दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. 14 जून निकाल जाहीर करण्याची तारीख ठरली होती. पण 4 जून लाच निकाल जाहीर करण्यात आला. येथेच शंकेची पाल चुकचुकली. 4 जूनला लोकसभेचे निकाल जाहीर होणार होते. तसे ते जाहीर झाले आणि पुढील दोन-तीन दिवस त्या निकालांच्या विश्लेषणात आणि नवीन सरकारच्या गठनाच्या चर्चेत निघून गेले.
ठरलेल्या दिवसां पेक्षा दहा दिवस अगोदर निकाल जाहीर करण्यामागे एन. ए. टी. चा जो उद्देश होता तो स्पष्ट लक्षात येतो की लोकसभेच्या निकालांच्या घाई गर्दीमध्ये नीट च्या निकालाकडे कोणी ’नीट’ लक्ष देऊ नये आणि झालेही तसेच तीन-चार दिवस कुणीही याकडे लक्ष दिले नाही, त्यानंतर मात्र नीटच्या निकालाची चर्चा सुरू झाली. त्यातील चुका आणि अनियमितता पाहून देशभरात एकच गोंधळ उडाला. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. अत्यंत कठीण अशी ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न हे विद्यार्थी उराशी बाळगून दोन-दोन, तीन-तीन वर्षे कठीण परिश्रम करीत असतात. अशा परिस्थितीत या परीक्षेचा पेपर फुटणे यापेक्षा मोठ्या दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असणार. पटणामध्ये नीटचा पेपर फुटला होता. पेपर फोडल्याप्रकरणी काही लोकांना अटकसुद्धा झाली होती. याकडे सपशेल डोळेझाक करून एन.ए.टी. ने निकाल जाहीर केला. मागच्या वर्षी 720 पैकी 720 गुण मिळविणारे फक्त दोन विद्यार्थी होते. यावेळी मात्र त्यांची संख्या 67 एवढी प्रचंड होती. विशेष म्हणजे एकाच सेंटरवरच्या सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. असा संयोग होणे अशक्य आहे, असे या - (उर्वरित पान 2 वर)
क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात अनेक व्यावसायिक कोचिंग सेंटरचे पेव फुटलेले आहे. लाखो रूपये प्रती विद्यार्थी फीस घेऊन हे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. अब्जावधी रूपयांची उलाढाल या या माध्यमातून होते. अशा परिस्थितीत या परीक्षेमध्ये भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला नसता तरच नवल वाटले असते. पेपर फोडण्यापासून ते निकाल प्रभावित करण्यापर्यंत या कोचिंग माफियाचा सहभाग असल्याशिवाय, निकालातील हा गोंधळ होणे शक्यच नाही. देशात असे कुठलेच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही. सगळी यंत्रणाच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. भ्रष्टाचार्यांना पकडणार्या ईडी, सीबीआय सारख्या एजन्सीमधील अधिकारी स्वतःच भ्रष्टाचार करतांना रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरूनच भ्रष्टाचाराची व्याप्ती लक्षात येते. सर्वात मोठा भ्रष्टाचार राजकारणी करतात. देशाला दिशा देणारे राजकारणीच जेव्हा भ्रष्टाचार करत असतात तेव्हा बाकीचा भ्रष्टाचार ते कोणत्या तोंडाने रोखणार? परंतु, नीट परीक्षेतील भ्रष्टाचार हा जीवघेणा भ्रष्टाचार असून, निकाल हा चुकीचा लागला याचा धसका घेऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यास सुरूवात केलेली आहे. हे पाप नीटमध्ये भ्रष्टाचार करणार्यांच्या माथी जाईल यात शंका नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एन.ए.टी.ला नोटिस जारी केली आहे. मात्र निकाल स्थगित करण्यास किंवा पुन्हा परीक्षा घेण्यासंबंधी काही निर्देश दिलेले नाहीत. एकंदरित एन.ए.टी.च्या कार्यपद्धतीवर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, त्याची पुरती आबरू गेलेली आहे. अलिकडे देशात कोणत्याही परीक्षा स्वच्छ होताना दिसत नाहीत. विद्यापीठापासून ते शासकीय स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे किंवा निकाल चुकीचे लागण्याचे जणू पेवच फुटले आहे. मागे महाराष्ट्रातील शिक्षक घोटाळा प्रकरण अशाच भ्रष्टाचारामुळे गाजला होता. शिक्षण क्षेत्रातील संचालक पदाच्या व्यक्तीस सुद्धा त्यात लिप्त असल्याचे आढळून आले होते. अनेकांना अटकसुद्धा झाली होती. मात्र नंतर त्याचे काय झाले, हे नेहमीप्रमाणे गुलदस्त्यातच राहिले आहे. याच आठवड्यात मुंबई येथील 180 कोटी मुल्याची प्रॉपर्टी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना क्लिनचिट देऊन परत करण्यात आली. ते जर शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेले नसते आणि दोघेही एनडीएमध्ये सामील झाले नसते तर ही प्रॉपर्टी क्लीअर झाली नसती, हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतीषाची गरज नाही. ही राजकीय भ्रष्टाचाराची लेव्हल आहे.
भ्रष्टाचार एक मोठी सामाजिक समस्या आहे. या समस्येवर प्रसिद्ध इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी खालीलप्रमाणे भाष्य केले आहे, ’सामाजिक व्यवस्थेची सुत्रे जेव्हा अभद्र लोकांच्या हाती एकवटतात तेव्हा समाज ईश्वर विरोधी मार्गावर चालू लागतो. यामुळे व्यक्ती आणि समुह दोघांनाही चुकीच्या मार्गावर चालणे इतके सोपे होऊन जाते की, त्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना स्वतःला काही शक्ती खर्च करावी लागत नाही. व्यवस्था त्यांना वाममार्गावर चालण्यासाठी स्वतः मदत करत असते. हां मात्र...! नैतिक मार्गावर चालण्यासाठी कोणी आपली सर्वशक्ती जरी पणाला लावत असेल तरीसुद्धा वाममार्गाला लागलेल्या लोकांची संख्या आणि त्यांचा रेटा इतका प्रचंड असतो की नैतिक लोाकंच्या शक्तीचा विरोध तो इतक्या जोरदार पदधतीने मोडून काढतो की असे नैतिक लोक मैलोगणिक मागेे ढकलले जातात. संदर्भ : इस्लामी निजामे जिंदगी और उसके बुनियादी तसव्वुरात. (पेज नं. 1470)
आर्थिक भ्रष्टाचार हा नैतिक भ्रष्टाचाराची परिसिमा असते. माणसाच्या मनातून जेव्हा ईशभय नष्ट होते तेव्हा माणूस अनेक प्रकारचे भ्रष्ट आचारण करत असतो. आर्थिक भ्रष्टाचार त्यापैकी एक आहे. जी भांडवलशाही व्यवस्था आपण आपल्या देशात स्वीकारलेली आहे ती फक्त आर्थिक व्यवस्था नाही तर ती सामाजिक व्यवस्था सुद्धा आहे, जिवन व्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशाने आपल्या चर्चेसना उध्वस्त करून ही व्यवस्था विकसित केलेली आहे. त्यांनी धर्माच्या ठिकाणी आर्थिक प्रगतीला प्राधान्य देऊन ही प्रगती सध्य केली आहे. आपण ही तेच करत आहोत.
अलमारूफ वलमशरूत
एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ (गरजे) मध्ये होऊन जाते. भ्रष्टाचार अशाच पातळीवर येवून पोहोचलेला आहे. समाजाचे सामुहिक चारित्र्य इतक्या खालच्या पातळीवर पोहोचलेले आहे की, भ्रष्टाचाराबद्दल कोणाला वाईट वाटतच नाहीत उलट भ्रष्ट मार्गाने पैसा कमाविणार्या लोकांकडे समाज कौतुकाने पाहतो. मुलींची स्थळ भ्रष्ट कामात गुंतलेल्या आणि वरकमाई असणार्या तरूणांनाच मिळतात. सत्शील चारित्र्याच्या अल्प मात्र हलाल कमाई करणार्या तरूणांकडे मुलीही आकर्षित होत नाहीत आणि मुलींचे पालकही त्यांना पसंत करत नाही. भ्रष्टाचारांला एवढी प्रतिष्ठा ज्या समाजात प्राप्त झालेली असेल त्या समाजात नीटच काय कोणत्याही परीक्षा बाधित करून पैसा कमाविण्याचा लोक प्रयत्न करत असतील तर दोष कोणाला द्यावा. यासाठी इस्लाममध्ये आदर्श समाज निर्मितीवर जोर देण्यात आलेला आहे. जेणेकरून समाजात भ्रष्टाचार होणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो...! भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त तोटा समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या गरिब माणसांच्या जिवनावर होतो. ते कोलमडून पडतात. आज शेतकऱ्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत लोक भ्रष्टाचारामुळेच कोलमडून पडत आहेत. विशेष म्हणजे भ्रष्ट मार्गाने अब्जावधी कमावणाऱ्या लोकांना आपल्याच समाज बांधवांच्या कोलमडलेल्या अवस्थेचा जरा सुद्धा राग येत नाही.
आदर्श समाज अचानक निर्माण होत नाही त्यासाठी कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिलेल्या शरई पद्धतीने समाजातील प्रत्येक व्यक्तीचे प्रशिक्षण करावे लागते. तेव्हा कुठे चांगले लोक निर्माण होतात.
कोणत्याही समाजामध्ये बिघाड सुरूवातीला त्यातील (काही) उच्च वर्गीय लोकांमधून सुरू होतो. समाजाचा सामुहिक आत्मा जर जीवंत असेल तर असा बिघाड समाजामध्ये खालपर्यंत झिरपत नाही. तो बिघाड त्या लोकांपर्यंतच मर्यादित राहतो. मात्र समाजाचा सामुहिक आत्मा मेलेला असेल तर मात्र तो बिघाड खालपर्यंत झिरपत जातो आणि संपूर्ण समाज त्याच्या प्रभावाखाली येवून नासून जातो. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतीय समाज याच पातळीवर येऊन पोहोचलेला आहे म्हणजे नासलेला आहे. म्हणूनच तर प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा मुक्त संचार सुरू आहे. भ्रष्टाचारामुळे पीडित झालेले लोक थोडी खळखळ करतात, त्यांना शांत करण्यासाठी सरकार काहीतरी कारवाई केल्याचा देखावा करते. काही दिवसांनी सगळे शांत होऊन जातात. लोक विसरून जातात. नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ समाज निर्माण करण्यासाठी चांगल्या चारित्र्याच्या लोकांना गोळा करून त्यांचे एक संगठन जमाअते इस्लामी नावाने सय्यद अबुल आला मौदुदी यांनी 26 ऑगस्ट 1941 रोजी भारतात बांधले होते. ते आजतागायत सुरू आहे. सय्यद अबुल आला मौदुदी यांचे असे म्हणणे होते की, जमाअते इस्लामीमध्ये मुत्तकी (ईशभय बाळगणारे), रास्तभाज (सरळ मार्गी) आणि दियानतदार (प्रामाणिक) अशा लोकांना स्थान मिळेल. असे लोक कुरआन व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्गावर विश्वास ठेवून जीवन जगणारे लोक असावेत. मात्र त्यांच्यात जागतिक व्यवहाराची जाण ईशभय न बाळगणार्या व्यवहारी लोकांपेक्षाही जास्त असावी.
एकंदरित कुरआनचे मार्गदर्शन आणि प्रेषित सल्ल. यांनी दिलेल्या शरियतच्या वर्तुळात राहून उत्कृष्ट् चारित्र्याच्या लोकांची निर्मिती होऊ शकते. असेच लोक भ्रष्टाचारमुक्त असू शकतात. भांडवलशाही किंवा इतर कुुठल्याही जीवनपद्धतीमध्ये एवढी क्षमताच नाही की ते चांगल्या चारित्र्याच्या लोकांनी निर्मित करू शकेल.
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment