शेती आणि मानवी जीवन
शेती हा व्यवसाय जागतिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. चीन आणि ब्राझीलनंतर जगातील १० कृषीप्रधान देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पावसाच्या पाण्यावर घेतला जाणारा खरीप आणि सिंचनावर आधारित रब्बी असे दोन हंगाम साधारणपणे भारतात घेतले जातात. सोयाबीन, उडीद, मूग, तुर, चवळी, ज्वारी, इत्यादी खरीप तर गहू, हरभरा, मसुर यांसारखे रबी पिके शेतकरी पिकवतात.
खरीप पिकांसाठी शेतकरी उन्हाळ्यातच मशागत करतो. नांगरणी, वखरणी करून शेत भुसभुशीत करून ठेवतो. मृगातील मोसमी पाऊस पडताच पेरणी करून घेतो. नैसर्गिक सिंचनाने म्हणजे पावसाने काहीच दिवसात शेते फुलायला लागतात. काळ्या भुईवर हिरवी गच्च चादर अंथरली जाते. यादरम्यान कधी कधी कोळपणी करून शेतकरी नको असलेले गवत काढून टाकतो. किडे-किटकांच्या नुकसानीपासुन बचावासाठी किटकनाशके फवारली जातात. काहीच दिवसात शेती पिवळी पडायला लागते. हे संकेत असतात कापणी जवळ येण्याचे. शेतकरी कापणीच्या तयारीला लागतो. खरीप पिकांची कापणी होताच रब्बी हंगामाची सुरूवात होते आणि हीच कहाणी दुबार सुरू होते.
या सर्व गोष्टी करत असताना शेतकरी आपल्या पिकांना पोटच्या पोरावाणी जपत असतो. पेरणीपूर्वीपासुन हिरव्या शिवारापर्यंत आणि हिरव्या शिवारापासुन ते पिवळ्या पडलेल्या कापणीयोग्य पिकापर्यंत तो सर्व आपल्या डोळ्याने बघत असतो. एक एक दिवस त्याच्यासाठी खुप महत्वाचा असतो. तो जी ही मेहनत घेत असतो त्याचा पुरेपूर फायदा त्याला उत्पन्नाच्या रूपात मिळत असतो.
यापासुन माणसाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. या शेतीच्या वेगवेगळ्या स्थितींकडे बघीतले आणि गांभीर्याने विचार केला तर माणसाच्या आयुष्याच्या छटा यामध्ये दिसतील. कुरआनमध्ये अध्याय अल्-हदीदच्या आयत क्रमांक २० मध्ये म्हटले आहे, "चांगल्याप्रकारे जाणून असा की हे दुनियेतील जीवन याशिवाय अन्य काहीच नाही की एक खेळ आणि मनोरंजन व बाह्य टापटीप आणि तुमचे आपापसात एकमेकांविरुद्ध बडेजाव करणे आणि संपत्ती व संततीमध्ये एक दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे होय. याची उपमा अशी होय जणू एक पाऊस पडला तर त्याने उत्पन्न होणाऱ्या वनस्पतींना पाहून शेतकरी आनंदित झाले, मग तीच शेती पिकते आणि ती पिवळी पडल्याचे तुम्ही पाहता, मग ती भुसा बनून राहते. याउलट परलोक ते स्थान होय जेथे कठोर यातना आहे आणि अल्लाहची क्षमा व त्याची प्रसन्नता आहे. जगातील जीवन एका फसव्या सामग्रीशिवाय अन्य काहीच नाही." या आयतीचे सविस्तर विवेचन करताना मौलाना अब्दुर्रहमान कीलानी आपल्या तैसिरूल कुरआन या ग्रंथात म्हणतात की, या आयतीत मनुष्याच्या सांसारिक जीवनाची वनस्पतींच्या जीवनाशी तुलना केली आहे आणि काही भाष्यकारांनी या जीवनाची चार अवस्थांमध्ये विभागणी करून या दोन्ही प्रकारच्या जीवनांची तुलना केली आहे. उदाहरणार्थ, माणूस आपले बालपण खेळण्यात घालवतो. मग जेव्हा तारुण्य येते तेव्हा तो सजून धजून आपले सौंदर्य सादर करत असतो जेणेकरून तो पुरुष असेल तर स्त्रियांचे लक्ष केंद्रीत करेल आणि जर ती स्त्री असेल तर पुरूषांसाठी आकर्षणाचा स्रोत असेल. मग माणूस जेव्हा या वयातून जातो तेव्हा त्याला आयुष्यात काहीतरी बनण्याची इच्छा असते आणि शेवटी या वयात त्याची ही इच्छा त्याच्या मेहनतीने पूर्ण होते. यानंतर तो स्वत:च्या आनंदात समाधानी नसतो तर तो आपल्या मुलांसाठी जीवाची बाजी लावत असतो, अगदी मृत्यूपर्यंत.
वनस्पतींच्या बाबतीतही असेच आहे. त्या शेतीमध्ये उगवतात, शेतकरी किंवा आपल्या मालकांना खूश करतात आणि त्यांच्या बऱ्याच अपेक्षा त्यांच्याशी जुळलेल्या असतात. मग तारुण्याचा म्हणजे बहरण्याचा काळ येतो आणि सगळ्यांचे मन मोहून जाते. त्यानंतर काही काळात तिच्यावर म्हातारपण येते आणि ती पिवळी पडू लागते. शेवटी तिचा काही भाग माणसांसाठी व प्राण्यांसाठी अन्न बनतो आणि उरलेला भाग पायदळी तुडवला जातो. या उदाहरणातून हे समजावून सांगायचे आहे की ज्याप्रमाणे वनस्पतींचा वसंत ऋतु तात्पुरता आहे आणि त्याचप्रमाणे शरद ऋतू म्हणजे बहार संपवण्याचा ऋतूदेखील आहे. त्याचप्रमाणे, मानवी जीवनाची सुख-समृद्धी ही तात्पुरती आहे आणि त्याचप्रमाणे दुःख आणि इतर बाबी देखील तात्पुरत्या आहेत. याउलट, जन्नतमधील झरे आणि त्यातील सर्व देणग्या या शाश्वत आणि कधी न संपणाऱ्या आहेत. तसेच नरक आणि त्यातील यातना आणि त्रासदेखील शाश्वत आणि कधीही न संपणारा आहे. त्यामुळे तात्पुरत्या आणि अशाश्वत गोष्टी मिळवण्याऐवजी शाश्वत आणि कधीही न संपणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी सर्वतोपरी मेहनत करण्याचा मनुष्याचा प्रयत्न असावा. मात्र जो माणूस जगाच्या मोहकतेत हरवला आहे आणि त्याच्या वसंत ऋतूच्याच नशेत आहे तो मोठ्या फसवणुकीत पडला आहे. खरे शहाणपण हे आहे की या जगाच्या जीवनाला केवळ खेळ न मानता त्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान मानून स्वतःचे नशीब घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment