पवित्र कुरआनात झोपेला अल्लाच्या संकेतांपैकी एक असे म्हटले आहे. “आम्ही तुमच्यासाठी झोपेला विश्रांती, रात्रीला पडदा आणि दिवसाला कार्य करण्यासाठी बनवलं आहे.” (सूरह नबा : १)
ह्या आयतीप्रमाणे झोपण्यासाठी रात्रीची आणि काम करण्यासाठी दिवसाची वेळ ठरवली आहे. जे लोक दिवसाला रात्र आणि ऐशखोरी करण्यासाठी रात्रीला दिवसासमान करतात ते अल्लाहच्या नियमांचे उल्लंघन करतात. इतकेच नव्हे तर रात्रभर उपासना करण्यातच व्यस्त राहायलाही अल्लाह पसंत करत नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, “तुमच्या डोळ्यांचे देखील तुमच्यावर अधिकार आहेत.” तसेच त्यांनी काम आणि आराम करण्याची वेळही निश्चित केली आहे.
(१) रात्रीची नमाज (इशा) अदा केल्यानंतर साधारणतः रात्री नऊ वाजण्याच्या जवळपास माणसांनी झोपी केले पाहिजे जेणेकरून सकाळी लवकर उठता येईल. (२) झोपण्यापूर्वी अंथरुण चांगल्या प्रकारे झटकून साफ करावे आणि उजव्या कुशीवर झोपावे. (३) ज्या छतावरील भिंतीवर संरक्षक कठडा बांधलेला नसेल त्यावर झोपू नये. (४) शुचिर्भूत होऊन झोपावे. (५) पोटावर (पालथे) झोपू नये. (६) झोपण्यापूर्वी घरातली सर्व दारे बंद करावीत, खाण्यापिण्याच्या वस्तू झाकून ठेवाव्यात. दिवा (लाइट) विझवावा. (७) घरात कुठे चुली किंवा आग पेटत असेल तर ती विझवून टाकावी. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की आग तुमची शत्रू आहे. (८) झोपण्यापूर्वी आणि जागे झाल्यावर प्रार्थना (दुआ) केली पाहिजे.
वस्त्र परिधान करण्याची उद्दिष्टे
वस्त्र परिधान करण्याची दोन उद्दिष्ट्ये आहेत. एक शारीरिक आणि दुसरं नैतिक. शारीरिक यासाठी की माणसाच्या शरीराचे थंडी आणि उष्णतेपासून रक्षण करावे. आणि नैतिक म्हणजे माणसाच्या शरीराच्या ज्या भागांवर इतरांची नजर पडू नये ते लपून राहावेत. इस्लाम धर्मात शरीराच्या लैंगिक भागांना नेहमीच झाकून ठेवण्यास फार महत्त्व दिले आहे. पुरुषांना बेंबीपासून गुडघ्यांपर्यंत आणि महिलांसाठी डोक्यावरील केसांपासून पायापर्यंत वस्त्रे परिधान करण्याची सक्ती केली आहे. इतकेच नव्हे तर एकांतात सुद्धा माणसांनी नग्नावस्थेत राहू नये, असे प्रेषितांनी सक्तीने सांगितले आहे.
इस्लामच्या शिकवणींनुसार असे वस्त्र परिधान केले पाहिजे ज्यात नैतिकता असावी. पुरुषांनी रेशमी वस्त्रे परिधान करू नयेत, तर स्त्रियांनी लहान कपडे खालू नयेत. पुरुषांनी जर कोणती आवश्यकता किंवा विवशता नसेल तर रेशमी कपडे परिधान करू नयेत. कारण अशा वस्त्रांनी स्त्रियांशी समानता होऊ शकते. अशी वस्त्रे परिधान करण्यापासूनही प्रेषितांनी मनाई केली आहे ज्यामुळे अहंकाराचे दर्शन होते. धार्मिक मंडळींनी म्हणजे मौलाना, सूफी-संतांनी गडद रंगांची वस्त्रे परिधान करू नयेत. यामागचे कारण असे की त्याद्वारे अहंकाराचे दर्शन होते.
(सीरतुन्नबी – शिबली नोमानी / सय्यद सुलेमान नदवी, खंड ६)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment