सृष्टी अल्लाहच्या आविष्कारातून अस्तित्वात आली आणि प्रत्येक सजीवाचे अस्तित्व त्याच्याच ताब्यात आहे. जीवनही तोच देतो आणि एका निश्चित वेळी काढूनही घेतो. मृत्यूसमयी शरीरापासून आत्मा वेगळा होताना काय अवस्था होते? हा अनुभव प्रत्येकाच्या नशीबी लिहिलेला आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने म्हटले आहे,
’’कुल्लु नफ्सिन जा’इकतुल्-मवति, वनब्लूकुम् बिश्शर्रि वल्-खय्-रि फित्नतन, व इलय्-ना तुर्-जऊन.’’
अनुवाद :- प्रत्येक जिवाला मृत्यूची चव चाखायची आहे आणि आम्ही चांगल्या व वाईट परिस्थितीद्वारे तुम्हा सर्वांची परीक्षा घेत असतो, सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच परत यायचे आहे.
( 21 अल्-अम्बिया - 35 )
आत्मा शरीराशी जुळलेला असल्याने जेव्हा तो मृत्यूसमयी फरिश्त्यांकडून काढून घेतला जातो तेव्हा त्रास, वेदना व दुःख वाटणे स्वाभाविक आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही, म्हणून शहाण्या माणसाने मृत्यूनंतरच्या परिणामांची फिकीर करणे आणि अंततः यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या सुधारणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. माणूस कळत नकळत परीक्षेतून जात असतो. संपत्ती, संतती आणि इतर सांसारिक गोष्टी त्याच्यासाठी मोह ठरतात. या आयतीमध्ये चांगली परिस्थिती म्हणजे आर्थिक विपुलता आणि सुखसमृद्धीचा काळ आहे आणि वाईट म्हणजे त्रास आणि दुःखदायक परिस्थिती होय. अल्लाह माणसाला दोन्ही परिस्थितीत टाकून त्याची परीक्षा घेत असतो. सुखसमृद्धीच्या वेळी अल्लाहचे आभार मानून आणि अडचणीच्या वेळी दु:खांवर धीर धरून श्रद्धावान माणूस परीक्षेत यशस्वी होतो. मग सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही तो पुरस्कारांना पात्र ठरतो, परंतु जेव्हा नास्तिक व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते, सांसारिक सुखाचे दिवस येतात, तेव्हा त्याचे डोके फिरते. त्याला अहंकाराचा रोग जडतो. इराक व इजिप्तच्या इतिहासात नमरूद आणि फिरऔन या दोन हुकुमशहांचा उल्लेख आहे, ज्यांनी सत्तेच्या नशेत देवत्वाचा दावा केला होता. माणसाला एकदा अहंकाराने गिळले की त्याच्यातील माणूसपण संपत जाते. तो इतरांचा तिरस्कार करू लागतो. ’मी’ पणाच्या रोगामुळे हळू हळू तो स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना विनाशाकडे घेऊन जातो. अशा माणसावर वाईट दिवस आले तर तो खचून जातो. धीर धरण्याऐवजी ईश्वरावर अविश्वास दाखवू लागतो. ईश्वराला सोडून दारोदारी नाक घासू लागतो. अशा प्रकारे तो या जगाबरोबर मरणोत्तर जीवनातही अल्लाहच्या क्रोधाला पात्र ठरतो. आता ही व्यक्तीची जबाबदारी आहे की, त्याला शाकिर व्हायचे आहे की काफिर? म्हणजे तो कृतज्ञ बनू इच्छितो की कृतघ्न? हेच पडताळून पाहणे माणसाच्या परीक्षेचा उद्देश आहे.
शेवटी त्याला आपल्या स्वामीकडेच परत जायचे आहे, मग त्याचा हिशोब चुकता करणे हे ईश्वराचे काम आहे. काही अत्याचारी आयुष्यभर दडपशाही करून जगाला हादरवून सोडतात, पण या जगात त्यांना कोणतीही शिक्षा मिळत नसल्याचे दिसून येते. याउलट काही लोक आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेत घालून देतात आणि त्यांना बदल्यात कोणतेही बक्षीस मिळाल्याचे दिसत नाही. तसेच अनेक माणसं जन्मभर त्रास, दु:ख व कष्टाने जगतात, पण त्यांनाही कोणते फळ मिळत नसल्याचे दिसून येते. यावरून हा निष्कर्ष निघतो की मानवजातीला न्याय देण्यासाठी मरणोत्तर जीवनात कयामतचा दिवस प्रस्थापित केला जाईल आणि न्यायिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिथे माणसांना दूबार जीवन प्रदान केले जाईल. त्यामुळे बुध्दीमान तोच आहे जो सुखदुःखाची वेगवेगळी परिस्थिती समजून घेण्यात चूकत नाही. परिस्थिती कोणतीही असो, त्यातील परीक्षेचा पैलू लक्षात घेऊन तो सन्मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो.
....................... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment