तो समाज प्रगती करू शकत नाही जो आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर कमी आणि विवाहावर जास्त खर्च करतो. आजकाल कर्ज काढून लोक वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. वाढदिवसाच्या उत्साहात लोक पैशाचा अपव्यय करत आहेत. 60 हजारांपर्यंत अनेकांचे हॉटेल्सचे बिल होताना पाहण्यात आले आहे. एवढ्या पैशातून तर एक दोन मुलांच्या वार्षिक शिक्षणाचा खर्च भागू शकतो. शरियतने फिजुल खर्ची आणि चुकीचा पायंडा पाडण्यास करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने बर्थ डे सिलेब्रिशेन आणि विवाहावर अमाप खर्च करण्याचे टाळून शिक्षण आणि उद्योगावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन समाजमाध्यमावर दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिक्षण तज्ज्ञ डॉ. अब्दुल कदीर यांनी व्यक्त केले.
डॉ. अब्दुल कदीर हे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आणि शाहीन एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी एसईएफची स्थापना 1989 मध्ये केली. शाहीन एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत देशभरात विविध शाळा आणि महाविद्यालये चालविले जात आहेत. डॉ. कदीर म्हणाले की, मी मुंबईत गेलो असता एका ऑटोमध्ये बसलो. ड्रायव्हरशी बोलताना मी त्याला विचारले, बेटा तुम्ही ऑटो चालवित आहाता, काय परिस्थिती आहे तुमची. तो युवक उत्तरला, जेव्हा पदवीचे शिक्षण घेत होतो तेव्हा मोठ्या बहिणीचे लग्न होते. वडिलांचे पेन्शनचे सर्व - (उर्वरित पान 2 वर)
पैसे संपले होते. आणि जेव्हा काही उद्योग उभारावा असा मनात विचार आला होता त्यावेळेस लहान बहिणीचे लग्न झाले. यामध्ये आम्हाला घर विकावे लागले. त्यामुळे मला नगदीमध्ये घर चालविण्यासाठी एकच मार्ग सापडला आणि तो म्हणजे ऑटो. विवाहामध्ये फिजुल खर्ची झाल्यामुळे अनेक पालक कर्जबाजारी झाले आणि ते आज अनंत अडचणींचा सामना करीत आहेत. खरे तर समाजात विवाह एकदम सोपा झाला पाहिजे. प्रेषित सल्ल. यांचे वचन आहे की, सर्वोत्कृष्ट विवाह तो आहे ज्यामध्ये कमीत कमी खर्च झाला असावा. विवाहाला सोपा कराल तर नेकीमध्ये वाढ होईल आणि विवाहाला अवघड केलात तर पापाचे धनी व्हाल. ही गोष्ट समजली पाहिजे. मी देशभरातील विशेषतः मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, विवाहात सामील व्हा, मात्र विवाहात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा बायकॉट करा. वलीमा करा आणि लग्नाला सोपे करा. लग्नात बडेजाव मिरविण्यापासून स्वतःला रोखा, फिजुल खर्ची टाळा, समाजातील गोर, गरीब घटकांकडे लक्ष द्या. लग्नातील जेवणाकडे देशातील 5 टक्के जरी लोकांनी याची सुरूवात केली तर हळूहळू ही प्रथा अगदी कमी होण्यास मदत होईल आणि जेवणासह इतर गोष्टींवरही होणारा विनासायास खर्च वाचेल. बरेच लोक म्हणतात आमच्याकडे ईश्वरकृपेने पैसा आहे. मित्रांनो! तुमच्याकडे कितीजरी पैसा असला तर तो खर्च कुठं, किती आणि कसा करावा यावे भान राखले पाहिजे. ईश्वराकडून याचीही तुम्हाला विचारपूस केली जाणार आहे.
आपल्या संस्थेच्या उभारणीसंदर्भात डॉ. अब्दुल कदीर म्हणाले, दर्जेदार शिक्षण सर्वांना परवडणारे बनवण्याच्या आमचे ध्येय आहे. यासोबतच यशाची गाथा सुरू करण्यासाठी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे बिदरचे जुने वैभव; पुन्हा एकदा शिक्षणाचे ठिकाण म्हणून पुनरुज्जीवित करण्याची आमची वचनबद्धता आहे. बीदर हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे. 1472 मध्ये महमूद गवान यांनी उभारलेल्या मदरशात दोन शतके जगभरातील विद्यार्थी बीदरला येत असत. ते दिवस होते जेव्हा बिदर शिक्षणाच्या शिखरावर होते. शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून बीदरकडे पाहिले जाते. आज आम्ही जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन बीदरला शिक्षणातील गतवैभव बनवू इच्छित असल्याचे डॉ. अब्दुल कदीर म्हणाले.
जेव्हा मी माझा धाकटा भाऊ अब्दुल हन्नानसाठी दर्जेदार शिक्षण केंद्र शोधत होतो तेव्हा बीदर आणि आजूबाजूला मला एकही मानक शैक्षणिक संस्था सापडली नाही म्हणून माझा शोध निरर्थक ठरला. हाच तो टर्निंग पॉईंट होता ज्याने मला आखाती देशांतील अभियंता म्हणून माझ्या भरभराटीची कारकीर्द सोडून शैक्षणिक उद्योजक बनण्यास प्रवृत्त केले. माफक संसाधने, अल्लाहवरील दृढ विश्वास आणि उच्च दर्जाच्या सुविधा देणारे जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनवण्याची भक्कम दृष्टी हेच माझे भांडवल होते. ज्ञानसंपत्तीने समृद्ध आणि अल्लामा इक्बाल यांच्या तत्त्वज्ञानाचा सतत पाठपुरावा करणाऱ्या या भव्य शाहीन कुटुंबाकडे पाहून आज आपल्या सर्वांना आनंद वाटेल, असेही डॉ. कदीर म्हणाले.’’ शिक्षण घेणे प्रत्येक स्त्री-पुरूषाचे कर्तव्य आहे. सध्या शाळेचे प्रवेश सुरू आहेत. आपल्या कुटुंबात व आपण राहत असलेल्या परिसरात कोणीही शाळेविना राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नैतिक, व्यावसायिक शिक्षणानेच माणसाचा सर्वांगीण विकास होवू शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देवून दर्जेदार नागरिक घडवावे.
Post a Comment