(१८७१-१९१५)
नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर, ज्यांनी केवळ भारतीय स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठीही काम केले. त्यांचा जन्म ७ जून १८७१ रोजी सध्याच्या बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाला.
नवाब सलीमुल्लाह १८९३ मध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट बनले. परंतु युरोपियन व्यापारी आणि अधिकारी यांच्याकडून होणारे शोषण त्यांना सहन न झाल्याने त्यांनी १८९५ मध्ये नोकरी सोडली. स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी त्यांनी विविध मार्गांनी सेवा केली. त्यांनी लोकांना शिक्षित करण्याला महत्त्व दिले.
अलिगढमधील मोहम्मडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजच्या विकासासाठी त्यांनी मोठी रक्कम दिली. १९०१ मध्ये त्यांचे वडील नवाब अहसानुल्लाह यांच्या निधनानंतर ते ढाक्याचे चौथे नवाब बनले. त्यांनी १९०६ मध्ये बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते की हा उपाय गरीब मुस्लिम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांचे जमीनदारांकडून शोषण केले जात होते. गरीब मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने त्यांनी १९०६ मध्ये पूर्व बंगाल-आसाम प्रांतीय शैक्षणिक परिषद आयोजित केली. मुस्लिमांसाठी शैक्षणिक संधी मिळावी म्हणून त्यांनी ढाका येथे विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी केली. मुस्लिमांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची इच्छा होती आणि त्यांनी यासंदर्भात सुमारे दोन हजार मुस्लिम नेत्यांना पत्रे लिहिली होती. त्यांनी त्यांना आपल्या राजवाड्यात या विषयावर चर्चा करण्यासाठी ढाका येथील अहसान मंझिल येथे आमंत्रित केले. त्यांनी अलीगढ येथे २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९०६ या कालावधीत अखिल भारतीय मोहम्मडन शैक्षणिक परिषदही आयोजित केली होती. भोपाळच्या बेगम, अली ब्रदर्स, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या मान्यवर व्यक्तींनी परिषदेला हजेरी लावली. परिषदेच्या अंतिम दिवशी नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगचा प्रस्ताव मांडला आणि त्याच्या स्थापनेची गरज स्पष्ट केली.
त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘ऑल इंडिया मुस्लिम लीग’ची स्थापना झाली, ज्यामध्ये त्यांनी विविध प्रमुख पदे भूषवली. मुस्लिमांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी १९११ मध्ये ब्रिटीश सरकारला निवेदन दिले. १९१४ पासून सक्रिय राजकारणापासून ते स्वेच्छेने अलिप्त राहिले असले तरी त्यांनी केवळ शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी वसतिगृहांच्या विकासासाठी आपली संपत्ती खर्च केली नाही तर त्यांच्यासाठी सरकारी निधी मिळविण्यासाठी अविरतपणे काम केले..नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर यांचे १५ जानेवारी १९१५ रोजी निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment