Halloween Costume ideas 2015

जीवनप्रवास : अंतिम मुक्कामाच्या दिशेने


बालपण, तारुण्य, वृद्धावस्था व मृत्यू हे मानवी जीवनप्रवासाचे वेगवेगळे टप्पे आहेत. या प्रवासात कोणत्याही टप्प्यावर थांबणे माणसाला शक्य नाही, सतत पुढे जावेच लागते. माणूस निसर्ग नियमांमध्ये इतका जखडलेला आहे की त्याची इच्छा नसेल तरीही हे नियम त्याला पुढे जाण्यास भाग पाडतात. हा जीवनप्रवास मृत्यू आल्यावरही संपत नाही. माणूस जगात पाऊल ठेवण्यापूर्वीही प्रवासात होता आणि हे जग सोडल्यानंतरही तो आपल्या मुक्कामाच्या दिशेने प्रवासात असतो. निःसंशय मृत्यू हा अंतिम पडाव नाही आणि हे जगही मुक्कामाचे ठिकाण नाहीच. मुक्कामाचे खरे ठिकाण तर मरणोत्तर जीवनात आहे, पण या सांसारिक जीवनात एकामागून एक येणारी व्यस्तता आणि यश-अपयशांच्या मालिकेत माणूस आपल्या प्रवासाचे अंतिम ठिकाण विसरतो आणि त्यावर गंभीरतेने विचार करत नाही. मग एके दिवशी माणसाचे संसारातील आयुष्य संपते आणि तो आपली संपत्ती आणि नातेसंबंध इथेच सोडून पुढे जातो. सोबत असते ती फक्त आपल्या कर्मांची शिदोरी. मृत्यूपासून ते कयामतचा दिवस येईपर्यंतचा टप्पा पूर्ण केल्यानंतर, कयामतच्या दिवशी जेव्हा माणसाला दूबार जिवंत केले जाईल आणि अल्लाहसमोर आपल्या कर्मांचा जाब देण्यासाठी उभे केले जाईल, त्या वेळी माणसाला एकतर अनंत काळासाठी ऐश व आरामाचे ठिकाण मिळेल किंवा अनंतकालीन शिक्षेच्या ठिकाणी राहावे लागेल, हीच आहेत माणसाच्या प्रवासाची अंतिम ठिकाणे. माणूस त्याच अंतिम पडावाचा प्रवासी आहे जो आपल्या मुक्कामाकडे सतत वाटचाल करत आहे. या विषयी पवित्र कुरआनमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे,

या’अय्युहल्-इन्सानु कादिहुन इला रब्बि-क कद्-हन फमुलाकीहि.

अनुवाद :-

हे माणसा! तू परिश्रमपूर्वक आपल्या पालनकर्त्याकडे खेचला जात आहेस आणि त्याला भेटणार आहेस. (84इन्शिकाक् - 6 )

मौलाना अमीन अह्सन इस्लाही (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) यांनी या आयतीच्या स्पष्टीकरणात लिहिले आहे की,’ हे संबोधन जरी सामान्य माणसाला उद्देशून असले तरीही त्याचा रोख विशेषत: त्या उन्मत्त लोकांकडे आहे जे आपल्या सांसारिक सुखात मग्न आहेत आणि मरणोत्तर जीवनाबद्दल पूर्णपणे बेफिकीर आहेत. या आयतीमध्ये म्हटले गेले आहे की हे मानवा, तू आपल्या स्वामीकडे चालला आहेस आणि सरतेशेवटी तुला त्याच्यासमोर हजर व्हायचे आहे, भलेही त्याची जाणीव तुला असो वा नसो. भौतिक जगाचे पुजारी आपल्या सांसारिक यशाच्या नशेत आपले खरे ठिकाण नेहमीच विसरतात. एकामागून एक मिळणाऱ्या यशात आणि विजयात ते इतके हरवून जातात की त्यापलीकडे कशाचाही विचार करुच शकत नाही. अधिकाधिक यश मिळवण्याच्या धावपळीत त्यांना या प्रश्नावर विचार करण्याची सवडच मिळत नाही की आपले खरे ध्येय काय आहे? ते तर संसारातील एखादे उद्दिष्ट साध्य करण्यालाच आपला अंतिम पडाव समजतात. वास्तविक पाहता अंतिम पडाव तर मरणोत्तर जीवनात आहे, ज्याकडे जाण्यास संपूर्ण मानवजात ईश-नियमांच्या बंधनात जखडलेली आहे आणि अत्यंत लाचार अवस्थेत त्या अंतिम पडावाकडे खेचली जात आहे. लोकांनी जीवनाच्या या पैलूवर नजर ठेवली असती तर ते सरळ मार्गापासून दूर गेले नसते आणि त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले असते की संसारात आपल्या आवडत्या मार्गावर जितक्या वेगाने ते प्रगती करत आहेत, त्यापेक्षा अधिक तीव्र गतीने आपल्या कर्मांचा हिशोब देण्यासाठी त्यांचे जीवन ईश्वराकडे वाटचाल करत आहे.

( अनुवाद - तदब्बुरे कुरआन ऊर्दू खंड 9-पृ. 272/273- Internet -Archive )

तफ्सिर बयानुल-कुरआनमध्येही या आयतीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. 

हे जग माणसासाठी कष्टाचे ठिकाण आहे. मानवी जीवनातील या कटू वास्तवाचे वर्णन अध्याय अल-बलदच्या चौथ्या आयतीमध्ये केले गेले आहे. माणसाचा जन्मच कष्टाने व यातनामय परिस्थितीत होतो, म्हणजे त्रास सहन करणे व कठीण प्रसंगातून जाणे हे माणसाचे भाग्य आहे. यापासून कुणाचीही सुटका नाही. मजूर बांधवांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शारीरिक कष्ट करावे लागतात. कुणी कारखानदार असेल तर व्यवस्थापनातील समस्या सोडवताना त्याच्या रक्ताचे पाणी होते. ऑफिसच्या खुर्चीवर बसलेला मानसिक ताणाच्या फेऱ्यात अडकलेला दिसतो. मग स्वत:चे आणि कुटुंबियांचे आजारपण, आर्थिक अडचणी, सामाजिक प्रश्न, जीव आणि मालमत्तेच्या सुरक्षेची चिंता इत्यादींच्या स्वरूपात वेगवेगळ्या मानसिक समस्या गळ्यात पडलेल्या असतात. इतरांशी सामना आणि स्पर्धेचे दु:ख तर वेगळेच आहे जे प्रत्येक माणसाने कोणत्या ना कोणत्या स्तरावर आपल्या मनात साठवून ठेवलेले असते. पायी चालणारा माणूस दूचाकी स्वाराकडे ईर्ष्यापूर्ण नजरेने पाहतो, दूचाकी स्वाराला कारचालकाचा हेवा वाटतो. छोट्या कार मालकाला मोठ्या गाडीचा हेवा वाटतो. त्यामुळे कष्ट, वेदना, किंवा दुःखांचे स्वरूप वेगवेगळे असू शकतात, पण ज्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख सहन करावे लागत नाही असा मनुष्य सापडणे कठीण आहे. माणूस पहिल्या दिवसापासून या समस्यांना तोंड देत आला आहे आणि जिवंत असेपर्यंत त्यातून मुक्त होऊ शकत नाही. याबद्दल मिर्जा गालिब यांनी खूप छान म्हटले आहे,

कैद-ए-हयात व बन्द-ए-गम अस्ल में दोनों एक हैं

मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यूं

कष्ट आणि संकटांनी वेढलेल्या मानवी जीवनातील अडचणी व समस्या आपल्या जागी आहेत, पण माणसाची खरी समस्या त्याहूनही अधिक गंभीर आणि त्रासदायक आहे, ती समस्या म्हणजे,

अब तो घबरा के ये कहते हैं के मर जाएंगे 

मर के भी चैन न पाया तो किधर जाएंगे

(इब्राहीम जौक )

कयामतच्या दिवशी ईश-न्यायालयात आपल्या जीवनाविषयी द्यावा लागणारा जाब लक्षात घ्या आणि मग इतर सजीवांच्या तुलनेत ’माणूस’ किती अडचणीत आहे याची तुलना करा. ओझे वाहणाऱ्या प्राण्याचे आयुष्य कितीही खडतर असले तरीही त्याचे कष्ट आणि दुःख त्याच्या जीवनासोबतच संपते. अर्थात एक बैल जेव्हा नांगर किंवा रहाट ओढत ओढत मरण पावतो तेव्हा या श्रमातून तो कायमचा मुक्त होतो, पण त्याच्या तुलनेत माणूसच एक असा जीव आहे जो कष्टावर कष्ट आणि दुःखावर दुःख सहन करून जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा त्याला आपल्या ईश्वरासमोर उभे राहून आपल्या सांसारिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा हिशोब द्यावा लागेल. या संदर्भात अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी म्हटले आहे की,

कयामतच्या दिवशी आपल्या पालनकर्त्यासमोर जोपर्यंत पाच गोष्टींचा हिशोब घेतला जाणार नाही, तोपर्यंत आदम पुत्र म्हणजे माणसाचे पाय जागेवरून हलू शकणार नाहीत: त्याचे आयुष्य, ते कसे घालवले? तारुण्याबद्दल, तरूणपणातील शक्ती, सामर्थ्य आणि इच्छा-आकांक्षांचा उपयोग कसा केला? मालमत्तेविषयी, संपत्ती कशी कमवली? कायदेशीर मार्गाने की हरामखोरीने? आणि कुठे खर्च केली? उधळपट्टी केली की लोकांचे हक्क देण्यात खर्च केली? आणि मिळालेल्या ज्ञानानूसार किती आचरण केले?

म्हणजे जगात ओझेही वाहा, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक यातनाही सहन करा. जीव, संपत्ती,  आणि संतती यांच्याशी संबंधित निरनिराळे आघात सोसत सोसत आयुष्यभर काटेरी बिछान्यावर पडा, आणि मग मृत्यू झाल्यानंतर जीवनातील क्षणाक्षणाचा हिशोब देण्यासाठी त्या अस्तित्वासमोर उभे राहा जो मन-मस्तिष्काच्या खोलात निर्माण होणाऱ्या भावना आणि विचार जाणतो, ज्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाहीत. ही आहे ’माणसाची’ खरी शोकांतिका! हा टप्पा माणसासाठी इतका कठीण असणार आहे की त्याचे स्मरण करून आदरणीय अबू बक्र सिद्दीक (अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न होवो) हे वारंवार रडायचे आणि म्हणायचे की  मी पक्षी असतो तर बरे झाले असते! (अनुवाद-बयानुल कुरआन ऊर्दू eQuran Library app.)

हदीसमध्ये नमूद केलेल्या प्रश्नांपैकी शेवटचा प्रश्न सर्वात कठीण आहे. ज्यांच्यापर्यंत कुरआनचा संदेश पोहोचला आणि त्यांनी आपली योग्यता वा क्षमतेनुसार हा संदेश समजूनही घेतला, त्यांना या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण जाईल. ज्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही, निष्काळजीपणा केला, या संदेशाकडे पाठ फिरवली, त्यांनीही आपल्या भविष्याची चिंता करावी, कारण परीक्षेचा पेपर दिल्यानंतर एका विद्यार्थ्यालाही निकालाचा अंदाज येतोच.

आज माणसाला संधी आहे, त्याने आपल्या प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा विचार करावा आणि पूर्ण विश्वासाने आपले प्रयत्न त्या मुक्कामाच्या दिशेने वळवावे जे त्याच्या सांसारिक गरजाही पूर्ण करेल आणि मरणोत्तर जीवनातही अनंतकालीन कृपा लाभेल.

मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी मनात कोणताही प्रश्न असेल किंवा हा विषय इस्लामी दृष्टीकोनातून समजून घेण्याची इच्छा असेल तर या बाबतीत इस्लामी विद्वानांची मदत जरूर घ्यावी. या टोल फ्री नंबरवरही प्रश्न विचारू शकता - 18005723000. आपल्या अंतिम निकालाची जबाबदारी आपल्यावरच आहे. विश्व निर्मात्यासमोर आपल्या जीवनाचा हिशोब आपल्यालाच द्यायचा आहे. मृत्यूच्या वेळी आणि त्यानंतर कयामत येईपर्यंत व्यक्ती कोणकोणत्या परिस्थितीतून जाते? कयामतच्या दिवशी काय काय होईल? आणि त्यापुढे कधीही न संपणारे जीवन कसे असेल? या प्रश्नांकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी शोधनमध्ये या प्रश्नांवर आधारित एक लेखमालिका ’मृत्यूनंतर पुढे काय?’ सुरू करण्यात आली होती. नोव्हेंबर-2023 ते जानेवारी-2024 या कालावधीत सहा भाग प्रकाशित झाले होते. सातवा भाग पुढील अंकात प्रकाशित होईल. इन्शाल्लाह. 

..... समाप्त


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget