Halloween Costume ideas 2015

ईद-उल-अज़हा : इस्लाममध्ये सणांची संकल्पना


इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. रमजानचे उपवास संपल्यानंतर शाबानच्या पहिल्या दिवशीची ईद जिला ईद-उल-फित्र (दान देण्याचा सण). दूसरी ईद-उल-अजहा (कुर्बानी देण्याचा सण). ही ईद दरवर्षी इस्लामी कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्या (जिलहिज्जा) च्या 10 तारखेला साजरी केली जाते. यंदा ही ईद येत्या 17 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. बोली भाषेत या ईदला ‘बकरी ईद’ म्हटले जाते जे की चुकीचे आहे. हां ! ईद-ए-कुरबाँ म्हणणे योग्य आहे. यात साधारणपणे मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक बकरा कापून ईश्वराप्रती आपली एकनिष्ठता जाहीर करतात. त्यामुळे या कृतीला, बळी म्हणता येत नाही. ही ईद साजरी करण्यामागे एक इतिहास आहे पण त्याच्या तपशिलात न जाता जी घटना ही ईद साजरी करण्यासाठी कारणीभूत ठरली तिच्या संबंधी अगदी थोडक्यात माहिती घेऊया.  

हजरत इब्राहीम अलै.

ईद-उल-अजहाचा थेट संबंध ज्या इतिहास पुरूषाशी आहे त्यांचे नाव हजरत इब्राहित अलै. असे आहे. त्यांना इंग्रजीमध्ये ’अब्राहम’ म्हटले जाते आणि ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे ते समान स्विकृत आद्यपुरूषांपैकी एक होत. म्हणून या तिन्ही धर्मांना, अब्राहमिक रिलिजन्स असे म्हटले जाते. हजरत इब्राहिम अलै. यांचा जन्म ईसा पूर्व काळी 1996 तर 2510 हिजरी पूर्व काळी, ईराकच्या ’उर्र’ या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ’आजर’ असे होते. ते शिल्पकार होते. देवी, देवतांच्या मुर्त्या घडविण्यात निष्णात होते.     

कुरआनमध्ये सुरे इब्राहिम नावाचा एक अध्याय आहे ज्यात एकूण 52 आयाती आहेत तो यांच्याशी संबंधित आहे. याशिवाय, कुरआनमधील जवळ जवळ 63 अन्य आयातींमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ते 169 वर्षे जगले. आपल्या आयुष्यात सुरूवातीपासूनच त्यांना कठीण संघर्ष करावा लागला. ईश्वराने त्यांची अनेकवेळा परीक्षा घेतली. प्रत्येक परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. नुकत्याच जन्मलेल्या इस्माईल आणि आपली पत्नी हाजरा यांना आजच्या मक्का शहरातील निर्जनस्थळी सोडण्यापासून ते काबागृहाच्या निर्मितीपर्यंत अनेक ऐतिहासिक कार्यासाठी हजरत इब्राहिम अलै. ओळखले जातात. खत्ना करण्याची परंपरा जी तिन्ही सुमेटेरियन (एक ईश्वरवादी) धर्मामध्ये आढळते ती हजरत इब्राहिम अलै. यांच्यापासूनच सुरू झालेली आहे.

कुर्बानिची प्रथा कशी सुरू झाली?

ज्या कुर्बानिची आठवण म्हणून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणार्या प्रत्येक सधन मुस्लिम व्यक्तिवर कुर्बानी करण्याची जी ईश्वरप्रणित जबाबदारी टाकण्यात आलेली आहे तिचा तपशील कुरआनमध्ये अस्सफात या अध्यायाच्या आयात क्रमांक 100 ते 111 पर्यंत दिलेला आहे. त्याचा थोडक्यात तपशील असा की, वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी ईश्वराकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना केली. ती स्वीकारली गेली. त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला ज्याचे नाव ईस्माईल असे ठेवण्यात आले. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात येत आहे तो म्हणजे अनेक ऊलेमा आणि अभ्यासक वयाच्या 85 व्या वर्षी मुलाचा जन्म म्हणजे चमत्कार या अर्थाने घेतात पण ह. इब्राहीम अलै सलाम चे वय 175 वर्षांचे होते हे ते विसरतात. 175 वर्षाच्या वयात 85 व्या वर्षी मुलाचा जन्म होणे म्हणजे ऐन तारुण्यात जन्म होणे आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही हे वाचकांची लक्षात घ्यावे. इस्माईल 12 वर्षाचे झाले तेव्हा अचानक एका दिवशी त्यांनी स्वप्न पाहिले ज्यात त्यांनी पाहिले की, ते इस्माईलची कुर्बानी देत आहेत. या स्वप्नामुळे ते विचलित झाले. पण हेच स्वप्न पुन्हा दोन दिवस सातत्याने पडल्याने त्यांच्या लक्षात आले की, ईश्वर त्यांच्या पुत्राची कुर्बानी मागत आहे. तेव्हा हे स्वप्न त्यांनी ईस्माईलला सांगितले, तेव्हा त्या आज्ञाधारक पुत्राने प्रेषित ईब्राहिम अलै. यांना आपले स्वप्न साकार करण्याची परवानगी दिली. तेव्हा इब्राहिम अलै. यांनी इस्माईल यांना घेऊन गावापासून दूर निर्जन ठिकाणी नेऊन इस्माईल यांची कुर्बानी देण्याची तयारी केली. सोबत एक धारदार सुरी नेली होती. ईच्छित स्थळी गेल्यावर त्यांनी प्रथम इस्माईलच्या डोळ्यांवर व नंतर स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली व इस्माईलला जमिनीवर पाडले आणि त्यांच्या गळ्यावर सुरी चालविली. मात्र सुरी चालविण्याअगोदर विद्युत गतीने एक ईशदूत प्रकट झाला आणि त्याने हजरत इस्माईलच्या ऐवजी एक दुंबा (मेंढा) त्यांच्या जागी ठेवला. येणेप्रमाणे सुरी मेंढ्याच्या गळ्यावर चालविली गेली. इस्माईल मात्र सुरक्षित राहिले. कुरआनमध्ये सुरे अस्सफ्फाच्या आयत क्रमांक 105 ते 108 मध्ये म्हटले आहे की, हे इब्राहिम अलै. ! तू स्वप्न साकार केलेस. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उघड परीक्षा होती. आम्ही एक मोठे बलिदान प्रतिदानात देऊन इस्माईलची सुटका केली. आणि त्यांची प्रशंसा व गुनगान भावी पिढ्यांसाठी सदैव ठेवले.कुरआनचे एक भाष्यकार या संदर्भात म्हणतात की, जेव्हा इब्राहिम अलै. यांनी हजरत इस्माईल यांना जमिनीवर पाडले तेव्हा पृथ्वीवरील सर्व प्राणी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि ईश्वराकडे इस्माईलला वाचविण्याचा धावा करू लागले. तेव्हा ईश्वराने तेवढ्या क्षणासाठीच जेवढे क्षण ईशदुताला दुंबा घेऊन कुर्बानीच्या स्थळी जाण्यासाठी लागतील, तेवढा वेळ, ’काळा’ला थांबण्याचा आदेश दिला. आणि पृथ्वीवरील सर्व हालचाली तेवढ्या क्षणापुरत्या निलंबित झाल्या. अर्थात ह्या गोष्टी श्रद्धेच्या आहेत. ज्यांची इस्लामवर श्रद्धा नाही त्यांच्यासाठी ह्या घटनांवर विश्वास ठेवणे कठीण आहे व तसा त्यांना विश्वास न ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु यामुळे सत्य काही बदलत नाही. प्रत्येक प्रेषितासोबत ईश्वराने काही चमत्कार दिलेच होते. कारण त्या काळात चमत्कार दाखविल्याशिवाय लोक प्रेषितांवर विश्वास ठेवत नसत. ईद-उल-अज़हा हा एक अतिशय उद्देशपूर्ण सण आहे आणि तो दिवस मानव इतिहासात संस्मरणीय असा दिवस आहे ज्या दिवशी एका वडिलाने आपल्या मुलाची प्रत्यक्षात कुर्बानी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची आठवण म्हणून मुस्लिमांना आदेश दिलेला आहे की, आपल्या प्रिय जनावराची कुर्बानी करावी. साधारणपणे भारतीय उपखंडात ईदच्या अगोदर बाजारात जाऊन जनावर खरेदी करून आणून चार-दोन दिवस ठेऊन कुर्बानी करण्याची प्रथा आहे, जी की चुकीची आहे. वास्तविक पाहता जनावर इतक्या दिवस पाळायला हवा की त्याचा लळा लागायला हवा. लळा लागलेल्या या जनावराची कुर्बानी देताना ज्या यातना होतात त्या अनुभवाला याव्यात हा या ईद मागचा उद्देश आहे. तसेच अशी कमिटमेंट आहे की, मी माझ्या या प्रिय जनावराला त्याचप्रमाणे तुझ्या इच्छिेखातर कुर्बान करत आहे जसे की हजरत इब्राहिम अलै. यांनी आपल्या मुलाला कुर्बान केले होते. शिवाय, यामागचा हेतू असा की, ईश्वराने जनावराची कुर्बानी मागितली आहे म्हणून मी जनावराची देत आहे. ही कुर्बानी म्हणजे एक टोकन आहे, आश्वासन आहे, ईश्वरासमोर कमिटमेंट आहे की, जर उद्या ईश्वराने ईब्राहिम अलै. सलाम प्रमाणेच माझ्या मुलाची किंवा दस्तुरखुद्द माझीच कुर्बानी मागितली तरीही ती मी द्यायला तयार आहे. कुर्बानी देण्यामागचा हा महान उद्देश आहे.

इस्लामचे अंतिम उद्दिष्ट

इस्लाम चे अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेकवेळा मुस्लिमांना आपला जीव आणि संपत्ती कुर्बान करावी लागते. ती करतांना जराही संकोच होता कामा नये, यासाठी दरवर्षी कुर्बानीचा हा सराव करून घेतला जातो. हे फक्त इस्लाममध्येच आहे असे नाही. जगाच्या इतिहासामध्ये मानवकल्याणासाठी संपत्ती आणि जीवाचे बलिदान देण्याची एक मोठी परंपरा आहे. यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण गुजरातचे देता येईल. ही घटना 1962 ची आहे. चीन ने भारतावर आक्रमण केले होते. भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता. आपले लष्कर युद्धासाठी पूर्णतः तयार नव्हते. अशा परिस्थितीत सैन्याच्या खर्चासाठी नेहरूंनी दानशूर नागरिकांना दान देण्याची अपील केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदाबादच्या 25 हजार लोकांनी एकत्र येऊन एक-एक पैसा जमा करून 25 हजार पैसे टोकन स्वरूपात नेहरूंना पाठविले होते आणि सांगितले होते की, हे 25 हजार पैसे देणारे लोक एका पायावर तयार आहेत. पंडितजींना योग्य वाटेल तेव्हा या 25 हजार लोकांना बोलावून ते देशासाठी प्रत्यक्षात कोणते बलिदान हवे असेल ते त्यांच्याकडून घेऊ शकतात. मग नेहरू त्यांची सेवा घेवो की प्रत्यक्षात त्यांचे बलिदान घेवो. हे 25 हजार लोक प्रत्यक्षात ना युद्धात सामील झाले ना त्यांचे बलिदान झाले ना त्यांनी कुठली लष्करी सेवा केली. मात्र त्यांनी एवढी जबरदस्त कमिटमेंट केली होती की, गरज पडली असती तर खरोखरच ते देशासाठी स्वतःचे बलिदान देण्यासाठी तयार होते. ही गोष्ट त्यांच्या कमिटमेंटवरून नेहरूंच्याच नव्हे तर देशाच्याही लक्षात आली होती. अगदी अशीच कमिटमेंट मुस्लिम लोक दरवर्षी ईद-उल-अजहाच्या दिवशी जनावराची कुर्बानी टोकन स्वरूपात देऊन ईश्वरापुढे करतात. जणू ते म्हणतात की, ऐ अल्लाह ! तू आदेश देत असशील तर आम्ही आज जनावरांची कुर्बानी जशी दिली तशी उद्या आपल्या जीवाचीही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत. त्यामुळेच तर कुरआन म्हणतो की, त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते. त्याने यांना तुमच्यासाठी अशाप्रकारे अधीन केले आहे की जेणेकरून त्याने प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णावा. आणि हे पैगंबर (स.), शुभवार्ता द्या सदाचारी लोकांना.  

(सुरे हज (22) आयत क्र. 37)

इस्लाम एक आधुनिक आणि महान धर्म असून, मानवतेच्या कल्याणासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने अवतरित करण्यात आलेला आहे. या धर्मामधील दोन्ही ईद ह्या केवळ खाऊन पिऊन मौज करण्या किंवा डी.जे. लावून नाचण्यासाठी नसून दोन्ही वेळेस समाजातील गरीबांची मदत करण्यासाठी आहेत. ह्या ईद लोकांना त्याग करण्यासाठी प्रोत्साहित करतात. रमजान ईदपुर्वी जकात व फित्रा (अन्नदान) गरीबांना देण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे तर ईद-उल-अजहाच्या नमाजनंतर जनावरांची कुर्बानी देऊन त्याचे मांस गरीबांमध्ये वितरित करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सुबहानल्लाह! किती सुंदर धर्म आहे इस्लाम ! ज्यात फक्त दोनच ईद आहेत आणि त्यातही गरीबांचे हित पाहिलेले आहे.

सारांश, मानवतेच्या कल्याणाच्या कठीण मार्गामध्ये आपले धन प्रसंगी जीव देण्याची गरज पडल्यास ती देण्याची तयारी असल्याचे आश्वासन ईश्वराला देण्याचे नाव म्हणजे ईद- -उल-अजहा.


- एम. आय. शेख

लातूर


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget