाणी आणले. काझीने पेला उचलला आणि पाणी पिऊ लागले. दरबारात स्तब्धता होती. अचानक काझींनी आपल्या हातातून काचेचा पेला खाली सोडून दिला. पेला जमिनीवर पडताच जोरदार आवाज झाला. पेला चकनाचूर झाला.
अचानक पेला पडल्याने झालेल्या आवाजाने शांतता भंग झाली. लोक घाबरले. अचानक हे काय झाले?
तेव्हा काझींनी त्या दोघांपैकी एकाची मान पकडली आणि त्याला जोरात हलवले आणि मोठ्याने ओरडले, “तू चोरी केलीस! तू चोर आहेस!”
लोक उघड्या डोळ्यांनी हे दृश्य पाहत होते. काय घडत आहे, हे लोकांना कळत नव्हते.
दरम्यान, ती व्यक्ती आपण चोरी केली नसल्याचे वारंवार सांगत होती.
न्यायाधीश मात्र त्याची मान पकडून जोरजोरात ओरडत होते की, “खोटे बोलू नकोस खोटे बोलून काही उपयोग नाही. तूच चोरी केली आहे! तू चोर आहेस! बऱ्या गुमानानं गुन्हा कबूल कर.”
थोड्या वादानंतर त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की खरोखरच त्याने चोरी केली आहे.
आता स्वतः चोर आणि दरबारातील लोकही विचार करू लागले की न्यायाधीशांनी खरा चोर कसा ओळखला.
लोक म्हणले, “काझी साहेब आमची जिज्ञासा शिगेला पोहचली आहे. आम्हाला पण सांगा की तुम्ही कसे ओळखले खरा गुन्हेगार हाच आहे! तुमच्याकडे काही पुरावा आहे का?”
काझी म्हणाले, “खरे तर मला तहान लागली नव्हती! मला माहीत आहे की चोरांची मने मजबूत असतात. मी हेतुपुरस्पर एक पेला पाण्याची मागणी केली. मी दोन्ही आरोपींच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. जेव्हा मी पेला सोडला तेव्हा तो खाली पडताच कर्कश आवाज झाला. या आवाजाने सर्व जण काळजीत पडले. सर्वांना काय झाले असा प्रश्न पडला! पण याची अवस्था पूर्णपणे वेगळी होती. याच्या चेहऱ्यावर भीती किंवा काळजीचे चिन्ह नव्हते. चोर, दरोडेखोरांना मोठा अपघात होण्याची भीती नसते. मोठमोठ्या घटनानांचाही त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. सर्वसामान्य नागरिक मात्र एका छोट्याशा घटनेनेही मोठ्या प्रमाणावर त्रस्त होतात. हा दुसरा आरोपी पेला तुटण्याच्या आवाजाने हादरला. त्यावरून मी ओळखले की खरा चोर कोण आहे.”
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 164)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment