मृत्यूच्या सीमेत दाखल होताच मरणोत्तर जीवनातील प्रत्येक वस्तुस्थिती मरणाऱ्यासमोर प्रकट होऊ लागते. मग त्या हकीकतींवर मृत्यूपूर्वी विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या श्रद्धेच्या बदल्यात मिळणारे ठिकाण दिसू लागते आणि ते सत्य नाकारणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट नशीब दिसते. जेव्हा आस्तिक व्यक्तीला मृत्यू येतो, तेव्हा फरिश्ते त्याला खुशखबर देतात की अल्लाह तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझा सन्मान केला जाणार आहे. ही सुवार्ता ऐकल्यावर त्याला आणखी पुढे जाण्याची, अल्लाहला भेटण्याची इच्छा होते, पण जेव्हा नास्तिकाला त्याच्या मृत्यूसमयी शिक्षेची खबर दिली जाते तेव्हा तो पुढे जाण्यास घाबरतो आणि आश्रय मागू लागतो. गयावया करत म्हणू लागतो की मला परत जाऊ द्या, मी खात्री देतो की याआधी जे काही केले, ते आता करणार नाही. पण ईश्वराकडून त्याची विनवणी ठामपणे नाकारली जाते. त्या प्रसंगाचे वर्णन करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की,
’’हत्ता इजा जा’अ अहदहुमुल्-मवतु का-ल रब्बीर्-जिऊनि.’’
अनुवाद :- हे लोक आपल्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत इथपावेतो की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मरण येईल तेव्हा तो सांगू लागेल, हे माझ्या पालनकर्त्या, मला त्याच जगात परत पाठव, जे मी सोडून आलो आहे. (23 - मुिअ्मनून - 99)
जगात परत न पाठवण्याचे कारण हे आहे की हे जग परिक्षा स्थळ आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी निर्मात्याने माणसाला विवेक व बुद्धी दिली. जेणेकरून त्याने मरणोत्तर जीवनातील वास्तविकतेवर न पाहताही विश्वास ठेवावा आणि सत्य ओळखण्याचा प्रयत्न करावा. पवित्र कुरआनने मरणोत्तर जीवनाविषयी मानवी अस्तित्व आणि सृष्टीतील अनेक गोष्टींचे पुरावे मानवजातीसमोर ठेवले. त्यांची आठवण करून देण्यासाठी आणि लोकांना चांगल्या-वाईट परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अल्लाहने आपले पैगंबर पाठवले. त्यांच्यावर ग्रंथ अवतरित केले. जेणेकरून माणसांना सत्य ओळखण्यात अडचण येऊ नये. मग लोकांना आज्ञापालन किंवा अवज्ञा या दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य देण्यात आले. मात्र दोन्ही मार्ग अशा पद्धतीने स्पष्ट केले गेले की, जर माणसाने विवेकबुद्धीने विचार केला तर त्याला आज्ञापालनाचा मार्ग धरणे कठीण जात नाही, पण जेव्हा माणूस मृत्यूची सीमा ओलांडून मरणोत्तर जगात प्रवेश करतो आणि त्याच्यासमोर पुढील जीवनातील प्रत्येक वास्तविकता प्रकट होते, ज्यांवर सांसारिक जीवनात न पाहता विश्वास ठेवणे आवश्यक होते, तेव्हा त्याला संधी दिल्यास किंवा जगात परत पाठवल्यास या सांसारिक जगात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला काहीच अर्थ उरणार नाही. हे तर विद्यार्थ्यांसमोर उत्तरांसह प्रश्नपत्रिका ठेवण्यासारखे होईल. साहजिक आहे की असा प्रकार परीक्षेच्या नावाखाली एक विनोदच ठरेल.
............................. क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment