न्यायाच्या तेजस्वी घटना
खलीफा मन्सूर अब्बासी (१८७१) च्या काळात एका शासकाने बेकायदेशीरपणे एका माणसाची संपत्ती जप्त केली.
तो माणूस तक्रार घेऊन खलीफाच्या दरबारात गेला आणि म्हणाला, “हे विश्वासू सेनापती, अल्लाह तुमचे रक्षण करो! माझी एक गरज आहे. मी आधी माझी गरज प्रकट करू की त्या अगोदर एक उदाहरण देऊ?”
खलीफा म्हणाला, “प्रथम एक उदाहरण द्या.”
तो माणूस म्हणाला, “जेव्हा एखाद्या लहान मुलाला एखाद्या अप्रिय गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा त्याला वाटते या संकटातून आपल्याला सोडविणारा आईपेक्षा जास्त शक्तिशाली कोणी नाही आणि तो आईचा धावा करतो. जेव्हा थोडा मोठा होतो तेव्हा तो आपल्या वडिलांकडे तक्रार करतो, कारण त्याला वाटते की, त्याचे वडील त्याला आपल्या आईपेक्षा जास्त मदत करू शकतात. मग तो तरुण झाल्यावर आपली तक्रार राज्यकर्त्याकडे घेऊन जातो कारण त्याला माहीत असते की, शासक आपल्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मग जेव्हा त्याची बुद्धी वाढते तेव्हा तो राजाच्या दरबारात आपली समस्या मांडतो कारण त्याला हे माहीत असते की राजा सर्व लोकांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. पण जर त्याला राजाच्या दरबारातही न्याय मिळाला नाही तर तो अल्लाह तआलाचा दरवाजा ठोठावतो.”
या युक्तिवादानंतर त्या माणसाने पुन्हा खलीफाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. “माझी एक समस्या आहे. मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलो आहे. मला माहीत आहे की, या पृथ्वीवर तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान कोणीही नाही. जर तुम्ही मला न्याय दिला तर ठीक आहे, अन्यथा मी अल्लाहचे दार ठोठावेन.”
खलीफा मन्सूर म्हणाले, “आम्ही तुम्हाला न्याय देऊ. तुमची समस्या सांगा.”
तो म्हणाला, “तुमच्या एका राज अधिकाऱ्याने माझ्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. मला माझी जमीन हवी आहे.”
खलीफाने आपल्या शासकाला लगेच जमीन परत करण्याचा आदेश दिला आणि त्याला लिहिले की या माणसाला आरामाची साधने उपलब्ध करून द्या आणि त्याची आर्थिक स्थिती समृद्ध करा.
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित,
‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 160)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment