(५३) आणि हे पैगंबर (स.), माझ्या दासांना (म्हणजे ईमानधारक दासांना) सांगा की मुखाने ती गोष्ट काढत जा, जी उत्तम असेल.२५ खरे पाहता हा सैतान आहे जो माणसांच्या दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. वस्तुस्थिती अशी आहे की सैतान मानवाचा उघड शत्रू आहे.
(५४) तुमचा पालनकर्ता तुमच्या स्थितीशी चांगलाच परिचित आहे, त्याने इच्छिले तर तुमच्यावर दया करावी अथवा इच्छिले तर तुम्हाला यातना द्यावी,२६ आणि हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला लोकांवर हवालदार करून पाठविलेले नाही.
२५) म्हणजे विरोधकांनी कशाही अप्रिय गोष्टी केल्या तरी कोणत्याही परिस्थितीत मुस्लिमांनी कोणतीही असत्य गोष्ट तोंडावाटे काढू नये, की क्रोधात संयम सोडून असभ्यतेचे उत्तर असभ्यतेने दिले जाऊ नये तर शांत चित्ताने जी गोष्ट यथायोग्य असेल, सत्याधिष्ठित असेल आणि त्यांच्या आवाहनाच्या प्रतिष्ठेला साजेशी असेल तीच गोष्ट बोलली जावी.
२६) म्हणजे, आम्ही जन्नती आहोत व अमुक व्यक्ती अगर समूह, जहन्नमी-नरकास पात्र आहे. असले दावे ईमानवाल्यांनी कदापि सांगू नयेत. याबाबतचा निर्णय अल्लाहच्याच अखत्यारीत आहे. तोच सर्व माणसांचे अंतरंग व बाह्यरंग आणि त्यांचे वर्तमान व भविष्य जाणतो. कुणावर कृपा करावी व कुणाला यातना द्यावी याचा निर्णय तोच घेणार आहे. तात्त्विकदृष्ट्या अल्लाहच्या ग्रंथाच्या आधारे, कोणत्या प्रकारची माणसे कृपेस पात्र आहेत व कोणत्या प्रकारची माणसे यातनेस पात्र, असे म्हणण्याचा एखाद्या मुस्लिमला अधिकार जरूर आहे परंतु अमुक माणसाला यातना दिली जाईल व अमुक माणसाला क्षमा मिळेल असे म्हणण्याचा कुणासही अधिकार नाही.
Post a Comment